ओवैसी-आंबेडकरांच्या सभेला मोठा प्रतिसाद

सोलापूर : सुशीलकुमार शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री असताना सोलापूरच्या पाच मुस्लीम तरुणांना भोपाळच्या पोलिसांनी दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याच्या संशयावरून पकडून नेले. त्यापैकी एका तरुणाला खोटय़ा चकमकीत ठार करण्यात आले. शिंदे यांनी मनात आणले असते, तर या पाचही तरुणांना तुरुंगात नाहक सडत पडावे लागले नसते असा आरोप एमआयएमचे नेते खासदार असदोद्दीन ओवैसी यांनी येथे जाहीर सभेत बोलताना केला.

सोलापूर लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रकाश आंबेडकर यांच्या प्रचारार्थ इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर स्वत: आंबेडकर व ओवैसी यांच्या जाहीर सभेला उदंड प्रतिसाद मिळाला. सभेच्या वेळी स्टेडियम तुटुंब भरले होते. स्टेडियमबाहेर देखील हजारोंचा जनसमुदाय उपस्थित होता. यंदाच्या सोलापूर लोकसभा निवडणुकीत सर्वात मोठय़ा समजल्या गेलेल्या वंचित बहुजन आघाडीच्या या सभेमुळे सार्वत्रिक अचंबा व्यक्त होत आहे.

सोलापुरात प्रकाश आंबेडकर यांची उमेदवारी सुरुवातीपासूनच चर्चेत राहिली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करताना आंबेडकर यांच्या शोभायात्रेद्वारे झालेल्या शक्तिप्रदर्शनाचा मुद्दा संपूर्ण राज्यात चर्चेचा विषय झाला होता. या सभेत प्रकाश आंबेडकर व खासदार असदोद्दीन ओवैसी या दोघाही नेत्यांनी आपल्या भाषणात सोलापुरातील काँग्रेसचे उमेदवार सुशीलकुमार शिंदे यांच्यावर विशेषत्वाने निशाणा साधला. शिंदे हे केंद्रीय गृहमंत्री असताना इकडे त्यांच्याच सोलापुरातील पाच मुस्लीम तरुणांना भोपाळच्या पोलिसांनी दहशतवादी कारवायांमध्ये सहभाग घेतल्याच्या संशयावरून पकडून नेले होते. त्यापैकी एका तरुणाला खोटय़ा चकमकीत ठार करण्यात आले. खोटय़ा खटल्यांमध्ये या तरुणांना अडकविण्यात आले होते. तेथील एका खटल्यात या सर्व तरुणांना निर्दोषमुक्त करण्यात आले आहे. परंतु त्या वेळी शिंदे हे गृहमंत्री असताना त्यांनी मनात आणले असते, तर सोलापूरच्या या पाचही तरुणांना नाहक तुरुंगात सडत पडावे लागले नसते आणि एका तरुणाला प्राणाला मुकावे लागले नसते. आता मध्य प्रदेशात काँग्रेसची सत्ता आहे. सुशीलकुमार शिंदे सोलापुरातील या पाच निष्पाप तरुणांवर झालेल्या अन्यायाची चौकशी करायला लावतील काय, असा प्रश्न ओवैसी यांनी उपस्थित केला.

प्रकाश आंबेडकर यांनी आपण सोलापूर व अकोला या दोन्ही ठिकाणी निवडून येण्याचा विश्वास व्यक्त केला. आपण आगामी काळात काँग्रेस व भाजपची जहागिरी संपवून नवा वस्तुपाठ मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारांचा प्रभाव असलेल्या कार्यकर्त्यांकडे एके ४७ बंदुका मिळाल्यानंतर तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी बघ्याची भूमिका घेतली. शिंदे हे रा. स्व. संघाशी जवळीक साधून आहेत. त्यामुळे सत्तेत असूनही त्यांनी मवाळ भूमिका घेतली. मात्र आमची सत्ता आल्यास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला बंदिस्त करू, अशी ग्वाही आंबेडकर यांनी दिली.  या वेळी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम मास्तर, एमआयएमचे स्थानिक नेते तौफिक शेख, गोपीचंद पडळकर आदींची भाषणे झाली. व्यासपीठावर आमदार इम्तियाज जलील, आमदार वारिस पठाण, माजी आमदार प्रकाश शेंडगे, बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे, भाजपचे नगरसेवक रवी गायकवाड आदी उपस्थित होते.