जयेश सामंत, भिवंडी

मोदी लाटेत २०१४ मध्ये निवडून आलेल्या भाजपच्या कपिल पाटील यांनी हा मतदारसंघ कायम राखण्यासाठी जोर लावला असला तरी सुमारे चार लाख मुस्लीम मते, ‘आपलं ठरलंय’ हा शिवसेनेचा संदेश या साऱ्यांमुळे भिवंडी मतदारसंघाची लढत चुरशीची झाली आहे.

काँग्रेसने या मतदारसंघातून माजी खासदार सुरेश टावरे यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातील सहाही विधानसभा क्षेत्रांत कपिल पाटील यांच्याबद्दल शिवसैनिकांच्या मनातील नाराजीमुळे पाटील यांची चिंता वाढली आहे. कपिल पाटील यांनी शिवसैनिकांची सपशेल माफी मागितली असली तरी शिवसैनिक त्यांनी पाच वर्षे दिलेली वागणूक विसरण्यास तयार नाहीत.

पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेश करणारे कपिल पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कोटय़वधी रुपयांचे प्रकल्प याच काळात भिवंडी परिसरात सुरू झाले. कल्याण-भिवंडी मेट्रोसाठीही पाटील यांनी प्रयत्न केले होते. त्यामुळे विकासापासून कोसो दूर असलेल्या या मतदारसंघात कधी नव्हे इतका निधी गेल्या पाच वर्षांत राज्य सरकारच्या माध्यमातून पोहचू लागला आहे. पाटील यांच्यासाठी ही उजवी बाजू असली तरी याच काळात स्थानिक राजकारणात शिवसेनेसोबत संघर्ष करताना त्यांनी अनेकदा टोकाची भूमिका घेतली. कोकण, ठाणे पट्टय़ातील भाजपची ही एकमेव जागा आहे. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनीही ही निवडणूक प्रतिष्ठची केली आहे. कोणत्याही परिस्थितीत पाटील निवडणूक आले पाहिजेत असा संदेश त्यांनी पालकमंत्री एकनाथ िशदे यांच्यापर्यंत पोहचविला आहे. शिवसैनिकांचे मात्र नेमक ‘काय ठरलय’ हे अजून गुलदस्त्यात आहे. याच भागात कुणबी मतदारांचा आकडाही मोठा आहे. कुणबी सेनेचे प्रमुख विश्वनाथ पाटील सध्या भाजपसोबत दिसत असले तरी त्यांचा समाजातील मतदारांवर तितकासा प्रभाव राहिला आहे का हेदेखील मतदानाच्या दिवशी स्पष्ट होईल.

काँग्रेसमध्ये नेहमीप्रमाणे उमेदवारीचा घोळ झाला. सुरेश टावरे यांच्या उमेदवारीस विरोध करण्यात आला. शिवसेनेच्या सुरेश म्हात्रे यांना पक्षाने उमेदवारी द्यावी, असा प्रस्ताव होता. पण कपिल पाटील यांच्या विरोधातील नाराजी किंवा मतदारसंघात त्यांनी अनेकांना दुखावलेले असल्याने त्याचा फायदा उठविण्याचा काँग्रेसचे सुरेश टावरे यांचा प्रयत्न आहे.

कपिल पाटील

बलस्थान

* भिवंडी परिसरात विकासकामांची आखणी

* पालकमंत्री एकनाथ शिंदे यांची साथ

* अखेरच्या टप्प्यात भाजपतील राज्यभरातील संघटना भिवंडीत कार्यरत

कच्चे दुवे

* शिवसैनिकांची नाराजी

* मतदारासंघातील अनेक भागांत कमी संपर्क

* एकगठ्ठा मुस्लीम मतांच्या ध्रुवीकरणाची शक्यता

सुरेश टावरे

कच्चे दुवे

* निवडणुकीतील पराभवानंतर मतदारसंघातील अनेक भागांतील संपर्क कमी

* काँग्रेसची कमकुवत संघटना

* नाराजांना वळवण्यात अपयश

बलस्थान

* नाराज शिवसैनिकांची मिळत असलेली छुपी साथ

* काँग्रेसचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष म्हणून असलेला संपर्क, मितभाषी स्वभाव

* भिवंडी महापालिकेतील एकहाती सत्ता