नागपूर : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात राम मंदिर हा मुद्दा असणार नाही, मात्र भाजपच्या अजेंडय़ावर कायम असेल, असे  भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि केंद्रीय मंत्री उमा भारती यांनी येथे सांगितले.

रजवाडा पॅलेसमध्ये आयोजित लोधी समाजाच्या मेळाव्यात त्या बोलत होत्या. कार्यक्रमाला भाजप नेते दयाशंकर तिवारी, शिवसेनेचे नेते किशोर कुमेरिया उपस्थित होते. काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी उत्तर प्रदेश प्रचार करत आहे मात्र, अजूनही राम मंदिरात जाऊन त्यांनी दर्शन घेतले नाही. त्यामुळे या मुद्यावर त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. देशात विकास झाला नाही अशी ओरड एकीकडे  काँग्रेस करीत असली तरी प्रियंका गांधी यांनी गंगेचे पाणी पिऊन गंगा शुद्ध झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे.  सोनिया गांधी, राहुल गांधी यांना केवळ सरकारवर नियंत्रण ठेवण्यासाठी सत्तेत यायचे आहे, अशी टीका त्यांनी केली. लोधी समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करण्यासाठी सरकारवर दबाव आणला जाईल असेही त्या म्हणाल्या. लोकसभा निवडणूक लढणार नाही मात्र राजकारणात सक्रिय राहू आणि पुढची लोकसभा निवडणूक पक्ष सांगेल त्या मतदारसंघातून लढणार असल्याचे त्या म्हणाल्या.