उत्तर मुंबई : गोपाळ शेट्टी, भाजप

* गेल्या पाच वर्षांत मतदारसंघात लोकांना उपयुक्त ठरतील अशी कोणती ठळक कामे केली?

गेल्या पाच वर्षांत उद्याने, मैदानांवरील अतिक्रमण थोपवून या मोकळ्या जागा सर्वसामान्यांना उपलब्ध करून देण्याच्या कामाचा बोरिवली पाठोपाठ मालाड, कांदिवली या मतदारसंघांतही विस्तार केला. मालवणीमधील मोकळी २० एकर जमिनी ताब्यात घेतली. आता येथील १२ एकर जागेवर खेळाचे मैदान, तर उर्वरित जागेवर क्रीडांगण, केंद्रीय विद्यालय, सरकारी कार्यालय होणार आहे. महत्त्वाचे म्हणजे पाच हजार जणांना मोफत एलपीजी जोडणी मिळवून दिली. या कामाची दखल खुद्द पंतप्रधानांनी घेतली. मालवणीतील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी पुढाकार घेतला. इथे काही ठिकाणी पाण्याचा प्रश्न सोडविण्यात यश आले आहे. अनेक ठिकाणी शौचालये बांधून दिली आहेत.

* मुंबईतील सर्वात महत्त्वाचा रेल्वे वा वाहतूक प्रश्न सोडविण्यासाठी काय योजना आहे?

मेट्रो, किनारा मार्गामुळे उपनगरातील वाहतुकीचा प्रश्न बऱ्यापैकी सुटणार आहे. या जोडीला पश्चिम रेल्वेला अधिकाधिक वातानुकूलित रेल्वे मिळवण्यावर माझा भर राहील. दररोज सरासरी १० रेल्वे प्रवाशांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे विरार ते बोरिवली उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्या आणखी वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे. रेल्वेचा प्रवास परवडणारा असायला हवा. परंतु, रेल्वेने चांगली सेवा द्यावे असे वाटत असेल तर थोडीफार तिकीट दर वाढ करावी लागली हरकत नाही. तरच या सार्वजनिक वाहतूक सेवा टिकू शकतील. या शिवाय रस्ते वाहतूक अधिक सुलभ व्हावी यासाठी विविध प्रकल्प राबविण्यावर भर आहे. दहिसर-विरार मार्ग हा त्यापैकी. या मार्गामुळे हा प्रवास २५ मिनिटांवर येणारआहे.

* मतदारांनी तुम्हालाच मते का द्यावी?

देशासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जे काही केले ते काम ध्यानात घेऊन मतदारांनी भाजपला मते द्यावी. त्यांच्याकडून जितकी अपेक्षा होती त्यापेक्षा मोदींनी जास्त काम केले आहे. मीही येथील मतदारांकरिता काम करतो आहे. त्यांना माझा पूर्ण वेळ देतो. मतदारांसमोर भाजप हा ठोस पर्याय आहे.

* तुमच्या विरोधात उभ्या असलेल्या काँग्रेसच्या उमेदवार ऊर्मिला मातोंडकर येथील काही प्रश्न हिरिरीने मांडत आहेत..

ऊर्मिला मातोंडकर यांच्यामुळे रंगत आली हे खरे आहे, पण त्यांच्या उमेदवारीमुळे मला अजिबात दडपण आलेले नाही. उलट मी त्यांचे आभार मानेन, कारण त्यांच्यामुळे या मतदारसंघाकडे प्रसारमाध्यमांचे लक्ष वेधले गेले. त्याचा मलाही फायदा झाला.

*  पुढील पाच वर्षे कोणती कामे करणार?

पश्चिम उपनगरात पालिकेची रुग्णालये आहेत. मात्र मध्यम व उच्च मध्यमवर्गीयांकरिता सुपर स्पेशालिटी रुग्णालय नाही. त्यासाठी त्यांना अंधेरी किंवा वांद्रे गाठावे लागते. ते येत्या पाच वर्षांत येथे उभे राहावे यासाठी प्रयत्न करणार आहे. माझा दुसरा भर येथील रहिवाशांना परवडणारी घरे उपलब्ध करून देण्यावर असेल. ‘झोपु’ योजना अनेक झाल्या, परंतु सर्वसामान्यांचा घरांचा प्रश्न सुटलेला नाही. या शिवाय रेल्वे प्रवाशांचे प्रश्न सोडविण्याकरिता प्रयत्नशील राहीन.