मऊ (उ. प्रदेश)/ मंदिर बाजार (प. बंगाल)

ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याच्या तोडफोडप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध पेटले आहे.

विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडतोड तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी केल्याचा आरोप करून पंतप्रधान मोदी यांनी विद्यासागर यांचा भव्य पुतळा त्याच जागेवर उभारण्याचे आश्वासन दिले, तर पुतळ्याची तोडफोड भाजपच्याच गुंडांनी केली असून तो उभारण्यासाठी त्यांच्या पैशांची गरज नाही, असे प्रत्युत्तर ममता यांनी दिले आहे.

ईश्वरचंद्र विद्यासागर हे १९व्या शतकातील विद्वान होते. अमित शहा यांच्या कोलकात्यातील रोड शोदरम्यान भाजप आणि तृणमूल कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धुमश्चक्रीत विद्यासागर यांच्या पुतळ्याची तोडफोड झाली होती.

त्याच जागेवरभव्य पुतळा उभारू : मोदी

मऊ (उत्तर प्रदेश) : कोलकातामध्ये तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली त्याच ठिकाणी विद्यासागर यांचा भव्य पुतळा उभारण्यात येईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी येथे जाहीर केले.

ममता बॅनर्जी यांची वृत्ती कशी आहे त्याचा आम्हाला दीर्घकाळापासून अनुभव आहे आणि आता देशही ते पाहत आहे. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचा पंचधातूचा पुतळा आम्ही कोलकातामध्ये त्याच ठिकाणी उभारून तृणमूल काँग्रेसच्या गुंडांना सडेतोड उत्तर देऊ, असेही मोदी यांनी येथे एका निवडणूक जाहीर सभेत सांगितले.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड-शोच्या वेळी तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड केली. ज्यांनी हे कृत्य केले त्यांना कडक शिक्षा केली जाईल, असे मोदी म्हणाले. मंगळवारी रोड-शोच्या वेळी कोलकातामध्ये हिंसाचाराचा उद्रेक झाला होता. त्या वेळी पुतळ्याची मोडतोड करण्यात आली होती. आपण डमडम येथे सभेसाठी जाणार आहोत, मात्र पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आपल्या हेलिकॉप्टरला उतरण्याची परवानगी देतील का, याबाबत साशंकता आहे, असा टोला मोदी यांनी लगावला.

‘पुतळा विटंबनेचे पुरावे नष्ट करण्याचे प. बंगाल सरकारचे प्रयत्न’

मथुरापूर (प. बंगाल) : कोलकात्यात ईश्वरचंद्र विद्यासारगर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याच्या घटनेचा पुरावा नष्ट करण्याचा पश्चिम बंगाल पोलीस राज्य सरकारच्या संगनमताने प्रयत्न करत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी केला.

आपला पराभव अटळ असल्याचे पाहून निराश झालेल्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणुकांनंतर आपल्याला तुरुंगात पाठवण्याची धमकी दिली असल्याचे मोदी यांनी निवडणूक प्रचारसभेत सांगितले.

तृणमूल काँग्रेसच्या गुंडांनीच विध्वंसक कृत्ये केलेली असून, त्यांनीच ईश्वरचंद विद्यासागर यांच्या पुतळ्याची विटंबना केली आहे. तृणमूलच्या गुंडांना संरक्षण देण्यासाठी पश्चिम बंगाल पोलीस या घटनेचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. तृणमूल व त्यांच्या गुंडांनी पश्चिम बंगालला नरक बनवले आहे, असा दावा मोदी यांनी केला.

पुतळ्याच्या विटंबनेत सहभागी असलेल्या गुन्हेगारांना जरब बसेल अशी शिक्षा दिली पाहिजे, असे मोदी यांनी  सांगितले.

पराभव अटळ असल्याचे दिसत असल्याने दीदींचा संयम संपला आहे. त्या इतक्या निराश झाल्या आहेत, की त्या मला गजाआड करण्याची धमकी देत आहेत, असे पंतप्रधान म्हणाले. आत्या- भाचा यांना केवळ पश्चिम बंगाल लुटण्यात स्वारस्य आहे, अशी कोपरखळी त्यांनी ममता बॅनर्जी यांचे पुतणे व तृणमूलचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांना उद्देशून मारली.

भाजपच्या पैशांची गरज नाही : ममता

मंदिरबाजार (पश्चिम बंगाल) : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड-शोच्या वेळी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या पुतळ्याची मोडतोड करण्यात आली, मात्र नवा पुतळा उभारण्यासाठी पश्चिम बंगालला भाजपच्या पैशांची गरज नाही, असे प्रत्युत्तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दिले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यासागर यांचा नवा पुतळा उभारण्याचे आश्वासन एका जाहीर सभेत दिले आहे, मात्र आपण भाजपचे पैसे का घ्यायचे, असा सवाल बॅनर्जी यांनी येथे एका जाहीर सभेत केला.

पुतळ्यांची मोडतोड करण्याची भाजपला सवयच आहे. त्रिपुरामध्येही त्यांनी तसेच केले होते, असे बॅनर्जी म्हणाल्या. भाजपने पश्चिम बंगालचा २०० वर्षे जुना वारसा नष्ट केला आहे, त्या पक्षाला जे पाठिंबा देत आहेत त्यांना समाज स्वीकारणार नाही, असेही त्या म्हणाल्या.