टी-शर्ट, बिल्ला आणि सेंटच्या कुपीवर मोदींची छबी

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधानपदी बसवण्याचा विडा उचललेल्या भाजपने राज्यभरातील आपल्या जवळपास ९० हजार बूथप्रमुखांसाठी टी-शर्ट, टोपीपासून ते अगदी उन्हातान्हात प्रचार करून घाम आल्यावर प्रसन्न वाटावे म्हणून सुवासिक सेंटची कुपी अशा वस्तूंचा समावेश असलेले ‘मोदी-किट’ दिले असून त्यातील जवळपास प्रत्येक वस्तूवर नरेंद्र मोदी यांची छबी झळकत आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपच्या संकल्पपत्रावर केवळ नरेंद्र मोदी यांची छबी झळकत आहे. तोच कित्ता भाजपच्या प्रचार साहित्याची निर्मिती करतानाही वापरण्यात आला आहे. मोदी यांचे नाव आणि छबी मतदारांच्या मनावर सतत बिंबावी यासाठी घरोघरी जाऊन मतदारांशी संपर्क साधणाऱ्या बूथप्रमुखांना हे किट देण्यात आले आहे. मतदानाच्या दिवशी आपल्या भागातील घराघरांतून मतदारांना बाहेर काढण्याची जबाबदारीही या बूथप्रमुखांवर आहे.

बूथप्रमुखांना देण्यात येणाऱ्या या किटमध्ये टीशर्ट, टोपी, उपरणे, हातात रबर बँड, छातीवर बिल्ला, सेंटची कुपी आदी साहित्य आहे. टोपी, उपरण्यावर भाजपचे निवडणूक चिन्ह असलेले कमळ आहे. तर टीशर्ट, बिल्ला आणि अगदी सेंटच्या कुपीवरही मोदींचे चित्र छापण्यात आले आहे. शिवाय तोंडावर लावण्यासाठी त्यांना मोदींच्या छबीचा मुखवटाही देण्यात आला आहे. त्यामुळे एखादा बूथप्रमुख हे सर्व परिधान करून प्रचाराला निघाला की कमळ आणि मोदी यांचा भडिमार मतदारांवर होणार आहे. अशा अतिआक्रमक प्रचारातून मतदारांना भाजपशिवाय दुसरे काही सुचणारच नाही, अशी भाजपची भावना आहे. आता मतदारांना या प्रचाराची भुरळ पडते की या माऱ्यामुळे अतिरेकाचा वीट येऊन उलट परिणाम होतो, याची चर्चाही रंगली आहे.