लोकसभा निवडणुकीचा उद्या २३ तारखेला निकाल जाहीर होणार आहेत. या पार्श्वभूमीवर उद्या दुपारी एकपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी प्रवक्त्यांना दिले आहेत. आज बुधवारी शिवसेना भवनात प्रवकत्यांची बैठक पार पडली. त्यावेळी उद्या दुपारी एक वाजेपर्यंत प्रवक्त्यांनी प्रसारमाध्यमांना कोणतीही प्रतिक्रिया न देण्याच्या सुचना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहे. या बैठकीला खासदार संजय राऊतसह शिवसेनेचे दिग्गज नेते उपस्थित होते.

एग्झिट पोलचे आकडे युतीच्या बाजूने आले असले तरी शिवसेने सबुरीची भूमिका घेत निकालाचे चित्र स्पष्ट होईपर्यंत कोणतीही प्रतिक्रिया न देण्याचे आदेश शिवसेना नेत्यांना देण्यात आले आहे.

अखेरच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर विविध एग्झिट पोलमधून एनडीएला स्पष्ट बहुमत मिळाल्याचे चित्र पहायला मिळाले. महाराष्ट्रामध्ये शिवसेना-भाजपा युतीला ३५ ते ४० च्या आसपास जागा मिळतील असा अंदाज एग्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला होता. यामध्ये शिवसेनाला १६ते १९ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र तरीही शिवसेनेनं एक वाजेपर्यंत आपल्या प्रवक्त्यांना माध्यमांशी न बोलण्याच्या सूचना दिल्या आहेत. दुपारपर्यंत मतमोजणीचा कल स्पष्ट होऊ शकतो. त्यामुळेच शिवसेनेकडून ही सूचना केली गेल्याची शक्यता आहे.