विद्याधर कुलकर्णी, पुणे

पक्षाचा सच्चा आणि हाडाचा कार्यकर्ता भाऊंच्या रूपाने पुण्यातून संसदेत गेला आहे. गिरीश बापट यांच्या दणदणीत विजयानंतर पक्षातील कार्यकर्त्यांकडून अशी प्रतिक्रिया उमटत आहे. भारतीय जनता पक्षाच्या विजयाचा जल्लोष करणाऱ्या कार्यकर्त्यांचे बापट यांच्यावर असलेले अलोट प्रेम विजयानंतर बुधवारी व्यक्त होत होते.

विदर्भातील अमरावती हे बापट यांचे मूळ गाव. त्यांचा जन्म पुणे जिल्ह्य़ातील तळेगाव दाभाडे येथे झाला. बापट यांचे शालेय शिक्षण रमणबाग प्रशालेत आणि महाविद्यालयीन शिक्षण बीएमसीसीमध्ये झाले. बालपणापासूनच संघाच्या संपर्कात आलेले बापट पुढे संघाचे सक्रिय कार्यकर्ते झाले. टेल्को कंपनीमध्ये १९७३ मध्ये ते नोकरीला लागले आणि पुढे राजकारणासह समाजकारणातही त्यांच्या कार्याचा ठसा उमटत राहिला. पालिकेच्या पोटनिवडणुकीत १९८० मध्ये विजय संपादन करून बापट यांचा राजकारणातील यशस्वी प्रवास सुरू झाला तो आता संसदेपर्यंत पोहोचला आहे. महापालिकेत तीन वेळा नगरसेवक आणि पुढे १९९५ पासून सलग पाच वेळा कसब्याचे आमदार झालेल्या बापट यांचा लोकसंपर्क दांडगा आहे. लोकप्रतिनिधीचे कार्यालय कसे असावे याचाही आदर्श वस्तुपाठ त्यांनी घालून दिला आहे. प्रत्येक अधिवेशनानंतर विधानसभेत केलेल्या कामगिरीची माहिती जाहीर करण्याचा आणि दरवर्षी मतदारांना कार्यअहवाल देण्याचा त्यांचा शिरस्ता वर्षांनुवर्षे कायम आहे. पुण्याच्या राजकारणात, समाजकारणात आणि अनेकविध उपक्रमांमध्ये, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये सदैव रममाण राहणारे असे व्यक्तिमत्त्व ही त्यांची खास ओळख राहिली आहे. राजकीय क्षेत्रात भाऊ म्हणून परिचित असलेले बापट नागरिकांच्या प्रश्नांसाठी, कार्यकर्त्यांबरोबर चर्चा करण्यासाठी, संवाद साधण्यासाठी उपलब्ध असतात. हीच त्यांची जमेची बाजू आहे.