उत्तर महाराष्ट्रात चुरशीच्या लढती

अविनाश पाटील, नाशिक

लोकसभा निवडणुकीत लोकांपुढे उमेदवार म्हणून पुढे येणाऱ्या चेहऱ्यापेक्षा त्यांच्या घरातील माजी मंत्र्यांचीच प्रतिष्ठा पणास लागलेले मतदारसंघ उत्तर महाराष्ट्रात आहेत. कोणी पुतण्यासाठी, कोणी मुलांसाठी, कोणी सुनेसाठी प्रचारात झोकून दिले आहे. घरातीलच उमेदवार असल्याचे एक कारण त्यामागे असले तरी निवडणुकीतील निकालावर उमेदवारापेक्षाही या वडीलधाऱ्या मंडळींचे राजकीय भवितव्य अवलंबून असल्याने वृद्धत्व, आजारपण, टळटळीत ऊन यांची पर्वा न करता ते प्रचारात उतरले आहेत.

नाशिक मतदारसंघात महाआघाडीच्या वतीने राष्ट्रवादीचे समीर भुजबळ रिंगणात उतरले आहेत. समीर हे माजी उपमुख्यमंत्री आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांचे पुतणे आहेत. ते २००९ च्या निवडणुकीत नाशिकमधूनच खासदार झाले होते. त्या वेळी निवडणुकीच्या राजकारणात नवखा चेहरा असलेल्या समीर यांच्या विजयासाठी छगन भुजबळ यांनी जिवाचे रान केले होते. तोच जोश, तोच आवेश ते या वेळच्या निवडणूक प्रचारातही दाखवीत आहेत. उमेदवार म्हणून समीर यांचे नाव असले तरी प्रचाराच्या मार्गातील खाचखळगे कसे भरून काढावेत, याचा अभ्यास असलेले काका छगन भुजबळ हेच सर्व सूत्रे सांभाळत आहेत. काका आणि पुतणे ईडीच्या चौकशीनंतर काही दिवस तुरुंगवास भोगून आल्यामुळे तर ही निवडणूक त्यांच्यासाठी अधिकच परिणामकारक ठरणार आहे.

धुळे मतदारसंघात महाआघाडीच्या वतीने काँग्रेसचे आमदार कुणाल पाटील उमेदवार असले तरी ही निवडणूक त्यांच्यापेक्षा त्यांचे वडील आणि माजी मंत्री रोहिदास पाटील यांच्यासाठी अधिक प्रतिष्ठेची आहे. महायुतीचे उमेदवार संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांच्याशी लढत असल्याने उमेदवार मुलापेक्षा वडीलच मतदारसंघ पिंजून काढताना दिसत आहेत. कधी काळी संपूर्ण धुळे जिल्ह्य़ावर रोहिदास पाटील यांचे वर्चस्व होते. कालांतराने ते कमी झाले असले तरी कित्येक वर्षांनंतर घरात लोकसभेची उमेदवारी आल्याने प्रचारात बिल्कूलही कसर न ठेवण्याच्या निर्धाराने रोहिदास पाटील प्रचारात उतरले आहेत. त्यासाठी ते आपला अनुभव कामी आणत आहेत. उमेदवारी जाहीर होण्याआधी अलीकडेच धुळ्यात राहुल गांधी यांच्या सभेचे आयोजन करण्यामागेही त्यांचा हा अनुभवच मदतीस आला होता.

नंदुरबार मतदारसंघात महायुतीतर्फे भाजपच्या डॉ. हीना गावित रिंगणात आहेत. डॉ. हीना विद्यमान खासदार आहेत. त्यांची मुख्य लढत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते के. सी. पाडवी यांच्याशी असली तरी सुहास नटावदकर हे भाजपचे बंडखोरही रिंगणात आहेत. नटावदकर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावंत असल्याने ते बंडखोरी करणार नाहीत, असा भाजपच्या नेत्यांचा कयास होता. परंतु, त्यांनी उमेदवारी कायम ठेवल्याने डॉ. हीना यांच्या मार्गातील अडचणी वाढल्या आहेत. त्यामुळेच मुलीच्या प्रचारात राज्याचे माजी मंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी झोकून दिले आहे. डॉ. हीना यांच्या यशावरच विधानसभा निवडणुकीतील गावित परिवाराची वाटचाल अवलंबून राहणार असल्याने डॉ. विजयकुमार मुलीच्या प्रचारासाठी जे जे शक्य ते सर्वकाही करीत आहेत.

पक्षांतर्गत वेगवेगळ्या घडामोडींमुळे जळगाव जिल्हा भाजपची या निवडणुकीत चर्चा आहे. उमेदवार बदलण्यावरून आणि अमळनेर येथे व्यासपीठावरच जिल्हाध्यक्षांनी माजी आमदारास मारहाण केल्यामुळे जळगाव मतदारसंघात भाजपपुढे आव्हान उभे राहिले असताना रावेर मतदारसंघ माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे यांच्या उमेदवारीमुळे लक्षवेधी झाला आहे. त्यांच्याविरोधात महाआघाडीचे डॉ. उल्हास पाटील लढत आहेत.

एकनाथ खडसे यांना आजारणामुळे रुग्णालयात दाखल व्हावे लागल्याने रक्षा यांच्या प्रचारात ते आतापर्यंत सहभागी होऊ शकले नव्हते. या आठवडय़ात रुग्णालयातून घरी परतल्यावर त्यांनी प्रचाराची सूत्रे हाती घेतली आहेत. भाजपमधील अंतर्गत सुंदोपसुंदीच्या पाश्र्वभूमीवर रक्षा यांच्या मार्गात कोणताही अडसर येऊ नये, यासाठी खडसे कामास लागले आहेत. जिल्ह्य़ातील आपली राजकीय ताकद पुन्हा एकदा दाखविण्यासाठी एकनाथ खडसेंची प्रतिष्ठा पणास लागली आहे.