सोमवारी देशभरात लोकसभा निवडणुकीच्या मतदानाचा पाचवा टप्पा पार पडला. आता अखेरच्या दोन टप्प्यांचे मतदान बाकी आहे. अशातच काँग्रेस आणि भाजपासारख्या राष्ट्रीय पक्षांनी प्रचाराच्या पद्धतीही बदलून त्या अधिकाधिक तीव्र करण्यास सुरूवात केली आहे. जास्तीत जास्त मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी या पक्षांनी जाहिराती, जिंगल्सची मदत घेण्यास सुरूवात केली आहे. त्यातच आता काँग्रेसने ट्विटरवर ‘मै हिंदुस्तान हूँ’ हे अभियान सुरू केले आहे.

गेल्या सत्तर वर्षांमध्ये भारताने प्रत्येक क्षेत्रात प्रगती केली असून प्रत्येक भारतीयाने देशाच्या विकासात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. त्याचीच आठवण करून देत असल्याचे सांगत काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ शेअर केला. दरम्यान, महाराष्ट्र काँग्रेसनेही ट्विट करत स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशातील प्रतिष्ठित संस्थांची पायाभरणी केली आणि देशाला महाशक्ती बनवण्याचा मार्ग दाखवला असल्याचे म्हटले आहे.

यापूर्वी काँग्रेसने ‘अब होगा न्याय’ या जाहिरातीद्वारे केंद्र सरकारवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आता पुन्हा एकदा ट्विटरवरून मै हिंदुस्तान हूँ म्हणत देशवासीयांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. या मोहिमेत न्याय योजना, गरिबी, रोजगार, शेतकऱ्यांचे प्रश्न, महिलांचे प्रश्न, जीएसटी आणि शिक्षणाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. तसेच काँग्रेसच्या अनेक कार्यकर्त्यांनीही काँग्रेसने गेल्या सात दशकांपासून केलेल्या विकासकामांची माहिती ट्विटरवरून शेअर केली आहे.

काँग्रेसने न्याय योजनेद्वारे देशातील पाच कोटी गरीब कुटुंबाना वर्षाला ७२ हजार रुपये बँक खात्यात जमा करण्याचे आश्वासन यापूर्वीच दिले होते. त्यामुळे आता आगामी काळात काँग्रेसच्या या नव्या अभियानाचा किती फायदा होईल, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.