06 December 2019

News Flash

राज्यात आतापर्यंत ११८ कोटींचे घबाड जप्त

या विभागांनी आतापर्यंत ११८ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

आचारसंहिताभंगाचे १५ हजार गुन्हे, तीन हजारांवर तक्रारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत ‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपच्या माध्यमातून  नागरिकांकडून आचारसंहिता भंगाबाबत ३ हजार २११ तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. तर आचारसंहिता भंगाचे १५ हजार गुन्हे दाखल झाले आहेत. आचारसंहितेच्या अंमलबजावणीमध्ये या अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकही सजगतेने भाग घेत आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

निवडणुकीच्या दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पोलीस, आयकर विभाग, अबकारी कर विभाग आदी विभागांकडून कार्यवाही सुरू आहे. या विभागांनी आतापर्यंत ११८ कोटी १३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये ४४ कोटी २२ लाख रुपये रोकड, २२ कोटी रुपये किमतीची २८ कोटी ४७ लाख लिटर दारू, ६ कोटी ३० लाख रुपयांचे मादक पदार्थ, ४५ कोटी ४७ लाख  रुपयांचे  सोने, चांदी व इतर मौल्यवान जवाहिर यांचा  समावेश आहे.

आतापर्यंत आचारसंहिता भंग व निवडणूक प्रक्रियेशी निगडित इतर स्वरुपाचे १५ हजार ९५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये भारतीय दंड संहितेच्या विविध कालमांतर्गत ३३७ गुन्हे, लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत ४८ गुन्हे, अनधिकृतरित्या दारू बाळगणे, विक्री, वाटपासाठी दारूची वाहतूक आशा स्वरुपाचे १३ हजार ७०२ गुन्हे, बेकायदेशीररीत्या शस्त्र, जिलेटीन व इतर स्वरूपाचे स्फोटक पदार्थ बाळगणे आदींबाबत ६०१ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नशेचे पदार्थ (नारकोटिक्स ड्रग्ज) बाळगल्याबाबतचे १११, स्फोटक पदार्थ कायद्यांतर्गत १२ गुन्हे, अन्न व औषध अधिनियमांतर्गत ५२ गुन्हे आदींचा समावेश आहे. आचारसंहिता लागू झाल्यापासून आतापर्यंत शस्त्र परवानाधारकाकडून ४० हजार ९७ शस्त्रे जमा करून घेण्यात आली आहेत. सूचना देऊनही जमा न केलेली ३० शस्त्रे जप्त करण्यात आली असून १३५ शस्त्र परवाने रद्द करण्यात आले आहेत.

‘सी-व्हिजिल’ अ‍ॅपवर आतापर्यंत दाखल ३ हजार २११ तक्रारी प्राप्त झाल्या. त्यापैकी एक हजार ८६६ तक्रारींमध्ये तथ्य आढळून आले असून त्यामध्ये जिल्हा स्तरावर योग्य ती कार्यवाही करण्यात येत आहे. या अ‍ॅपवर अनधिकृत दारू, मतदारांना आमिष म्हणून दारूचे वाटप, पैशाचा वापर, विनापरवानगी पोस्टर लावणे, सार्वजनिक मालमत्तेचे विद्रूपीकरण आदी स्वरुपाच्या तक्रारी प्राप्त झाल्याची माहितीही शिंदे यांनी दिली.

तमिळनाडूत १.४८ कोटी रुपये जप्त

चेन्नई : तामिळनाडूतील थेनी जिल्ह्य़ातील छाप्यात १.४८ कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आल्याचे बुधवारी प्राप्तिकर खात्याकडून सांगण्यात आले. तेथे गुरुवारी विधानसभेची पोटनिवडणूक होत आहे.

अंदीपट्टी विधानसभा क्षेत्रात ही कारवाई करण्यात आली असून तेथे गुरुवारी मतदान होत आहे. ज्या ठिकाणी छापे टाकण्यात आले त्यांचा संबंध एएमएमके पक्षाशी संबंधित होता. एएमएमके पक्षाचे कार्यालय या इमारतीच्या तळमजल्यावर आहे. प्राप्तिकर विभाग या कारवाईचा अहवाल प्रत्यक्ष कर मंडळ व निवडणूक आयोगाला  सादर करणार आहे. प्राप्तिकर खात्याने मंगळवारी रात्री एका दुकानावर छापा टाकला त्या वेळी टीटीव्ही दिनकरन यांच्या एएमएमके पक्षाच्या समर्थकांना पांगवण्यासाठी पोलिसांना गोळीबार करावा लागला. अंदीपट्टी भागात मतदारांना वाटण्यासाठी २ कोटी रुपयांची रोकड तेथे आणली होती.  यात एएमएमकेच्या चार जणांना ताब्यात घेतले आहे. काहींनी पैशाचे गठ्ठे टाकून दिले,तर काही जण ते बरोबर घेऊन गेले. टपाली मतदान पत्रिका तेथे सापडली असून त्यावर एएमएमके उमेदवाराला मतदान केल्याचे दिसून आले आहे. जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक हे घटनास्थळी गेले व त्यांनी सुरक्षा पाहणी केली. जिल्हा पोलिसांनी याबाबत अनेकांवर गुन्हा दाखल केला असून तामिळनाडूत १८ एप्रिलला मतदान होत आहे.अकरा कोटींहून अधिक रोकड जप्त करण्यात आल्याने वेल्लोर लोकसभा मतदारसंघाची निवडणूक आधीच रद्द करण्यात आली आहे.

First Published on April 18, 2019 3:57 am

Web Title: lok sabha election 2019 so far 118 crores cash seized in maharashtra
Just Now!
X