सुहास सरदेशमुख, औरंगाबाद

लोकसभा निवडणुकीतील दोन प्रमुख पक्षांचे प्रदेशाध्यक्ष मराठवाडय़ातील. दोघांची राजकारणाची पद्धत निराळी. लोकसंग्रह गोळा करण्याची हातोटीही वेगळी. पण सहकार आणि ग्रामीण भागातील माणसाची नस दोन्ही नेत्यांना माहीत. मतदारसंघ बांधलेले असले तरी तरी दोन्ही मतदारसंघात रोष कधी वाढेल हे गणित सांगता येत नाही. मात्र, दरवेळी या दोन्ही नेत्यांना मतदारांवर प्रभाव टाकण्यात यश येते. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाचव्यांदा निवडणूक लढवित असून त्यांच्या कुटुंबाची संपत्ती ११ कोटी ५२ लाख ८ हजार एवढी आहे. तर कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या कुटुंबाकडे २२ कोटी, ५३ लाख ६६ हजार ४४२ रुपयांची संपत्ती आहे. राजकारणाव्यतिरिक्त अशोक चव्हाण यांची गॅस एजन्सी आहे आणि रावसाहेब मात्र शेती आणि समाजकार्य करतात, असे त्यांच्या शपथपत्रावरुन दिसून येते.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची ही पाचवी निवडणूक. बोलण्यातील इरसालपणामुळे मतदारसंघात आतापर्यंत लोकप्रिय असणारे दानवे यांच्या बोलण्या आणि न बोलण्याच्या वृत्तीमुळेच मतदारसंघात नाराजी होती. त्याचा राजकीय फायदा अर्जून खोतकर यांनी घ्यावा, अशी कॉंग्रेसची इच्छा होती. मात्र, तसे घडले नाही. रावसाहेबांविषयी अनेक किस्से मतदारसंघात आहेत. त्यांचे अनेक व्यावसाय असल्याचेही सांगण्यात येते. मात्र, शपथपत्रातून त्या चर्चेला पूर्ण विराम मिळत आहे. रावसाहेब दानवे यांच्याकडे निवडणुकीपूर्वी असणारी रोकड आहे तीन लाख दोन हजार ७६४ तर पत्नी निर्मला यांच्या नावावर रोख रक्कम अधिक आहे ती चार लाख २५ हजार २५७ एवढी. वेगवेगळय़ा बॅंकामध्ये खाते असणाऱ्या रावसाहेब दानवे यांची स्थावर मालमत्त आहे दोन कोटी आठ लाख ६५ हजार ५००  रुपयांची. त्यांच्या पत्नीच्या नावे ६१ लाख ६७ हजार ५०० एवढी आहे.

एका बाजूला संभाषणात इरसालपणा जपणारे रावसाहेब तर तोलून मापून बोलणारे अशोकराव चव्हाण. दोघांच्या राजकारणाची पद्धत निराळी. पक्ष निराळे पण संपत्तीमध्ये अशोकराव आणि रावसाहेबांमध्ये मोठा फरक. शपथपत्रातील माहितीनुसार अशोक चव्हाण यांच्या कुटुंबाची जंगम मालमत्ता १३ कोटी ७६ लाख ४४ हजार ४९९ एवढी. अशोक चव्हाण आणि त्यांच्या पत्नी अमिता चव्हाण यांची स्थावर मालमत्ता ८ कोटी, ७७ लाख २१ हजार ८५३ इतकी आहे. म्हणजे चव्हाण कुटुंबियांची एकूण मालमत्ता २२ कोटी, ५३ लाख ६६ हजार ४४२ रुपये आहे. स्थावर मालमत्तेचे बाजारमूल्य २७ कोटी १७ लाख ४५ हजार ५९३ एवढे आहे. तर वारस म्हणून त्यांना व त्यांच्या कुटुंबियांना नऊ कोटी, सहा लाख, ४७ हजार ६७२ रुपयांची संपत्ती मिळाली होती. बाजारमूल्य आणि वडिलोपार्जित संपत्तीचा आकडा ३६ कोटी २३ लाख ९३ हजार ३६५ रुपये होतो.

दोन प्रमुख पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मराठवाडय़ातील असल्याने पक्षाचा विजयाचे श्रेय किंवा पराभवाचे खापर मराठवाडय़ाच्या नावावर फुटणार आहे. या दोन्ही नेत्यांमध्ये गंभीर गुन्हय़ामध्ये अशोकरावांच्या गुन्हय़ाचा तपास अजून होणे बाकी आहे. आदर्श, पेड न्यूज अशी त्यांची प्रकरणे गाजली तर रावसाहेब गाजले ते जीभ घसरल्यामुळे. स्वत:ला बारा भोक्क्षाचा पाना म्हणून घेणारे रावसाहेब ‘रडतात साले’ या विधानामुळे अडचणीत आले होते.