दयानंद लिपारे, कोल्हापूर

राज्याच्या राजकारणातील स्थान पूर्ववत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न असला तरी पश्चिम महाराष्ट्रात मात्र काँग्रेसची मोठी कसोटी लागणार आहे. महाआघाडीच्या जागावाटपात काँग्रेसने हक्काची सांगलीची एक जागा गमावली असून, आता केवळ पुणे आणि सोलापूर या दोन जागांवर पक्षाच्या आशा आहेत.

पुण्यातील उमेदवारी जाहीर झाल्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या समाजमाध्यमातील प्रतिक्रिया बऱ्याच बोलक्या आहेत. सोलापुरात देशाचे गृहमंत्रिपद भूषवलेल्या नेतृत्वास घरच्या मैदानात भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर आणि वंचित बहुजन आघाडीचे अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर असा दुहेरी कडवा सामना करावा लागत आहे. हे चित्र पाहता काँग्रेसच्या हाती काय लागणार, याची चिंता काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे.

पश्चिम महाराष्ट्र हा काँग्रेसचा गड म्हणून ओळखला जात होता. पण, राष्ट्रवादीने पक्षस्थापनेनंतर या भागात काँग्रेसला धक्का देत आपले स्थान भक्कम केले. परिणामी, दहा वर्षांपूर्वी उभय काँग्रेसची पहिल्यांदा लोकसभेसाठी आघाडी झाली तेव्हा राष्ट्रवादीच्या वाटय़ाला अधिक मतदारसंघ गेले. काँग्रेसच्या हातात पुणे, सोलापूर आणि सांगली या तीन जागा राहिल्या.

काँग्रेसच्या जागांत घट

गत लोकसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांना लक्ष्य करण्यासाठी राष्ट्रवादीने हातकणंगले हा मतदारसंघ काँग्रेसच्या कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्यासाठी आंदण दिला. शेट्टी विजयी झाले तरी आता त्यांच्याशी घरोबा झाल्याने ही जागा आपसूक स्वाभिमानासाठी सोडली गेली.  इतकेच नव्हे तर शेट्टी यांच्याशी जमवून घेताना कॉंग्रेसला नेहमी साथ देणारी सांगलीची जागाही स्वाभिमानीकडे सोपवण्यात आली. जागावाटपात काँग्रेसला दिलासा इतकाच की, वसंतदादांचे नातू असलेले काँग्रेसचे विशाल पाटील हे स्वाभिमानीची ‘बॅट’ घेऊन मैदानात उतरले आहेत.

महाआघाडीत केवळ दोन जागांवरच बोळवण

कोल्हापूर, हातकणंगले, सातारा, माढा, बारामती, शिरूर, मावळ, अहमदनगर या मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या आशा आता पुणे आणि सोलापूर या दोन जागांवरच खिळल्या आहेत. पुण्यात भाजपचे गिरीश बापट यांना काँग्रेसचे निष्ठावंत गटाचे मोहन जोशी कितपत लढत देणार याची चर्चा काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये आहे. गेल्या निवडणुकीत नवख्या उमेदवाराकडून पराभूत झालेले सुशीलकुमार शिंदे यांना सोलापूर पुन्हा हात देणार का, हा प्रश्न आहे. सुशीलकुमार शिंदे, भाजपचे डॉ. जयसिद्धेश्वर स्वामी आणि तिसऱ्या आघाडीचे डॉ. प्रकाश आंबेडकर अशी तिरंगी लढत लक्षवेधी ठरणार आहे. पश्चिम महाराष्ट्राच्या नकाशात जागांच्या बाबतीत आक्रसत चाललेल्या काँग्रेसला लोकसभा निवडणुकीत कितपत यश मिळणार, यावर विधानसभेचे जागावाटप ठरण्याची चिन्हे असून, काँग्रेसच्या दुसऱ्या कसोटीची सुरुवातही एका अर्थाने आतापासूनच झाल्याचे मानले जात आहे.