काँग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात देशद्रोहाचे कलम मागे घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्यांच्या या घोषणेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सडकून टीका केली आहे. अरुणाचल प्रदेशमधील पासीघाट येथील एका सभेत बोलताना त्यांनी काँग्रेस देशाबरोबर आहे की देशद्रोहींबरोबर आहे, असा सवाल केला. काँग्रेसने देशाबद्दल अपशब्द वापरणाऱ्यांसाठी एक योजना बनवली आहे. ‘भारत तेरे टुकडे होंगे’ ही घोषणा देणारे, तिरंगा जाळणारे आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे विद्रुपीकरण करणाऱ्यांबाबत काँग्रेसला सहानुभूती आहे. भारताचे संविधान न माननाऱ्यांनाही वाचवण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले आहे.

काँग्रेसचे घोषणापत्र हे ‘ढकोसलापत्र’ असल्याची टीका त्यांनी केली. एकीकडे निश्चयी सरकार आहे तर दुसरीकडे खोटी आश्वासने देणारे नामदार आहेत. त्यांच्या जाहीरनाम्यात सर्व फसवी आश्वासने आहेत. त्यांना जाहीरनामा नव्हे तर ‘ढकोसलापत्र’ म्हटले पाहिजे, असे ते म्हणाले. ही निवडणूक संकल्प आणि कट, भ्रष्टाचार आणि विश्वास यांच्यातील निवडणूक आहे.

आम्ही १८००० गावे आणि ३ कोटी कुटुंबापर्यंत वीज पोहोचवली. काँग्रेसने हे आश्वासन २००४ मध्ये दिले होते. पण २०१४ पर्यंतही ते पूर्ण झाले नाही. मात्र, जेव्हा आम्ही २०१४ ला सत्तेत आलो तेव्हा देशातील १८००० गावे आणि ३ कोटी लोक अंधारात जगत होते. आम्ही या सर्वांपर्यंत वीज पोहोचवली.