24 January 2020

News Flash

विकास कुठे दिसलाच नाही !

गोराई, देवीपाडासारख्या भागात मला विकास कुठेच दिसला नाही.

ऊर्मिला मातोंडकर, काँग्रेस

ऊर्मिला मातोंडकर, काँग्रेस

उत्तर मुंबई

*  विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्या कामगिरीबाबत काय मत आहे?

इथले खासदार गोपाळ शेट्टी यांच्या नावामागे कार्यसम्राट, उद्यानसम्राट अशा वेगवेगळ्या उपाध्या लावल्या जातात, परंतु त्यांना या उपाध्या मिळाव्या असे कोणतेही काम मला या ठिकाणी झालेले दिसून आले नाही. गेले काही दिवस प्रचाराच्या निमित्ताने मी इथला कोपराकोपरा पिंजून काढला. गोराई, देवीपाडासारख्या भागात मला विकास कुठेच दिसला नाही. जी काही उद्याने शेट्टी यांनी विकसित केली त्याचा व्यावसायिक वापरच जास्त होत आहे. कार्यकर्त्यांची सोय करण्यासाठी त्यांनी या क्लब, जिमखान्यांचा वापर केला आहे. सार्वजनिक जागेवरील ही महागडी मनोरंजन स्थळे सर्वसामान्यांकरिता नाहीत. रहिवाशांकरिता मोठय़ा योजना तर सोडूनच द्या पाणी, चांगले रस्ते, पदपथ, शौचालये अशा मूलभूत गरजाही पूर्ण झालेल्या नाहीत. येथील काही भागांत रात्री दोन वाजता उठून पाणी भरावे लागते.

*  मुंबईतील सर्वात महत्त्वाचा रेल्वे किंवा वाहतूक प्रश्न  सोडविण्यासाठी काय योजना आहे?

पायाभूत सुविधांवर भर दिला न गेल्याने येथील वाहतुकीची समस्या बिकट झाली आहे. येथील अनेक रस्ते अजूनही कच्चे आहेत. काही ठिकाणी रस्त्यांच्या रुंदीकरणाचे काम व्हायला हवे. जेणेकरून वाहतुकीच्या समस्या सुटण्यास मदत होईल. रेल्वे प्रवाशांकरिता उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्या वाढविणे, रेल्वे प्रवाशांना उत्तम सुविधा उपलब्ध करून देणे, बोरिवलीहून कर्जत, कसारा लोकल सुरू करणे, हार्बर उपनगरी गाडय़ा बोरिवलीपर्यंत करणे यावर माझा भर राहील.

*  मतदारांनी तुम्हालाच मते का द्यावी?

काँग्रेसने कधीच कुठल्या जात, पंथ, धर्म यांची कास धरून काम केले नाही. या मतदारसंघात जिथे संधी मिळेल तिथे काँग्रेसने विकासाची कामे केली आहेत. परंतु खालपासून वपर्यंत सत्ता असलेल्या भाजपने इथे फक्त विकासाचा डंका पिटला आहे. इथल्या रहिवाशांकरिता केलेले ठोस काम कुठेच दिसून येत नाही. इथे इतके मागास वस्त्या आहेत की त्या मुंबईचा भागही वाटत नाहीत. म्हणून या ठिकाणी काम करण्यास खूप वाव आहे. येथील लोकांसाठी मला माझी ताकद, क्षमता वापरायची आहे. आतापर्यंत हाती घेतलेले प्रत्येक काम मी निष्ठेने केले आहे. निवडून आले तर इथल्या रहिवाशांकरिता मी त्याच निष्ठेने झटेन.

*  पुढील पाच वर्षे कोणती कामे करणार?

इथले मूलभूत प्रश्न म्हणजे पाणी, शौचालये, रस्ते रुंदीकरण या प्रश्नांवर माझा भर राहील. याबरोबर महिलांचे आरोग्य सुधारावे यासाठी प्रयत्न करेन. पर्यावरण रक्षण, गावठाण व कोळी वाडय़ांच्या रहिवाशांना व तथाकथित वनजमिनीवरील आदिवासींना त्यांच्या राहत्या ठिकाणी नागरी सुविधा देण्यासाठी प्रयत्न करेन.

First Published on April 24, 2019 2:26 am

Web Title: lok sabha election 2019 north mumbai constituency congress candidate urmila matondkar
Next Stories
1 तीन न्यायाधीशांची चौकशी समिती
2 राष्ट्रवादीने इंजिन भाडय़ाने घेतले!
3 पत्रकबाजीतून निरुपम यांना अप्रत्यक्ष पाठिंबा
Just Now!
X