नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी २०१४ च्या निवडणुकीच्या वेळी पदवीधर असल्याचे प्रतिज्ञापत्रामध्ये नमूद केले होते, मात्र या वेळी त्यांनी केवळ १२ वी उत्तीर्ण असल्याचे नमूद केले आहे. इराणी पदवीधर नसल्याचे स्पष्ट झाले असल्याने काँग्रेसने ‘क्योंकि मंत्रीजी भी कभी ग्रॅज्युएट थी’ असा टोला लगावला आहे.

इराणी यांनी निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये केवळ १२ वी उत्तीर्ण असल्याचे म्हटले आहे. त्यांनी १९९१ मध्ये शालान्त परीक्षा आणि १९९३ मध्ये सीनिअर सेकंडरी परीक्षा उत्तीर्ण केल्याचे म्हटले आहे. तर दिल्ली विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओपन लर्निगमधून त्यांनी तीन वर्षांच्या पदवी अभ्यासक्रमात बी.कॉमचा भाग-१ पूर्ण केलेला नाही असे त्यांनी प्रतिज्ञापत्रामध्ये म्हटले आहे. लोकसभेच्या गेल्या निवडणुकीच्या वेळी मात्र इराणी यांनी १९९४ मध्ये विद्यापीठातून पदवी घेतल्याचे म्हटले होते.

स्मृती इराणी खोटारडय़ा, शैक्षणिक पात्रतेचे खोटे दाखले दिले! काँग्रेसचा आरोप

नवी दिल्ली : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी खोटारडय़ा आहेत, त्यांनी आपल्या शैक्षणिक पात्रतेचे खोटे दाखले दिले आहेत आणि निवडणूक आयोगाकडे परस्परविरोधी प्रतिज्ञापत्रे सादर केली असल्याने त्यांना अपात्र ठरविण्यात यावे, अशी मागणी शुक्रवारी काँग्रेसने केली.

काँग्रेसच्या प्रवक्त्या प्रियंका चतुर्वेदी यांनी येथे  पत्रकार परिषदेत स्मृती इराणी यांच्या ‘क्योंकि सास भी कभी बहू थी’ या मालिकेचा उल्लेख केला. त्या मालिकेच्या शीर्षक गीतामधील ‘रिश्तों के भी रूप बदलते है’ या ओळींऐवजी ‘क्वालिफिकेशन के रूप बदलते है’, असे विडंबन करून चतुर्वेदी यांनी इराणी यांच्यावर जोरदार टीका केली.

दिल्ली विद्यापीठातून आपण पदवीचे शिक्षण पूर्ण केलेले नाही, असे इराणी यांनी निवडणूक आयोगाकडे स्पष्ट केल्यानंतर त्यांच्यावर काँग्रेसने त्यांना लक्ष्य केले.  इराणी पदवीधर नाहीत, या विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या दाव्याचे इराणी खंडन करीत होत्या, मात्र आपण पदवीचे शिक्षण पूर्ण केले नसल्याचे त्यांनी गुरुवारी मान्य केले, असे चतुर्वेदी म्हणाल्या.

आपल्या शैक्षणिक पात्रतेबद्दल प्रतिज्ञापत्राद्वारे जनतेची दिशाभूल केल्याने त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि त्यांना निवडणूक लढण्यास अपात्र घोषित करावे, अशी मागणी चतुर्वेदी यांनी केली  आहे. इराणी पदवीधर नाहीत हा प्रश्न नाही, तर त्यांनी न्यायालयात शपथेवर सातत्याने खोटे वक्तव्य केले हा प्रश्न आहे, त्यामुळे जनताच त्यांना राजकीय उत्तर देईल, असेही चतुर्वेदी म्हणाल्या.