संजय बापट, मुंबई

किरीट सोमय्या यांना डावलून मनोज कोटक यांना भाजपने उमेदवारी दिल्याने ईशान्य मुंबई मतदारसंघाची सर्वत्र चर्चा झाली. आता हा मतदारसंघ कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय दिना पाटील यांनी मराठी, अल्पसंख्याक आणि दलित मतदारांची मोट बांधण्यावर भर दिल्याने चुरस वाढली आहे. शिवसेना आणि मनसेचे मराठी मतदार कोणती भूमिका घेतात यावरही बरीच समीकरणे अवलंबून आहेत.

गुजराती, उत्तर भारतीय, मुस्लीम मते या ठिकाणी लक्षणीय आहेत. या मतदारसंघात भाजपला शिवसेनेची किती साथ मिळते हा कळीचा मुद्दा आहे.  या मतदारसंघात सर्वाधिक सात लाख मराठी मतदार असून त्या खालोखाल पावणे चार लाख मुस्लीम तर गुजराती मतदार दीड लाखाच्या आसपास आहेत. मुलुंड आणि घाटकोप पूर्व तसेच पश्चिम असे तीन मतदार संघ भाजपच्या, विक्रोळी, भांडुप शिवसेनेकडे असे सहापैकी पाच मतदार संघ युतीच्या ताब्यात असून मानखुर्दमध्ये समाजवादी पक्षाचा आमदार आहे. मानखुर्द, गोवंडी या भागात मुस्लिमांचा वरचष्मा असून या मतदार संघात दलित, उत्तर भारतीयांचाही टक्का निर्णायक आहे. त्यामुळे केवळ गुजराती किंवा मराठी मतांच्या जोरावर इथे विजय मिळविणे अवघड आहे. शिवसेनेची साथ आणि गुजराती- सिंधी मतांच्या जोरावर या मतदार संघात पुन्हा एकदा कमळ फुलविण्यासाठी कोटक आणि त्यांचे कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत. २००९च्या निवडणुकीत मानखुर्द आणि गोवंडीमधील मतदान विरोधात गेल्याने किरीट सोमय्या यांचा पराभव झाला होता ही बाब दुर्लक्षून चालणार नाही.

शिवसेना- भाजपमध्ये युती झाली असली तरी या मतदार संघातील दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये मात्र अजूनही मनोमीलन झाल्याचे दिसत नाही. भाजपात उमेदवाराचा घोळ सुरू असतानाच राष्ट्रवादीचे संजय पाटील यांनी पहिल्या टप्यातच संपूर्ण मतदार संघ पिंजून काढला आहे. शिवसेना- भाजपातील जुन्या वादाचे व्हीडिओ व्हायरल करून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी भाजपाची मात्र झोप उडविली आहे.

मुलुंड, घाटकोपरमधील गुजराती मतदार तसेच शिवसेनेची साथ असल्याने कोटक यांचे विजयाचे गणित जुळू शकते. सोमय्या यांना शिवसेनेचा ठाम विरोध होता. कोटक यांना तेवढा विरोध होणार नाही. लढत चुरशीची असली तरी कोटक यांचा वरचष्मा आहे.

मनोज कोटक

बलस्थान

* भाजप आणि शिवसेनेची मोठी संघटनात्मक ताकद

* मुलुंड आणि गुजराती मतदारांमध्ये कार्यक्षम नगरसेवक अशी प्रतिमा

* पाच आमदारांची ताकद

कच्चे दुवे

* मुलुंडच्या बाहेर फारसा परिचय किंवा प्रभाव नाही.

* शिवसेना- भाजप कार्यकर्त्यांमधील विसंवाद

* मनसेचे मतदार राष्ट्रवादीकडे वळण्याची भीती

संजय पाटील

कच्चे दुवे

* राष्ट्रवादीतील गटबाजी आणि निस्तेज काँग्रेस आणि मित्र पक्ष.

* वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे विक्रोळी- घाटकोपर भागातील दलित मते गमावण्याची भीती

* अन्य भागात प्रभावी नेत्यांचा अभवा असल्याने मतदारांपर्यंत पोहचण्यात अडचणी

बलस्थान

* मतदारांशी व्यक्तिगत संबंध

* भांडुप- विक्रोळी- मानखुर्द पट्टय़ात स्वत:ची आणि पक्षाचीही मोठी ताकद

* मराठी, मुस्लीम मतदारांचा पाठिंबा