उमेदवार निवडीत काँग्रेसचा मुक्तवाव, ‘मिशन – १३’चे आव्हान

चंदिगड : काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदरसिंग यांच्यातील दुराव्याबाबत नेहमी चर्चा होत असली तरी पंजाबमधील पक्षाचे उमेदवार निश्चित करताना पक्षाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांना मुक्तवाव दिला आहे. यामुळेच सर्व १३ जागा जिंकण्याचे आव्हान (मिशन -१३) मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले असले तरी यात त्यांची कसोटी लागणार आहे.

उमेदवार निश्चित करण्यावरून पंजाबात काँग्रेसमध्ये बराच वाद सुरू होता. काँग्रेसची सत्ता असल्याने विजयाची संधी लक्षात घेता, उमेदवारीसाठी बरेच इच्छुक होते. चार विद्यमान खासदारांना पक्षाने पुन्हा संधी दिली. उर्वरित नऊ मतदारसंघांपैकी सात मतदारसंघांमध्ये मुख्यमंत्र्यांनी शिफारस केलेल्यांना उमेदवारी दिली आहे. यावरून अमरिंदरसिंग यांना पक्षाने महत्त्व दिल्याचे दिसते.

माजी केंद्रीय मंत्री मनीष तिवारी यांना उमेदवारी देण्याबाबत राहुल गांधी अनुकूल नव्हते. दोन बैठकांमध्ये राहुल यांनी त्यांच्या नावावर फुल्ली मारली होती. पण सिंग यांनी केलेली शिष्टाई कामाला आली आणि तिवारी यांना आनंदपूर साहिब मतदारसंघातून उमेदवारी मिळाली.

पंजाब विधानसभेच्या तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीच्या वेळी राहुल गांधी आणि अमरिंदरसिंग यांच्यात दुरावा निर्माण झाला होता. मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार म्हणून पक्ष त्यांचे नाव जाहीर करण्यास राजी होत नसल्याने काँग्रेस सोडण्याचा इशारा अमरिंदरसिंग यांनी दिला होता. शेवटी त्यांच्या दबावापुढे काँग्रेसला झुकावे लागले होते. सत्ता येताच त्यांनाच मुख्यमंत्रिपद देण्यात आले. लोकसभा निवडणुकीसाठी त्यांच्यावरच पक्षाने सारी जबाबदारी टाकली आहे.

पराभव झाल्यास खैर नाही

‘मिशन-१३’चे लक्ष्य गाठण्यासाठी मुख्यमंत्री अमरिंदरसिंग यांनी आपले मंत्री आणि आमदारांना तंबी दिली आहे. आपापल्या मतदारसंघांमध्ये पक्षाच्या उमेदवारांना आघाडी मिळालीच पाहिजे, अन्यथा त्यांना मंत्रिमंडळातून वगळण्याचा इशाराही दिला आहे. कमी मते मिळाल्यास विधानसभेची उमेदवारी पुन्हा दिली जाणार नाही, असे आमदारांना बजावण्यात आले आहे. राहुल गांधी यांनी अमरिंदरसिंग यांना दिलेले महत्त्व लक्षात घेता पक्षाचे मंत्री आणि आमदारांमध्ये धडकी भरली आहे. कारण मतदारसंघात कमी मते मिळाल्यास काही खैर नाही हे नेत्यांच्या लक्षात आले आहे.