नागपूर : काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांनी आक्षेप नोंदवण्यासाठी जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांची मतमोजणी केंद्रात भेट घेतली. यावेळी त्यांच्यासोबत काही कार्यकर्ते तसेच प्रसिद्धी माध्यमांचे प्रतिनिधीही होते. पटोले हे जिल्हाधिकारी यांच्याशी बोलत असताना काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी बघून ते संतापले आणि त्यांनी आवाज वाढवत गर्दी कमी करण्याचे आदेश पोलिसांना दिले.

काँग्रेसच्या उमेदवार प्रतिनिधींनी प्रारंभापासूनच मतमोजणीबाबत आक्षेप घेण्यास सुरुवात केली. उमेदवारांना ईव्हीएमची दिलेली यादी आणि मतमोजणीला आलेल्या ईव्हीएममध्ये तफावत असल्याचे त्यांचे म्हणणे होते. उत्तर आणि दक्षिण नागपूरमधील काही ईव्हीएमचे क्रमांक जुळत नसल्याची त्यांची तक्रार होती, परंतु प्रशासनाने त्याची फारसी दखल घेतली नाही. त्यानंतर काँग्रेसचे प्रतिनिधी अनिल वडपल्लीवार यांनी  उमेदवाराला दिलेल्या यादीनुसार पूर्व नागपुरातील तीन ईव्हीएमचे क्रमांक जुळत नसल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे केली. उपजिल्हाधिकारी यांनी  पूर्व नागपूरच्या सहायक निवडणूक आयुक्त वर्षांराणी भोसले यांना बोलावून घेतले. त्यावर चर्चा झाली. निवडणूक निरीक्षकांनी देखील विषय समजून घेतला. परंतु ही बाब फार महत्त्वाची नसल्याचे उत्तर त्यांच्याकडून मिळाले. वडपल्लीवार बाहेर पडले आणि काँग्रेसच्या आणखी एका प्रतिनिधीने ही बाब नाना पटोले यांना कळवली. पटोले दुपारी तीनच्या सुमारास कळमना मार्केट येथील मतमोजणी केंद्रावर आले. त्यांच्यासोबत नगरसेवक बंटी शेळके, प्रशांत पवार आणि इतर काही कार्यकर्ते होते. पटोले आल्याचे कळताच माध्यम प्रतिनिधी तिकडे धावले. पटोले, कार्यकर्ते आणि वृत्तवाहिन्यांचे प्रतिनिधी मतमोजणी केंद्रात दाखल झाले. केंद्राच्या आत गर्दी बघून जिल्हाधिकारी संतापले आणि सुरक्षा यंत्रणेने सर्वाना बाहेर काढले. यावेळी पटोले म्हणाले, निष्पक्ष मतजोजणी व्हावी, मतांची चोरी होऊ नये, यासाठी आक्षेप घेतला. निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावरची मतांची संख्या आणि मतमोजणी केंद्रावरील मतांची संख्या यात फरक दिसून आला. याचीही तक्रार केल्याचे त्यांनी सांगितले.