अमित शहा यांची काँग्रेससह शरद पवार यांच्यावरही टीका

जालना : देशाच्या सत्तेत काँग्रेसच्या पाच पिढय़ा गेल्या तरी देशातील गरिबी काही हटली नाही, असे सांगत राहुल गांधी यांच्यावर आणि मनमोहनसिंग सरकारच्या काळात कृषिमंत्री असताना शरद पवार यांनी शेतकऱ्यांसाठी काय केले, असा प्रश्न उपस्थित करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी टीकास्त्र सोडले. २० वर्षांपासून सातत्याने हल्ले करणाऱ्या आतंकवाद्यांशी चर्चा करायची की त्यांना सडेतोड उत्तर द्यायचे, असा प्रश्न करत मोदी सरकार हे आतंकवाद्यांचा कर्दनकाळ असल्याचे प्रतिपादनही शहा यांनी गुरुवारी सायंकाळी येथे केले.

येथील आझाद मदानावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष तथा जालना लोकसभा मतदारसंघाचे  महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर भाजपा प्रदेशाध्यक्ष तथा खासदार रावसाहेब दानवे,पालकमंत्री बबनराव लोणीकर, राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर आदींची उपस्थिती होती.  काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी गरिबी हटवण्याची भाषा करतात. मात्र जवाहरलाल नेहरू यांच्यापासून ते मनमोहन सिंग यांच्यापर्यंत कोणीच गरिबी हटवू शकले नाहीत. ५५ वष्रे काँग्रेसचे सरकार होते. मात्र गरिबासाठी काहीच केले नाही. या उलट काँग्रेसच्या ५५ वर्षांच्या सत्ताकाळापेक्षा ५५ महिन्यात प्रचंड विकास कामे केली, असे सांगताना शहा यांनी मोदी सरकारच्या काळात लोकोपयोगी विविध योजना, ओबीसी आयोगाला दिलेला संवैधानिक दर्जा, सवर्णाना दिलेले १० टक्के आरक्षण, आदींची माहिती दिली. अमित शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्यावरही शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून टीकास्त्र सोडले. मोदी सरकारने १३व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून महाराष्ट्राला ४ लाख ३८ कोटी रुपये दिले आहेत, असेही त्यांनी सांगितले.

यूपीएच्या सरकारच्या काळात घुसखोर देशात हल्ले करत होते. काँग्रेस सरकार कोणतेच प्रतिउत्तर देत नव्हते. मात्र पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालाकोटमध्ये हवाई सर्जकिल स्ट्राईक करून अतिरेक्यांना ठार करण्याचे आदेश देत अतिरेक्यांना सडेतोड उत्तर दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या कार्यकाळात केलेल्या विविध विकासकामांचा उल्लेखही शहा यांनी या वेळी केला.