News Flash

हरयाणाचा कौल भाजपसाठी महत्त्वाचा

देवीलाल यांच्या कुटुंबीयांमध्ये झालेल्या वादातून लोकदलात फूट पडली आहे

लोकसभेपाठोपाठ विधानसभा असल्याने सर्वच पक्षांसाठी रंगीत तालीम

एक्स्प्रेस वृत्तसेवा, चंदिगढ

हरयाणामध्ये लोकसभेच्या दहाच जागा असल्या तरी तेथील निवडणूक महत्त्वाची आहे. कारण पाच महिन्यांत तेथे विधानसभेची निवडणूक असल्याने लोकसभा निवडणूक ही सर्वच पक्षांसाठी रंगीत तालीम मानली जाते. या राज्यात लोकसभेसाठी १२ मे रोजी मतदान होत आहे.

हरयाणातील कोणतीही निवडणूक तीन लालांभोवती फिरते. हे तीन लाल म्हणजे हरयाणाचे मुख्यमंत्रिपद भूषविलेले देवीलाल, भजनलाल आणि बन्सीलाल. हे तिन्ही ‘लाल’ हयात नसले तरी त्यांच्या घराण्यातील मुले, सुना, नातवंडे लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. अजूनही हरयाणाच्या राजकारणात या तीन लालांचे प्रस्थ आहे. मतदार त्यांच्या वारसदारांना कौल देतात का, याची राजकीय वर्तुळात उत्सुकता आहे.

महाराष्ट्रात मराठा, कर्नाटकात लिंगायत किंवा वोकलिंग या जातींचे सत्तेत वर्चस्वस्थान राहिले. हरयाणाच्या राजकारणावर नेहमीच जाट समाजाचा प्रभाव राहिला. देवीलाल, बन्सीलाल, भूपिंदरसिंग हुडा हे सारे जाट समाजाचे मुख्यमंत्री होते. भजनलाल बिष्णोई समाजाचे होते. २०१४ मध्ये सत्तेत आलेल्या भाजपने प्रस्थापित जातींकडे सत्ता ठेवण्याचे सूत्र बदलले. मनोहर खट्टर या बिगर जाट समाजातील नेत्याकडे मुख्यमंत्रिपद सोपविले. लोकसभेत पक्षाला चांगले यश मिळवून देणे आणि पाच महिन्यांनी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत सत्ता कायम राखणे असे दुहेरी आव्हान खट्टर यांच्यासमोर आहेत.

देवीलाल यांच्या कुटुंबीयांमध्ये झालेल्या वादातून लोकदलात फूट पडली आहे. दुष्यंत चौटाला यांनी ‘जननायक जनता पार्टी’ची स्थापना केली आहे. यामुळे यंदा भाजप, काँग्रेस, लोक दल, जननायक जनता पार्टी अशा लढती होणार आहेत. गटबाजीने काँग्रेस पक्ष पोखरलेला आहे. हुडा यांनाच सर्व महत्त्वाची पदे आपल्याकडे हवी आहेत.

हरयाणात विजय मिळविणे हे भाजपचे उद्दिष्ट आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपचे मुख्य ‘अस्त्र’ आहे. एक्स्प्रेसच्या प्रतिनिधींनी रोहतक, भिवनी, हिस्सार या प्रवासात स्थानिकांशी संवाद साधला असता मोदी यांना आणखी एक संधी दिली पाहिजे, असा सूर होता. काँग्रेसने जाहीरनाम्यात लष्कराला देण्यात आलेल्या विशेषाधिकाराचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिल्याने लष्कारातून निवृत्त झालेल्या सैनिकांमध्ये काँग्रेसबद्दल वेगळी भावना दिसली. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांचा प्रशासनावर वचक नाही, अशी टीका केली जाते. पण त्यांच्या वैयक्तिक सचोटीबद्दल संशय घेण्यास कुठेही वाव नाही. त्यांच्यावर गैरव्यवहाराचा एकही आरोप गेल्या साडेचार वर्षांत झाला नाही. जाट आंदोलन, सच्चा डेरा सौदाचा रामरहिम किंवा रामपाल ही प्रकरणे हाताळण्यात खट्टर अपयशी ठरल्याचा आरोप केला जातो. पण सध्या तरी तेथे भाजपचा वरचष्मा राहिल, असा अंदाज व्यक्त केला जातो.

२०१४च्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाटेत दहापैकी सात जागा जिंकून भाजपने सर्वानाच आश्चर्याचा धक्का दिला होता. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ९० पैकी ४७ जागा जिंकून भाजप सत्तेवर आला. तोपर्यंत दुहेरी आकडा गाठणे कधीही शक्य न झालेल्या भाजपला मिळालेल्या यशाने राज्याचे राजकारणच बदलले. भाजपने प्रस्थापित जाट समाजाऐवजी पंजाबी खट्टर यांना मुख्यमंत्री करून जाट विरोधी समाजाची मते एकवटतील अशी व्यवस्था केली. तीन दशकांपूर्वी भजनलाल यांनी अशाच प्रकारे जाट विरोधी मतांचे ध्रुवीकरण करून सत्ता मिळवली होती.

हरयाणाची अर्थव्यवस्था कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. देशाच्या अन्य भागांमध्ये भाजपला शेतकऱ्यांच्या नाराजीचा फटका बसला होता. विशेषत: मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये सत्ता गमावावी लागली. शेतकरी वर्गातील अस्वस्थता किंवा नाराजी हरयाणामध्ये तेवढी दिसत नाही. शेतकरी वर्गाच्या नाराजीचा फटका हरयाणामध्ये जाणवणार नाही, असे चित्र आहे.

हरयाणामध्ये पुन्हा भाजपला चांगले यश मिळाल्यास विधानसभा निवडणुकीत भाजपचा पुन्हा सत्तेत येण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो. यामुळेच काँग्रेसने सारी ताकद पणाला लावली आहे. पंतप्रधान मोदी पुढील आठवडय़ात हरयाणामध्ये प्रचाराला येणार आहेत. तेव्हा राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे आहेत.

निरीक्षणे..

’हरयाणात पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपचे मुख्य ‘अस्त्र’ आहे. याहीवेळी भाजपचाच वरचष्म्या राहण्याचा अंदाज.

’रोहतक, भिवनी, हिस्सारमधील नागरिकांशी संवाद साधला असता मोदी यांना आणखी एक संधी द्यावी, असा सूर आहे.

’मुख्यमंत्री खट्टर यांच्या वैयक्तिक सचोटीबद्दल संशय घेण्यास वाव नाही. त्यांच्यावर गैरव्यवहाराचा एकही आरोप नाही.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 3, 2019 4:08 am

Web Title: lok sabha election 2019 voting in haryana important for the bjp
Next Stories
1 निष्ठा पक्षाशी आणि व्यवसायाशी! भाजपचा सारथी- गुलाबसिंग तन्वर
2 मोदी यांना दिलासा देण्याचा निर्णय एकमताने नव्हे!
3 मोदींविरोधी तक्रारींवर निर्णय घ्या!
Just Now!
X