मध्य प्रदेशात आठ जागांवर चुरशीच्या लढती

एक्स्प्रेस वृत्तसेवा, भोपाळ

मध्य प्रदेशातील माळवा-निमार या पट्टय़ात अखेरच्या टप्प्यात आठ मतदारसंघांत होणाऱ्या निवडणुकीत सत्ताधारी काँग्रेस आणि भाजपमध्ये चुरशीच्या लढती होत आहेत. भाजप सरकारच्या काळात शेतकऱ्यांवर झालेला  गोळीबार आणि काँग्रेस सरकारच्या काळातील शेतकऱ्यांची कर्जमाफी हेच प्रचाराचे मुद्दे आहेत. गत वेळी जिंकलेल्या सर्व जागा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत लोकसभेचे आठ मतदारसंघ असलेल्या माळवा विभागात भाजपपेक्षा काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या होत्या. केंद्रातील भाजप सरकार किंवा विद्यमान खासदारांच्या विरोधातील नाराजीचा फटका बसू नये या उद्देशानेच भाजपने सातपैकी पाच खासदारांना पुन्हा उमेदवारी नाकारली आहे. २०१४ मध्ये भाजपने येत्या रविवारी मतदान होत असलेल्या आठही जागा भाजपने जिंकल्या होत्या. पण यापैकी रतलाम मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे कांतीलाल भुरिया यांनी विजय मिळविला होता.

भाजप सरकारच्या काळात मंदसौरमध्ये शेतकऱ्यांवर झालेला गोळीबार आणि त्यात पाच शेतकऱ्यांचा झालेला मृत्यू यावर काँग्रेसने विधानसभा निवडणुकीत प्रचारात भर दिला होता. त्याचा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला फायदाही झाला होता. मध्य प्रदेशात भाजपची सत्ता जाण्यात शेतकऱ्यांवरील गोळीबार हे मुख्य कारण ठरले होते. तसेच सत्तेत आल्यावर शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या आश्वासनाचा फायदा झाला होता. सत्तेत आल्यावर मुख्यमंत्री कमलनाथ यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला असला तरी सर्व शेतकऱ्यांचे कर्ज  माफ झालेले नाही, हा भाजपने प्रचाराचा मुद्दा केला आहे.

शेतकऱ्यांवरील गोळीबारामुळे गाजलेल्या मंदसौर मतदारसंघात भाजप आणि काँग्रेसमध्ये चुरशीची लढत होत आहे. भाजपचे विद्यमान खासदार सुधीर गुप्ता आणि काँग्रेसच्या माजी खासदार मीनाक्षी नटराजन यांच्यात लढत होत आहे. विधानसभा निवडणुकीत मंदसौर लोकसभा मतदारसंघात समाविष्ट आठपैकी सात विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपने विजय मिळविला होता. मंदसौर गोळीबाराचा राज्यात भाजपला फटका बसला असला तरी जेथे गोळीबार झाला त्या मंदसौरमध्ये मात्र भाजपला फटका बसला नव्हता.

इंदूरची जागाही यंदा चांगलीच चुरशीची झाली आहे. भाजपने लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना उमेदवारी नाकारली आहे. याऐवजी शंकर लालवानी यांना उमेदवारी दिली आहे. तेथील प्रचारसभेत पंतप्रधान मोदी यांनी सुमित्राताईंच्या नावाचा सातत्याने उल्लेख केला होता. महाजन यांना उमेदवारी नाकारल्याने नाराजीचा फटका बसू नये म्हणूनच मोदी यांना महाजन यांचे नाव घ्यावे लागले. हा भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पण विधानसभा निवडणुकीत शहरातील आठपैकी प्रत्येकी चार जागा काँग्रेस आणि भाजपला मिळाल्या होत्या. यावरून भाजपला इंदौर तेवढे सोपे नाही हेच स्पष्ट होते.

आरोप आणि प्रत्युत्तरे

माळवा-निमार पट्टय़ात शेती हा मुख्य व्यवसाय आहे. यामुळेच भाजपने काँग्रेस सरकारच्या काळातील फसलेल्या कर्जमाफीच्या योजनेवर प्रचारात भर दिला आहे. कमलनाथ सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेतला असला तरी त्याची पूर्तता केलेली नाही, असा भाजपचा आक्षेप आहे. तर कर्जमाफीची प्रक्रिया सुरू असल्याचे मुख्यमंत्री कमलनाथ यांचे म्हणणे आहे. आतापर्यंत कर्जमाफी झालेल्या शेतकऱ्यांची यादीच कमलनाथ सरकारने भाजपकडे सादर केली असून, कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांमध्ये माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या नातेवाईकांचा समावेश असल्याकडे काँग्रेसने लक्ष वेधले आहे.