मुस्लीम मतदारांसाठी मेनका गांधी यांचा ‘फतवा’

असद रेहमान, लखनऊ

लोकसभा निवडणुकीत माझा विजय निश्चित आहे, पण मुस्लीम मतदारांनी मला मते दिली नाहीत तर खासदार झाल्यावर मी त्यांची कामे करणार नाही, अशी उघड धमकी सुल्तानपूर येथील भाजप उमेदवार आणि केंद्रीय मंत्री मेनका गांधी यांनी गुरुवारी दिली.

मेनका यांचे गुरुवारचे हे भाषण समाजमाध्यमांवरून आणि वृत्तवाहिन्यांवरून शुक्रवारी मोठय़ा प्रमाणात प्रसारित झाले. या भाषणात मेनका म्हणाल्या की, ‘‘मी जिंकणार आहेच. पण या विजयात मुस्लीम मतदारांचा वाटा नसेल, तर तर मला बरं वाटणार नाही. मी स्पष्ट सांगते, माझे मन दुखावते. मग कोणी मुसलमान नोकरी मागण्यासाठी माझ्याकडे आला तर मी म्हणते, जाऊ दे. नाहीतरी याचे काम करून काय फायदा आहे? कारण नोकरी हीसुद्धा शेवटी सौदेबाजीच असते की नाही?’’

‘‘आम्ही महात्मा गांधी यांच्या पोटी जन्माला आलेलो नाही की आम्ही केवळ तुम्हाला देतच राहू, देतच राहू आणि नंतर निवडणुकीत मार खातच राहू! विजयी झाल्यानंतरही तुम्हाला माझी गरज लागेल, पण त्यासाठी तुम्हाला आतापासूनच पायाभरणी करावी लागेल. अर्थात मला मत देऊनच त्याची सुरुवात होईल. तुमच्या मतदानकेंद्राचा निकाल आला की मग मला पडलेली मते मी पाहीन, ती जर ५० किंवा १०० असतील तर मग तुम्ही माझ्याकडे कामाला याल तेव्हा मीसुद्धा विचार करीन’’, असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. मी तुमच्या पाठबळावर किंवा तुमच्याशिवायही ही निवडणूक जिंकणार आहे. मग मी जर मैत्रीचा हात पुढे करीत आहे, तर तुम्ही तो का स्वीकारत नाही. हवंतर पीलभीतच्या जनतेला माझ्याविषयी विचारा, असंही त्या म्हणाल्या.

उत्तर प्रदेशचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी ब्रह्म रामदेव तिवारी यांनी ‘एक्स्प्रेस वृत्तसेवे’ला सांगितले की, या भाषणाची आम्ही दखल घेतली आहे. तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडून आम्ही अहवाल मागितला आहे. तो आल्यानंतर कारवाईचा विचार केला जाईल.’’

जिल्हा दंडाधिकारी दिव्यप्रकाश गिरी यांनी सांगितले की, जिल्हा प्रशासनाने मेनका यांना नोटीस पाठवली असून त्यांच्या उत्तराची आम्ही वाट पहात आहोत.

* सुल्तानपूरमध्ये १७ लाख ५७ हजार मतदारांपैकी सुमारे ४ लाख मतदार मुस्लीम आहेत.

* ज्या गावी मनेका यांची सभा झाली त्या गावी साडेतीन हजार मतदारांपैकी दोन हजार मुस्लीम मतदार आहेत.