पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचारसभेत आरोप

एक्स्प्रेस वृत्तसेवा, मेरठ

माझा भर देशाच्या आत्मसन्मानावर आहे, पण विरोधकांना मात्र पाकिस्तानचा पुळका आहे. विरोधक हे पाकिस्तानचे नायक आहेत, असा घणाघाती आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मेरठ येथे लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचाराच्या पहिल्यावहिल्या सभेत केला. तुम्हाला हिंदुस्तानचा नायक हवा की पाकिस्तानचे नायक हवे, याचा विचार करा, असे आवाहनही त्यांनी मतदारांना केले.

विरोधकांच्या दगाबाज चौकीदारांच्या गोतावळ्याशी मुकाबला करणारा मी दमदार चौकीदार आहे, असे सांगत मोदी यांनी विरोधकांवर सर्व पातळ्यांवर टीका केली. समाजवादी पक्ष, राष्ट्रीय लोकदल आणि बहुजन समाज पक्ष यांच्या आद्याक्षरांद्वारे ‘सराब’ अशी संभावना करीत मोदी म्हणाले की, सराब अर्थात दारू ही उत्तर प्रदेशसाठीच नव्हे, तर देशासाठीही घातकच आहे.

विरोधकांच्या आघाडीची संभावना ‘महामिलावट’ अशी करीत ते म्हणाले की, ‘‘पाकिस्तानचा नायक म्हणून स्वत:चा लौकीक व्हावा, यासाठी विरोधकांमध्ये स्पर्धा लागली आहे. त्यांना देशाच्या लष्कराच्या अपमानाची पर्वा नाही. त्यांना बालाकोटच्या कारवाईचे पुरावे हवे आहेत. देशानंच ठरवावं की आपल्याला पुरावे पाहिजेत की सुपुत्र पाहिजेत!’’

या देशाचे सुपुत्र हाच सर्वात मोठा पुरावा आहे. जे पुरावे मागत आहेत ते सुपुत्रांनाच एकप्रकारे आव्हान देत आहेत, असे ते म्हणाले. मोदींनी पाकिस्तानात जाऊन अतिरेक्यांच्या घरात घुसून त्यांना का मारले, मोदींनी अतिरेक्यांचे अड्डे का नष्ट केले, त्यांचे तळ का उद्ध्वस्त केले, असे सवाल विरोधक करीत आहेत, असा टीकेचा रंजक सूरही त्यांनी आळवला.

जेव्हा या महाभेसळीचे सरकार सत्तेत होते तेव्हा देशाच्या विविध भागांत बॉॅम्बस्फोट झाले आणि त्यांनी तरीही अतिरेक्यांची जात आणि ओळख पाहून त्यांना शिक्षा करायची की त्यांना संरक्षण द्यायचे याचा निर्णय घेतला, असा गंभीर आरोपही पंतप्रधान पदावरील मोदी यांनी केला.

बसपचे हाजी महम्मद याकूब हे मेरठमधून भाजपविरोधात उभे आहेत. त्यांचे नाव न घेता मोदी म्हणाले की, मेरठच्या एका उमेदवाराने अतिरेक्यांसाठी कोटय़वधी रुपयांचे इनाम जाहीर केले होते, असे माझ्या ऐकीवात आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीही सहरणपूरचे काँग्रेस उमेदवार इम्रान मसूद हे जैश ए महम्मदचे म्होरके अझर मसूदचे जावई असल्याच्या आरोपाचा चिखल उडवला होता.

उपग्रहनाशक क्षेपणास्त्राच्या शोधाचे विरोधकांना कौतुक नसल्याचा दावा करीत त्यांनी राहुल गांधी यांचे नाव न घेता त्यांच्या ट्विटची खिल्ली उडवली. राहुल यांनी संरक्षण संशोधन आणि विकास विभागाचे अभिनंदन करतानाच जागतिक रंगभूमी दिनानिमित्त मोदी यांचे अभिनंदन केले होते.

‘न्याय’वर प्रहार

सत्तेत आल्यास प्रत्येक गरीब कुटुंबाला वार्षिक ७२ हजार रुपये देण्याचे आश्वासन काँग्रेसने ‘न्याय’ या योजनेद्वारे दिले आहे. त्यावर टीका करीत मोदी म्हणाले की, ‘‘ज्यांना ७० वर्षांत गरीबांसाठी बँक खातीदेखील उघडता आली नाहीत, ते आता सत्ता मिळाली तर त्यांच्या खात्यात पैसे टाकण्याचा वायदा करीत आहेत!’’