उत्तर मुंबईतील भाजपाचे उमेदवार गोपाळ शेट्टी हे प्राथमिक कलांनुसार आघाडीवर आहेत. काँग्रेस उमेदवार उर्मिला मातोंडकर शेट्टी यांना तगडे आव्हान देतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र पहिल्या टप्प्यापासूनच शेट्टी यांनी आघाडी घेत ती कायम राखली. पहिल्या चार तासांनंतर शेट्टी यांनी एक लाखांहून अधिक मतांची आघाडी घेतली होती. उर्मिला यांची चित्रपट अभिनेत्री ही प्रतिमा, त्यांचा प्रचाराचा धडाका, त्यांना लाभलेली स्थानिक मनसे नेते आणि कार्यकर्त्यांची साथ यामुळे या मतदारसंघातील परीक्षेचा पेपर भाजपसाठी सोपा जाणार नाही अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र शेट्टी यांनी आपले वर्चस्व कायम राखत मोठी आघाडी मिळवली आहे.

गोपाळ शेट्टी

बलस्थाने

* गुजराती, मारवाडी यांच्यासह इतर समाजांतील मध्यमवर्गाची एकगठ्ठा मते

* आमदार, नगरसेवक, सामान्य कार्यकर्त्यांचा प्रचारात सक्रिय सहभाग

* नगरसेवक ते खासदार- कार्यक्षम लोकप्रतिनिधी म्हणून जाणीवपूर्व जपलेली ओळख

कच्चे दुवे

* उर्मिला मातोंडकर यांच्या निमित्ताने उभे ठाकलेले आव्हान

* मनसेची काँग्रेसला साथ

* बेधडक स्वभावामुळे काही समाज दुरावलेले

उर्मिला मातोंडकर

बलस्थाने

* बॉलीवूडमधील कामगिरीमुळे ओळखीचा चेहरा

* प्रश्न समजून घेऊन भाष्य करण्याची क्षमता

* स्थानिक मनसे नेत्यांचा-कार्यकर्त्यांचा प्रचारात सक्रिय सहभाग

कच्चे दुवे

* स्थानिक काँग्रेस नेत्यांमधील विसंवादाबरोबच कार्यकर्त्यांची वानवा

* मतदारसंघातील प्रश्नांची जाण नाही

* आयत्यावेळी उमेदवारी जाहीर झाल्याने शून्यातून सुरुवात