पश्चिम बंगालमध्ये हिंसाचाराच्या घटना, पंजाबमध्ये कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या व अखेरच्या टप्प्यात ५९ जागांसाठी ६१ टक्क्यांवर मतदान झाले. पश्चिम बंगालमध्ये मतदानाच्या अखेरच्या टप्प्यातही हिंसाचाराच्या घटना घडल्या. तसेच पंजाबमध्ये अकाली-काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. या घटना वगळता उर्वरित मतदान शांततेत झाले. मतदान पूर्ण झाल्यावर आता २३ मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लक्ष आहे.

सातव्या टप्प्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह ९१८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. रविवारच्या मतदानानंतर आता देशभरातील ५४२ जागांवर आठ हजार उमेदवारांचे भवितव्य निश्चित झाले. रविवारी पंजाबमधील सर्व तेरा तसेच उत्तर प्रदेशातील १३, पश्चिम बंगालमधील ९, बिहार व मध्य प्रदेशातील प्रत्येकी ८, हिमाचल प्रदेशातील ४, झारखंडमधील तीन व छत्तीसगढच्या एका जागेचा समावेश आहे. उत्तर प्रदेशात सायंकाळी ५५.५२ टक्के मतदान झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाराणसी मतदारसंघात ५३.५८ टक्के मतदान झाले, तर गोरखपूरमध्ये ५६.४७ टक्के मतदान झाले. उत्तर प्रदेशातील चंडोली मतदारसंघात भाजप व समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. येथून भाजप प्रदेशाध्यक्ष महेंद्रनाथ पांडे रिंगणात आहेत.

सुरक्षा दलांवर आरोप

पश्चिम बंगालमध्ये मतदानादरम्यान हिंसाचाराच्या तुरळक घटना घडल्या. राज्यात ९ जागांसाठी ७३.४० टक्के मतदान झाले. भाजपचे उत्तर कोलकाता मतदारसंघातील उमेदवार राहुल सिन्हा यांच्यावर हातबॉम्ब फेकण्यात आला. पोलिसांनी मात्र हा दावा फेटाळून लावला आहे. मतदान केंद्रात जाण्यापासून रोखण्यात आले, असा आरोप कोलकाता दक्षिणमधील तृणमूल काँग्रेसच्या उमेदवार माला रॉय यांनी केला आहे. कोलकाता व परिसरात चकमकीचे प्रकार घडले. केंद्रीय सुरक्षा दलांनी मतदारांना धमकावल्याचा आरोप तृणमूलने केला आहे.

पंजाबमध्ये हाणामारी

पंजाबमध्ये सर्व १३ जागांसाठी सायंकाळी ५ वाजेपर्यंत ५९ टक्के मतदान झाले. राज्यात पतियाळामध्ये सर्वाधिक ६४ टक्के, तर अमृतसरमध्ये सर्वात कमी ५२ टक्के मतदान झाले. राज्यात काही ठिकाणी मतदान यंत्रांमध्ये बिघाड होण्याचे प्रकार घडले. भटिंडा व गुरुदासपूरमध्ये अकाली-भाजप आघाडी कार्यकर्त्यांची काँग्रेस कार्यकर्त्यांशी चकमक झाली. मध्य प्रदेशात आठ जागांसाठी ६९.३६ टक्के मतदान झाले. झारखंडमध्ये ७० टक्क्य़ांवर मतदान झाले, तर हिमाचलमध्ये सर्व चार जागांसाठी ६७ टक्के मतदान झाले. बिहारमध्ये आठ जागांसाठी ५३. ३६ टक्के मतदान झाले. पहिल्या सहा टप्प्यांमध्ये सरासरी ६६.८८ टक्के मतदान झाले आहे. मतदानाची ही प्रक्रिया ३८ दिवस सुरू होती.

तेजप्रताप यांच्या सुरक्षारक्षकांची छायाचित्रकारांना मारहाण

पाटणा : राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजप्रताप यादव यांच्या खासगी सुरक्षारक्षकांनी रविवारी मतदानादरम्यान दोन छायाचित्रकारांना मारहाण केली. पाटणा साहिब मतदारसंघात मतदान केंद्रावर तेजप्रताप यांनी मतदान केल्यावर माझा घटनात्मक हक्क बजावू की नको, असा सवाल त्यांनी केला. त्या वेळी त्यांच्या वाहनाभोवती अनेक जण जमा झाले. त्यामुळे वाहन बाहेर काढणे कठीण झाले. काही पत्रकार वाहनावर उभे राहिले. त्यादरम्यान वाहनाच्या खिडकीची काच फुटली. त्यामुळे सुरक्षारक्षकांना हस्तक्षेप करावा लागला, असा दावा तेजप्रताप यांनी केला. या घटनेचा पत्रकारांनी निषेध केला.

मध्य प्रदेशात दोन निवडणूक कर्मचाऱ्यांचा मृत्यू

भोपाळ: मध्य प्रदेशात दोन घटनांमध्ये रविवारी निवडणुकीच्या कामावर असलेल्या दोघा कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. धार मतदारसंघातील जलवट मतदान केंद्रावरील गुरुचंद छोगड या कर्मचाऱ्याचा हृदयविकाराने मृत्यू झाला. तर देवास मतदारसंघात अनिल नेमा हा कर्मचारी हृदयविकाराच्या झटक्याने दगावला. मध्य प्रदेशात रविवारी शेवटच्या टप्प्यात आठ मतदारसंघांत शांततेत मतदान झाले.