आमदार विनायक मेटे यांची पंकजा मुंडेंवर प्रखर टीका

बीड : मुख्यमंत्र्यांनी तीन वेळा ठरवल्यानंतरही माझा मंत्रिमंडळात समावेश होऊ नये, यासाठी पंकजा मुंडे यांनी थेट राजीनामा देऊन घरी बसण्याच्या धमक्या देत विरोध केला. तरीही आपण घटक पक्ष म्हणून काही उघडपणे बोललो नाही. मात्र मुख्यमंत्र्यांनी लेखी, तोंडी आदेश देऊनही शिवसंग्राम कार्यकर्त्यांचे छावण्यांचे प्रस्ताव नाकारून दुष्काळात राजकारण केले गेले, अशी आगपाखड करत शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादी आणि अन्यत्र महायुती अशी भूमिका कार्यकर्त्यांसमोर मांडली.

महायुतीचे राज्यात दोन जास्त खासदार निवडून आणू. मात्र, बीडच्या भाजप खासदाराला घरी बसवू असे सांगत राष्ट्रवादीचे उमेदवार शेतकरीपुत्र बजरंग सोनवणे यांना साथ देणार असल्याचे  मेटे यांनी स्पष्ट केले.

बीड लोकसभा मतदार संघात राजकीय भूमिका ठरवण्यासाठी भाजप महायुती घटक पक्षातील शिवसंग्रामचे आमदार विनायक मेटे यांनी गुरुवारी समर्थकांचा मेळावा घेतला. तीन तास चाललेल्या या मेळाव्यात कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेतल्यानंतर आमदार विनायक मेटे यांनी आपली भूमिका मांडली. गोपीनाथ मुंडे यांच्यासोबत २०१४च्या निवडणुकीत एकही मराठा नेता नसताना आपण जिल्ह्यातील माणसाला मोठे केले पाहिजे यासाठी महायुतीत सामील झालो आणि इतर घटक पक्षांना सोबत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र विधानसभा निवडणुकीत युतीचे उमेदवार म्हणून बीड मतदार संघात निवडणूक लढवताना आपला निसटता पराभव झाला. पण त्या वेळी भाजपच्या जिल्हाध्यक्षासह अनेकांनी गद्दारी केली. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळात आपला समावेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर पालकमंत्री पंकजा मुंडे यांनी राजीनामा देऊन घरी बसण्याची धमकी देऊन आपला समावेश होऊ दिला नाही. तरीही जिल्हा परिषद निवडणुकीत मुख्यमंत्र्यांच्या शब्दावर भाजपला पािठबा दिला. मात्र शिवसंग्रामची माणसे फोडून राजकीय पातळीवर मला संपवण्याचा प्रयत्न केला गेला. यावरही आपण उघडपणे बोललो नाही. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लेखी आणि तोंडी आदेश देऊनही दुष्काळात शिवसंग्रामच्या कार्यकर्त्यांच्या छावण्या मंजुर होऊ दिल्या नाहीत. गोपीनाथ मुंडे विरोधकांचीही कामे करत, त्यांना मोठे करत. आम्ही मित्र पक्ष असताना आम्हाला संपवण्याचा प्रयत्न झाला. मात्र मागील २५ वर्षांत अनेक वेळा अशा कठीण प्रसंगांतून योग्य मार्ग काढला आहे. कोणत्याही नेत्याच्या आशीर्वादावर नाही तर जनतेच्या साथीवर आपण राजकारण व समाजकारणात काम करतो आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाचा व इतर विषयात देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची भूमिका घेतली. देशात नरेंद्र मोदी यांच्यासारखा कणखर पंतप्रधान पाहिजे ही आपली भावना आहे. बीडमध्ये पालकमंत्र्यांचा अहंमपणा संपवण्यासाठी विद्यमान खासदारांना घरी बसवावे लागेल. यासाठी राष्ट्रवादीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना साथ देण्याचा निर्णय आमदार मेटे यांनी जाहीर केला. उपस्थित कार्यकर्त्यांनी हात उंचावून निर्णयाचे स्वागत केले.

राज्यात भाजप महायुतीचा प्रचार करणार

भाजप महायुतीचे घटक पक्ष म्हणून आपण बीडवगळता सर्वत्र महायुतीचा प्रचार करणार आहोत. प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या मतदार संघात १३ एप्रिल रोजी प्रचाराला जाणार आहे. बीडमधील निर्णयाबाबत मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष यांना आपण पूर्ण माहिती दिली आहे. त्यांनीही प्रयत्न केला. मात्र, पंकजा मुंडे यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. यामुळे नाइलाजास्तव आपण हा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे आमदार जयदत्त क्षीरसागर महायुतीबरोबर गेल्यानंतर विनायक मेटेंनी राष्ट्रवादीबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे.