मुंबई : तमिळनाडूत अण्णा द्रमुक आणि द्रमुक तर आंध्र प्रदेशात तेलुगू देशम आणि वायएसआर काँग्रेस या दोन प्रतिस्पर्धी पक्षांमध्ये कमालीची कटुता असली तरी दोन्ही राज्यांमधील प्रतिस्पर्ध्यांच्या जाहीरनाम्यांमध्ये बरेचसे साम्य आढळते.

आंध्र प्रदेशमध्ये विधान सभेच्या १७५ जागा तर लोकसभेच्या २५ जागांसाठी उद्या मतदान होत आहे. आंध्रमध्ये मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्या नेतृत्वाखालील तेलुगू देशम तर जगन मोहन रेड्डी यांच्या वायएसआर काँग्रेस या दोन प्रादेशिक पक्षांमध्ये चुरशीची लढत अपेक्षित आहे. महाराष्ट्रात मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राजकीय वळण घेतो, तसेच आंध्रमध्ये कप्पू समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा राजकीयदृष्टय़ा संवेदनशील ठरला आहे. आंध्रमध्ये १५ टक्क्यांच्या आसपास असलेल्या कप्पू समाजाच्या आरक्षणावर दोन्ही पक्षांना भूमिका घ्यावी लागली आहे.

कप्पू समाजाबाबत..

तेलुगू देशम – सरकारी नोकऱ्या आणि शैक्षणिक संस्थांमध्ये समाजाला पाच टक्के आरक्षण. याबरोबरच समाजाच्या विकासासाठी विशेष योजना

वायएसआर काँग्रेस – कप्पू समाजाच्या विकासासाठी दरवर्षी दोन हजार कोटी याप्रमाणे पाच वर्षांत १० हजार कोटी खर्च करणार

तामिळनाडूतही साम्य

अण्णा द्रमुक आणि द्रमुक नेत्यांमधून विस्तवही जात नाही एवढे दोघांचे वाकडे असताना जाहीरनाम्यांमध्ये अनेक साम्यस्थळे आहेत.

* राष्ट्रीय महामार्गावरील टोल बंद करण्यासाठी केंद्राकडे मागणी करणार

* खासगी क्षेत्रात आरक्षण

* वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणारी नीटची परीक्षा रद्द करण्यात यावी

* शिक्षण हा विषय राज्याच्या अखत्यारीत समाविष्ट करावा.

शेतकरी

वायएसआर काँग्रेस : ‘वायएसआर रयतू बंधू’ योजनेंतर्गत खरीप हंगामाच्या आधी शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये १२,५०० जमा करणार

तेलुगू देशम : चंद्राण्णा रयतू बिमा योजनेअंतर्गत अपघातात मृत्यू पडलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना १० लाखांची मदत. तसेच शेतकऱ्यांच्या विकासासाठी पाच हजार कोटी