नीलेश पानमंद, ठाणे

लोकसभा मतदारसंघाशी संपर्क कमी झाल्याच्या मुद्दय़ापासून युतीतील बेबनावापर्यंतच्या विविध गोष्टींची चर्चा बाजूला सारत ठाणे जिल्ह्यातील मतदारांनी नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी निवडून आणण्यासाठी कौल दिल्याचे गुरुवारच्या निकालांनी स्पष्ट केले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेल्या तुलनेने कमकुवत उमेदवारांमुळे ठाणे आणि कल्याणमध्ये शिवसेनेच्या उमेदवारांचा विजय आधीपासूनच निश्चित समजला जात होता. मात्र, शिवसेनेच्या नाराजीचा फटका बसून भिवंडीत भाजपचे कपिल पाटील पराभूत होतील, हा अंदाजही मतदारांनी खोटा ठरवला.

लोकसभा क्षेत्रातील असुविधांचा मुद्दा आक्रमकपणे पुढे आणत ठाण्याचा खासदार सुशिक्षित हवा की अशिक्षित, असा प्रश्न करत शिवसेनेचे विद्यमान खासदार राजन विचारे यांना कोंडीत पकडण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रयत्न सपशेल अपयशी ठरला. या निवडणुकीत केंद्रीय राजकारणापेक्षा स्थानिक मुद्दय़ांना केंद्रस्थान मिळावे, यासाठी राष्ट्रवादीने सुरुवातीपासून आटापिटा केला. मात्र, मतदारांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्या हाती सत्ता देण्याच्या एकमेव इराद्याने पुन्हा राजन विचारे यांच्याच पारडय़ात मते टाकली.

ठाणे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात असला तरी निवडणुकांच्या प्रचारात राष्ट्रवादीचे उमेदवार आनंद परांजपे यांनी चांगली हवा तयार केली होती. समाजमाध्यमांचा आक्रमक वापर करत कोपरी उड्डाणपूल, शहरातील कचराभूमीचा प्रश्न, वाहन कोंडी, उड्डाणपुलांवर झालेला नाहक खर्च असे मुद्दे परांजपे यांनी प्रचारात आणले होते. ठाणे महापालिकेतील शिवसेनेचा भोंगळ कारभार, विचारे यांची यथातथा कामगिरीच्या मुद्दय़ावर आसूड ओढत ठाण्याचा खासदार सुशिक्षित हवा की अशिक्षित असा प्रश्न विचारून परांजपे यांनी प्रचारात रंगत भरली होती. त्यामुळे ही निवडणुक वाटते तितकी एकतर्फी होणार नाही असा अंदाज जाणकार बांधू लागले होते. प्रत्यक्षात मात्र देशभरात आलेल्या मोदी लाटेत मतदारांनी विचारे यांच्या पारडय़ात मतांचे भरभरून दान टाकल्याचे स्पष्ट होऊ लागले असून सायंकाळी उशिरापर्यंत विचारे यांना मिळालेल्या मतांची आघाडी अडीच लाखांच्या पुढे गेली. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या परांजपे यांना दुपापर्यंत झालेल्या दहा फेऱ्यांमध्ये एकदाही आघाडी घेता आली नाही तर शिवसेनेचे विचारे मात्र प्रत्येक फेरीत १० ते १५ हजारांच्या मतांची आघाडी घेत होते. दुपारी पराभवाचा अंदाज येताच परांजपे मतमोजणीच्या ठिकाणाहून निघून गेले.