पाच वर्षांत संपत्तीत दोन कोटींनी वाढ

पुणे : पुणे लोकसभा मतदार संघातील भाजप, शिवसेना युतीचे उमेदवार गिरीश बापट यांच्याकडे स्थावर आणि जंगम अशी एकूण पाच कोटी ७९ लाख रुपये एवढी मालमत्ता आहे. सन २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीच्या वेळी दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात बापट यांची मालमत्ता तीन कोटी ४८ लाख एवढी होती. गेल्या पाच वर्षांत त्यांच्या मालमत्तेमध्ये दोन कोटी ३१ लाख रुपयांची वाढ झाली आहे.

बापट यांच्याकडे रोख रक्कम ७५ हजार एवढी आहे. तर, पत्नीकडे २८ हजार रुपयांची रोख रक्कम आहे. बापट यांच्या पत्नीकडे १४ बँकांमध्ये १५ लाख २१ हजार रुपयांच्या मुदत ठेवी आहेत. सहा बचत खात्यांमध्ये १६ लाख रुपये आहेत. याशिवाय ३५ हजार ७०० रुपयांचे समभाग असून, आयुर्विमा महामंडळ (एलआयसी) आणि टपाल खात्यामध्ये पाच लाख ७० हजार ९०० रुपयांच्या ठेवी आहेत.

बापट यांच्या विविध १५ बँकांमध्ये मुदत ठेवी असून या मुदत ठेवींची रक्कम ५२ लाख २७ हजार ९३४ रुपये आहे. विविध बचत खात्यांमध्ये त्यांच्या नावावर ३२ लाख २१ हजार १८७ रुपये आहेत. त्यांनी समभागामध्ये १८ हजार ३२० रुपयांची गुंतवणूक केली आहे. टपाल खात्यामध्ये त्यांच्या नावावर १३ लाख ६८ हजार ६१८ रुपयांची रक्कम आहे. बापट यांच्या नावावर चारचाकी चार वाहने असून त्यांच्याकडे एक बजाज स्कूटरही आहे. बापट यांच्याकडे एक लाख ३३ हजार रुपयांचे सोने आहे.

बापट यांच्याकडे अमरावतीला चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी मग्रापूर येथे वारसाहक्काने मिळालेली जमीन आहे. या गावामध्ये त्यांनी एक हेक्टर १९ गुंठे जागा २०१४ मध्ये खरेदी केली आहे. मावळमधील तळेगाव दाभाडे येथे त्यांच्या नावावर जागा असून त्या जागेची बाजारमूल्यानुसार किंमत १६ लाख १३ हजार रुपये आहे. या ठिकाणी २००३ मध्ये १५ गुंठे जागा त्यांनी खरेदी केली असून त्याची किंमत ३५ लाख ४० हजार रुपये आहे. बापट यांच्या नावावर शनिवार पेठेत तीन सदनिका आहेत. तर, बिबवेवाडी येथे एक सदनिका असून सदनिकेची किंमत ७६ लाख २३ हजार रुपये आहे. मुंबईतील अंधेरी भागात राजयोग सोसायटीमध्ये एक सदनिका असून त्या सदनिकेची किंमत एक कोटी २८ लाख ६३ हजार रुपये आहे.

गेल्या निवडणुकीत साडेतीन कोटींची मालमत्ता

बापट यांनी कसबा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढवताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची मालमत्ता तीन कोटी ४८ लाख ४९ हजार २०८ रुपये होती. लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना त्यांनी दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार बापट यांची जंगम आणि स्थावर मालमत्ता पाच कोटी २६ लाख रुपये असून पत्नीच्या नावे ५३ लाख ५४ हजार रुपयांची मालमत्ता आहे.