सहारनपूर येथील देवबंद येथे सपा-बसपा आणि रालोदच्या पहिलीची संयुक्त प्रचारसभा वादात अडकली आहे. या सभेत बसपा प्रमुख मायावती यांनी भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींवर आक्रमक शब्दांत टीका केली. पण त्यांचे भाषण वादाचा विषय ठरला आहे. प्रचारसभेत त्यांनी थेट मुसलमानांना संबोधित करत मतदानाचे अपील केले आहे. त्यानंतर उत्तर प्रदेशच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी याची दखल घेत स्थानिक प्रशासनाला अहवाल मागितला आहे. मायावती यांनी आपल्या भाषणात म्हटले होते की,’ मी खास मुस्लिम समाजातील लोकांना सांगू इच्छिते की तुम्ही भावनेच्या भरात, नातेसंबंधाच्या गोष्टीत अडकून मतदान करू नका. एकगठ्ठा मतदान महाआघाडीला केले पाहिजे.’

मायावती यांनी सभेत विशेषत: मुस्लिमांना खास आवाहन करत काँग्रेसला मतदान न करता फक्त महाआघाडीला मतदान केले तरच भाजपा सत्तेबाहेर जाऊ शकते असे म्हटले. त्या म्हणाल्या, ‘येथे पश्चिम उत्तर प्रदेश आणि विशेषत सहारनपूर, मेरठ, मुरादाबाद आणि बरेली मंडळात मुस्लिम समाजाची लोकसंख्या मोठ्याप्रमाणात आहे. मी खास करुन मुस्लिम समाजाला सांगू इच्छिते की, त्यांनी सावध राहावे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस भाजपाला टक्कर देण्याच्या स्थितीत नाही. यासाठी महाआघाडीलाच मतदान करा.’

काँग्रेसने जाणूनबुजून विशिष्ट समाजातील लोकांना तिकीट दिले आहे. याची काँग्रेसलाही जाणीव आहे. आम्ही जिंकू किंवा पराभूत होऊ पण महाआघाडीचा विजय झाला नाही पाहिजे, अशी काँग्रेसची निती आहे. त्यामुळे काँग्रेसने अशा जाती आणि धर्माच्या लोकांना निवडणुकीला उभे केले आहे की त्याचा फायदा भाजपाला होईल.