उमाकांत देशपांडे, मुंबई

भाजपच्या खासदार पूनम महाजन आणि काँग्रेसच्या प्रिया दत्त यांच्या राजकीय अस्तित्वाचीच ही लढाई असल्याने दोघीही शर्थीचे प्रयत्न करीत आहेत. पूनम महाजन यांची मोठी भिस्त मराठी, गुजराती-मारवाडी आणि उत्तर भारतीय मतदारांवर आहे. प्रिया दत्त यांचे भवितव्य मुस्लीम, ख्रिश्चन आणि काही प्रमाणात उत्तर भारतीय, दलित मतांवर अवलंबून आहे.

या निवडणुकीत  राममंदिरासह हिंदूुत्वाचा मुद्दा अग्रस्थानी असल्याने त्याचा परिणाम येथेही जाणवतो. कुर्ला, वांद्रे अशा मुस्लिम बहुल पट्टय़ात काँग्रेसला चांगले मतदान होण्याची शक्यता आहे. तर भाजप-शिवसेना युती झाल्याने आणि २००९च्या निवडणुकीतील मनसेचे मतदार या पक्षांकडे वळल्याचे चित्र गेल्या निवडणुकांमध्ये दिसून आले. त्यामुळे या दोन्ही पक्षांची मते साधारणपणे साडेचार लाखांच्या घरात गेली आहेत. ती खेचण्याचे महाजन यांचे प्रयत्न आहेत.

२०१४च्या मोदी लाटेत कुर्ला, वांद्रे येथील मुस्लीमबहुल पट्टय़ात मतदान कमी झाले होते. तरीही प्रिया दत्त यांना दोन लाख ९२ हजार मते मिळाली होती, तर पूनम महाजन यांना विलेपार्ले मतदारसंघात घसघशीत ८० हजार मतांची आघाडी मिळाल्याने त्यांनी चार लाख ७८ लाखांची मजल मारून एक लाख ८७ हजार मतांनी विजय मिळविला होता.

सुमारे पाच लाख ६० हजार मराठी आणि एक लाख ८० हजार गुजराती मतदारांनी मोठय़ा प्रमाणावर मतदान केल्यास महाजन यांना लाभ मिळू शकतो. मात्र त्यासाठी शिवसेनेच्या मदतीची गरज आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानंतर पक्षाचे नेते-कार्यकर्ते महाजन यांच्या प्रचारात उतरले. आदित्य ठाकरे यांच्या युवा सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी दिसते.

सुमारे पाच लाख मुस्लीम मतदारांपैकी ८० टक्के मते काँग्रेसकडे झुकावीत, यासाठी प्रिया दत्त यांचे प्रयत्न सुरू आहेत. मुस्लीम मतदानाचे प्रमाण वाढविण्यात यश मिळाले, तर त्याचा लाभ दत्त यांना होऊ शकतो. अभिनेता संजय दत्त बहिणीसाठी प्रचारात उतरला आहे. मतदारांची संख्या १८ लाखांवरून १६ लाख ४५ हजारांपर्यंत घटली असून कोणाचे मतदान किती होते, यावर बरेच अवलंबून आहे.

पूनम महाजन

बलस्थाने

* मराठी, गुजराती, उत्तर भारतीय मतदारांचे प्राबल्य

* संघटनात्मक पाठबळ, शिवसेनेची साथ

* खासदार म्हणून केलेली कामे, सोशल मीडिया टीम्स आणि सामाजिक संस्थांची मदत

कच्चे दुवे

* युवा सेनेच्या कार्यकर्त्यांची नाराजी

* सलग सुट्टय़ांमुळे विलेपार्ले, वांद्रे भागात मतदान कमी झाल्यास फटका

* अल्पसंख्याक मतांचे होणारे ध्रुवीकरण

प्रिया दत्त

बलस्थाने

* ओसरलेली मोदी लाट, मुस्लीम-ख्रिस्ती, दलित मतदारांचे लक्षणीय प्रमाण

* आप, एमआयएम किंवा अन्य पक्षीयांचे प्रबळ उमेदवार नसल्याने मतविभाजन टळणार

* राहुल गांधींच्या सूचनेनंतर काँग्रेस नेत्यांचे, भाऊ अभिनेता संजय दत्तचे पाठबळ

कच्चे दुवे

* गेल्या पाच वर्षांत पक्षात व मतदारसंघात निष्क्रिय

* पक्षातील काही नेत्यांचा असहकार

* काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांमधील धुसफूस