अनिकेत साठे, नाशिक

मुख्यत्वे शेतीवर अवलंबून असणाऱ्या दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आपले वर्चस्व कायम राखण्यासाठी भाजपने संपूर्ण शक्ती पणाला लावली आहे. विरोधक कांद्यासह कृषिमालाचे घसरते दर, ‘एचएएल’वरील संकट आणि महाराष्ट्राचे पाणी गुजरातला देण्याच्या मुद्दय़ावरून भाजपची कोंडी करण्याच्या प्रयत्नात आहेत. यामुळे भाजपला राष्ट्रवादाचा मुद्दा मांडून विरोधकांचे आक्षेप खोडावे लागत आहेत.

दिंडोरीत महायुतीच्या डॉ. भारती पवार, महाआघाडीचे धनराज महाले आणि माकपचे जिवा पांडू गावित यांच्यात मुख्य लढत होत आहे. आकाराने मोठय़ा असणाऱ्या मतदारसंघात मतदारांपर्यंत पोहोचणे उमेदवारांसाठी जिकिरीचे ठरत आहे. कांदा, द्राक्षांसह कृषिमाल उत्पादित करणाऱ्या परिसरात हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडचा लढाऊ विमानांचा कारखाना आहे. सुरगाणा तालुक्यातील पावसाचे पाणी पश्चिमी वाहिनी नद्यांमधून गुजरातमध्ये वाहून जाते. महाराष्ट्र-गुजरातमधील पाणी वाटपाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कृषिमालाच्या दरावरून आजवरची आंदोलने, महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला देण्याच्या विरोधात माकपचा मोर्चा, ‘एचएएल’चे काम हिरावल्याचा आक्षेप या सर्वाचे प्रतिबिंब प्रचारात उमटले आहे. भाजपने ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. खासदार हरिश्चंद्र चव्हाणांना वगळून भाजपने डॉ. पवार यांना संधी देत राष्ट्रवादीला नामोहरम करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. विरोधकांच्या तिखट प्रचाराला तोंड देण्यासाठी भाजपने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे आयोजन करत शक्तिप्रदर्शन केले. त्यांच्या सभेत आंदोलन होऊ नये म्हणून यंत्रणेने खबरदारी घेतली होती. दहशतवादविरोधातील लढाईत काँग्रेसचे घाबरट धोरण भाजपने बदलल्याचे मोदी यांनी सांगितले.

‘राष्ट्रवादा’च्या भावनेला हात घालण्याबरोबरच पंतप्रधानांना स्थानिक विषयांवर भूमिका मांडावी लागली. कृषिमालास सरकारने हमीभाव दिला. महाराष्ट्राचे पाणी गुजरात पळवून नेण्याच्या आरोपांमध्ये तथ्य नाही, अशी ग्वाही त्यांच्यासह मुख्यमंत्र्यांनी दिली. ओझरच्या ‘एचएएल’ कारखान्याला काम कमी पडू दिले जाणार नाही, पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत पाच एकर जमिनीची अट काढून सर्व शेतकऱ्यांना मदत आदी आश्वासने मोदी यांनी दिली आहेत. पंतप्रधानांप्रमाणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेही शेतकऱ्यांसाठी राबविलेल्या योजना मांडून विरोधकांवर टिकास्त्र सोडत आहेत.

पंतप्रधानांसह अन्य भाजप नेत्यांना या मतदारसंघात इतके गांभीर्याने लक्ष घालावे लागण्याचे कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचार तंत्रात आहे. ‘पुलोद’ सरकारच्या काळात या भागाने पवारांना साथ दिली होती. शेती, शेतकऱ्यांशी निगडित प्रश्नांवर त्यांचा अभ्यास सर्वश्रुत आहे. आघाडीच्या प्रचाराची धुरा मतदारसंघात प्रामुख्याने तेच सांभाळत आहेत. कांद्यासह कृषिमालाच्या प्रश्नांवर रोख ठेवून पवारांनी प्रचारात भाजपवर हल्ल्याचे धोरण कायम ठेवले आहे. आपल्या कृषिमंत्रिपदाच्या काळात चांगला भाव मिळण्यासाठी घेतलेले निर्णय ते कथन करतात. दुसरीकडे मोदी सरकारच्या काळात भाव नसल्याने शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाकडे लक्ष वेधतात. महाराष्ट्राच्या हक्काचे पाणी गुजरातला दिले जात असून राफेलचे काम अंबानीला दिल्याने ‘एचएएल’चे काम हिरावले गेले हे राष्ट्रवादी आक्रमकपणे मांडत आहे. माकपने आपल्या शेकडो कार्यकर्त्यांच्या मदतीने संपूर्ण मतदारसंघ पायी पिंजून काढण्यावर भर दिला आहे. गावित यांच्यासह माकप नेते महाराष्ट्र-गुजरात पाणी वाटप करारामुळे होणाऱ्या नुकसानीकडे लक्ष वेधत आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात राष्ट्रवादापेक्षा स्थानिक मुद्दय़ांना महत्त्व आल्याचे चित्र आहे.

भाजपला पवारांचा धसका

पंतप्रधानांसह अन्य भाजप नेत्यांना या मतदारसंघात इतके गांभीर्याने लक्ष घालावे लागण्याचे कारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या प्रचार तंत्रात आहे. आघाडीच्या प्रचाराची धुरा मतदारसंघात प्रामुख्याने तेच सांभाळत आहेत. कांद्यासह कृषिमालाच्या प्रश्नांवर रोख ठेवून पवारांनी प्रचारात भाजपवर हल्ल्याचे धोरण कायम ठेवले आहे. आपल्या कृषिमंत्रिपदाच्या काळात चांगला भाव मिळण्यासाठी घेतलेले निर्णय ते कथन करतात. दुसरीकडे मोदी सरकारच्या काळात भाव नसल्याने शेतकऱ्यांवर ओढवलेल्या संकटाकडे लक्ष वेधतात.