लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला असून आरोप-प्रत्यारोपांच्या फैऱ्या झडताना दिसत आहेत. मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष आणि दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार मिलिंद देवरा यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. शिवसेना अल्पसंख्याकांविरोधात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. काही वर्षांपूर्वी शिवसेनेने जैन मंदिराबाहेर मांस शिजवून जैन समाजाचा अपमान केला होता. आता मतदानातून त्यांना धडा शिकवा, असे आवाहन देवरा यांनी केले आहे.

मिलिंद देवरा हे मंगळवारी मुंबई सराफ बाजार संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेनेवर टीका केली. ते म्हणाले, शिवसेनेचा अल्पसंख्याकांना विरोध राहिला आहे. काही वर्षांपूर्वी पर्यषूण पर्वाच्या काळात त्यांनी जैन मंदिराबाहेर मांस शिजवून जैन समाजाचा अपमान केला आहे. हे सर्व मतदान करताना लक्षात ठेवा. मतदानाच्या माध्यमातूनच त्यांना धडा शिकवता येईल.

दरम्यान, संजय निरुपम यांना पदावरुन हटवून काही दिवसांपूर्वीच मिलिंद देवरा यांना मुंबई काँगेसचे अध्यक्षपद देण्यात आले आहे. त्याचबरोबर ते दक्षिण मुंबई मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार आहेत.

मिलिंद देवरा हे दिवगंत काँग्रेस नेते मुरली देवरा यांचे सुपूत्र आहेत. दक्षिण मुंबई हा त्यांचा मतदारसंघ आहे. मतदारसंघ फेररचनेनंतर २००९ साली ते दक्षिण मुंबईतून निवडून लोकसभेवर गेले. त्यावेळी त्यांनी शिवसेनेच्या मोहन रावले यांचा पराभव केला होता. मनसेमुळे मराठी मतांमध्ये झालेल्या मतविभाजनाचा त्यांना फायदा झाला होता. त्यानंतर २०१४ साली मोदी लाटेत शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनी त्यांचा पराभव केला. मिलिंद देवरा यांनी संपुआ दोनच्या कार्यकाळात केंद्रात मंत्रीपद भूषवले आहे. आता मुंबई काँग्रेसमध्ये त्यांना महत्वाची जबाबदारी मिळाली आहे.