मतदारसंघातच अडकल्याचा भाजपचा आरोप; काँग्रेसचे प्रत्युत्तर

औरंगाबाद : अशोकराव चव्हाण हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष असले तरी त्यांचा प्रदेश सध्या नांदेडएवढाच मर्यादित झाला आहे. त्यांनी महाराष्ट्राचे नेतृत्व केले आहे. विजयाची खात्री असती तर ते स्वत:पुरते अडकून राहिले नसते, अशी टीका आता भाजपकडून होऊ लागली आहे. गेल्या काही दिवसांपासून अशोकराव चव्हाण यांचा मुक्काम नांदेड मतदारसंघातच आहे.

काँग्रेसकडून मात्र या आरोपाचे खंडन केले गेले. पहिल्या टप्प्यात विदर्भातील बहुतांश मतदारसंघात ते प्रचारासाठी जाऊन आले होते. त्यांच्या मतदारसंघात निवडणूक असल्याने त्यांनी काही सभा घेणे अपेक्षितच असते. ते अडकून पडले आहे असे म्हणणे चूक ठरेल, असे आमदार अमर राजूरकर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितले.

नांदेड लोकसभा मतदारसंघातून भाजपच्यावतीने प्रताप पाटील चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली. लोहा मतदारसंघाचे आमदार म्हणून काम करणाऱ्या चिखलीकरांना मदत करण्यासाठी भाजपने खास टीम तयार केली असून सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांच्याकडे समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला अधिक मते मिळतील आणि होणारे विभाजन काँग्रेसला अधिक धक्का देणारे असेल, असा प्रचार केला जात आहे. तर वंचित बहुजन आघाडीची मते भाजपला अधिक नुकसानकारक असल्याचा दावा काँग्रेसकडून केला जात आहे.

मराठीचे प्राध्यापक असणारे यशपाल भिंगे यांना किती मते मिळतात याची गणिते घातली जाऊ लागली आहे.

विशेषत: धनगर समाजातील मते एकगठ्ठा आपल्या बाजूने व्हावेत असे प्रयत्न भाजप, काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्यावतीने नांदेडमध्ये केले जात आहे. त्यामुळे अधिक सजग राहावे म्हणून काँग्रेस प्रदेशाध्यक्ष वेगवेगळ्या मतदारसंघांत बैठका घेत आहेत.

परिणामी मराठवाडय़ातल्या अन्य काही मतदारसंघांत ते अद्याप गेलेले नाहीत. मात्र पुढच्या टप्प्यातील औरंगाबाद आणि जालना या दोन्ही मतदारसंघांत ते दौरा करतील, असे काँग्रेसच्यावतीने सांगण्यात आले.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणून काम करणाऱ्या चव्हाण यांना आता विजयाची खात्री राहिली नाही. त्यामुळे ते त्यांच्या मतदारसंघात अडकून पडले आहेत. मी राजीनामा देण्याच्या मानसिकतेत आहे, असे त्यांचे वक्तव्य अलीकडेच सर्वाच्या परिचयाचे झाले आहे. त्यामुळे पराभवाच्या मानसिकतेत ते आहेत, अशी टीका भाजपचे सरचिटणीस सुजीतसिंह ठाकूर यांनी केली.

नांदेड येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा झाली आहे. येत्या काळात मुख्यमंत्र्यांच्या दोन सभा, पंकजा मुंडे यांची एक सभा आणि नितीन गडकरी यांचीही सभा होईल, असे सांगण्यात आले.

दानवेंना बोलताना त्रास

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा मतदारसंघ अर्जुन खोतकर यांचे बंड थंड झाल्यानंतर सुरक्षित झाला आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून ते आजारी आहेत. औरंगाबाद येथील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. त्यांची प्रकृती स्थिर आहे. बोलताना त्यांना त्रास होत आहे.