ऐरोली, बेलापूरमधून शिवसेनेला चांगले मताधिक्य

जयेश सामंत, ठाणे पाच वर्षांपूर्वी केंद्र आणि राज्यात आलेल्या मोदी लाटेनंतरही नवी मुंबई महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता शाबूत राखून ऐरोली विधानसभा मतदारसंघही आपल्या ताब्यात ठेवणारे गणेश नाईक यांना यंदाच्या लोकसभा निकालांनी धोक्याचा इशारा दिला आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांना नवी मुंबईतील ऐरोली मतदारसंघातून ४१ हजार आणि बेलापूर मतदारसंघातून ३९ हजार मताधिक्य मिळाले. निवडणुकीपूर्वीपासूनच शिवसेनेच्या नेत्यांनी नाईक यांच्या बालेकिल्ल्यातूनही चांगली आघाडी घेऊ, असा दावा केला होता. तो खरा ठरल्याने आगामी विधानसभा निवडणूक आणि त्यापाठोपाठ येणारी महापालिका निवडणूक नाईक यांच्यासाठी कठीण जाण्याची शक्यता आहे.

ठाणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी पाच ठिकाणी शिवसेना-भाजपचे आमदार असून नवी मुंबईतील ऐरोली या एकमेव मतदारसंघात राष्ट्रवादीचे संदीप नाईक हे आमदार आहेत. मागील पाच वर्षांत या मतदारसंघातील जवळपास प्रत्येक शहरात काँग्रेस, राष्ट्रवादीची वाताहत झाल्याने माजी मंत्री गणेश नाईक यांनी पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या आग्रहानंतरही लोकसभेची निवडणूक लढविणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती. त्यामुळे राष्ट्रवादीने ऐनवेळेस या ठिकाणाहून माजी खासदार आनंद परांजपे यांना रिंगणात उतरविले. हा मतदारसंघ  शिवसेना-भाजप युतीचा बालेकिल्ला असला तरी नवी मुंबईत युतीची डाळ शिजू देणार नाही असा चंग माजी मंत्री गणेश नाईक यांनी सुरुवातीपासून बांधला होता. नवी मुंबईतून परांजपे यांना मताधिक्य मिळवून देण्यासाठी त्यांनी कंबर कसली होती. साडेचार वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकीत बेलापूर मतदारसंघातून नाईक यांना निसटता पराभव पत्करावा लागला होता. हा मोदी लाटेचा परिणाम असल्याने यंदा चित्र बदलले आहे असा नाईकांचा दावा होता. ‘विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून लोकसभा निवडणुकीकडे पाहिीले जाईल. त्यामुळे माझे नेतृत्व नवी मुंबईत हवे असेल तर ऐरोली आणि बेलापूरमधून परांजपे यांना मताधिक्य मिळवून द्या,’ असे भावनिक आवाहन नाईक मतदानाच्या दिवसापर्यंत आपल्या समर्थकांना करत होते.

ऐरोली विधानसभा मतदारसंघातही नाईक यांचे पुत्र आमदार संदीप नाईक यांनी सूत्रबद्ध प्रचारयंत्रणा राबवली. या मतदारसंघातून शिवसेनेचे नेते विजय चौगुले यांची पक्षनेतृत्वावरील नाराजी राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडेल असा अंदाज राजकीय निरीक्षकांकडून बांधला जात होता. प्रत्यक्षात मात्र ऐरोली आणि बेलापूर या दोन्ही मतदारसंघांत अगदी पहिल्या फेरीपासून आनंद परांजपे यांना मोठी पिछाडी सहन करावी लागल्याने नाईकांनाही मोठा धक्का बसला आहे.

लोकसभा निवडणुकीतील या निकालामुळे नाईक यांच्यापुढे बेलापूर आणि ऐरोली या दोन्ही विधानसभा मतदारसंघांतील आपले वर्चस्व पुन्हा मिळवण्याचे आव्हान आहे. पुढच्या वर्षी नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकाही होत आहेत. मतदारांचा कल शिवसेना-भाजप युतीकडे राहिल्यास पालिका निवडणुकीतही नाईक व पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

आव्हाडांनाही धोक्याची घंटा

कल्याण लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा विजय सुरुवातीपासून निश्चित मानला जात होता. असे असले तरी कळवा-मुंब्रा या जितेंद्र आव्हाडांच्या विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादीने आघाडीची आशा बाळगली होती. मात्र, मुंब्र्यातील ठरावीक पट्टा सोडला तर कळव्यातही शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी पहिल्या फेरी पासून मोठे मताधिक्य मिळवले. गेल्या पाच वर्षांत कळव्यातील वेगवेगळ्या विकासकामांच्या मुद्दय़ावरून आव्हाड आणि शिंदे यांच्यात नेहमीच संघर्ष पाहिला मिळाला. कळव्यातील मताधिक्यामुळे पुढील काळात हा संघर्ष टोकाला पोहोचण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.