18 September 2020

News Flash

नगरच्या राजकारणात थोरातांना महत्त्व

विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असे दोन गट होते.

माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

राहुल गांधी यांची आज संगमनेरमध्ये सभा

अशोक तुपे, श्रीरामपूर

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपचा मार्ग पत्करल्याने नगर जिल्ह्य़ाचे नेतृत्व आता बाळासाहेब थोरात यांच्याकडे आले असून, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या शुक्रवारच्या जाहीर सभेसाठी थोरात यांच्या संगमनेरची निवड करण्यात आली आहे. विखे-पाटील यांना राजकीय शह देण्याकरिता थोरात यांना आव्हान स्वीकारावे लागणार आहे.

काँग्रेस पक्षात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात असे दोन गट होते. त्यांच्यात पक्षांतर्गत मतभेद होते. विखे यांचा जिल्ह्य़ात स्वतंत्र गट होता. मात्र थोरात फारसा राजकीय हस्तक्षेप करत नव्हते. विखे यांचे समर्थक बाळासाहेब मुरकुटे हे विधानसभा निवडणुकीतच भारतीय जनता पक्षात जाऊन आमदार झाले होते. तर भाजपचे आमदार शिवाजी कर्डीले आणि विखे यांच्यात छुपा समझोता होता. काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे हे त्यांचे कट्टर समर्थक होते. मात्र आता विखे भाजपमध्ये गेल्यात जमा असून केवळ पक्षप्रवेशाची औपचारिकताच बाकी आहे.

नगर लोकसभा मतदारसंघात विखे यांनी भाजपचे उमेदवार आणि चिरंजीव डॉ. सुजय विखे यांचा प्रचार केला. शेवटच्या टप्प्यात त्यांनी बैठकाही घेतल्या. नगरची निवडणूक झाल्यानंतर विखे यांची यंत्रणा शिर्डी लोकसभा मतदारसंघात दाखल झाली आहे. विखे यांनी शिर्डीतील शिवसेनेचे उमेदवार खासदार सदाशिव लोखंडे यांचा प्रचार सुरू केला आहे. श्रीरामपूर, शिर्डी येथे बैठका घेऊन त्यांनी लोखंडे यांच्या प्रचारात सक्रिय होण्याचे आदेश कार्यकर्त्यांना दिले आहेत.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष करण ससाणे यांना विखे यांनी राजीनामा देण्यास भाग पाडले. माजी मंत्री थोरात यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दौऱ्याच्या पाश्र्वभूमीवर त्यांनी शह दिला. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माणिकराव ठाकरे, मुजफ्फर हुसेन, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर आदी नेते जिल्ह्य़ात असताना विखे यांनी त्यांना धक्का दिला. त्याची दखल पक्षाने घेतली आहे. विखे यांच्यावर कारवाई करण्यासाठी योग्य वेळ पक्षश्रेष्ठी शोधत आहेत. मात्र आता विखे पक्षापासून खूपच दूर गेले आहेत. विधिमंडळ काँग्रेस पक्षाच्या नेत्याच्या पाठीशी पक्ष उभा राहात नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. विखे यांनी घेतलेल्या भूमिकेच्या पाश्र्वभूमीवर माजी मंत्री थोरात यांनी पक्ष सावरण्याचेच काम केले. त्यामुळे पक्षात त्यांचे वजन वाढले आहे. ते जिल्ह्य़ात काँग्रेसचे नेते झाले असून राज्यातही पक्षात त्यांचे स्थान बळकट झाले आहे.

थोरात यांना गुजरातच्या निवडणुकीनंतर पक्षात महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले होते. या निवडणुकीत छाननी समितीचे ते सदस्य होते. त्यानंतर त्यांची अखिल भारतीय काँग्रेसच्या राष्ट्रीय समितीवर नेमणूक झाली. थोरात यांना विखे यांचा विरोध होता. मात्र आता थोरात यांना पक्षांतर्गत विरोध राहिलेला नाही. जिल्ह्य़ाची सूत्रे एकहाती त्यांच्याकडे आली आहेत. राज्यात थोरात यांची किंमत वाढली आहे. पहिल्यांदाच थोरात यांना काँग्रेसचे नेते म्हणून मान्यता मिळाली आहे.

सिन्नरची सभा, संगमनेरला आणली

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची सिन्नर (जि.नाशिक) येथे राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांच्यासाठी सभा होणार होती. तांत्रिक आणि सुरक्षेच्या कारणामुळे ही सभा रद्द झाली. मात्र ती माजी मंत्री थोरात यांनी काँग्रेस उमेदवार कांबळे यांच्यासाठी खेचून आणली. पक्षाध्यक्ष गांधी यांची मर्जी संपादन करण्याकरिता सभेचे नियोजन त्यांनी केले आहे. निवडणुकीत कांबळे यांचे सर्व नियोजन थोरातच करीत आहेत. आतापर्यंत केवळ मतदारसंघापुरते मर्यादित असलेले थोरात विखे यांच्या बदललेल्या राजकीय भूमिकेमुळे जिल्हाव्यापी झाले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 26, 2019 2:03 am

Web Title: lok sabha election 2019 balasaheb thorat importance in ahmednagar politics
Next Stories
1 ..तर, श्रीलंकेत जे झाले ते, आपल्याकडे होईल – उद्धव ठाकरे
2 सत्ता कुणाचीही आली, तरी दूध, ऊस दरासाठी रस्त्यावर उतरण्याचे स्वातंत्र्य
3 आघाडीचा जाहीरनामा म्हणजे कोंबडी विकण्याचा धंदा – मुख्यमंत्री
Just Now!
X