25 February 2020

News Flash

ठाणे जिल्ह्यात युतीचा जल्लोष!

मतांच्या आघाडीमुळे गुरुवारी दुपारनंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला.

ठाणे लोकसभा मतदारसंघात राजन विचारे आणि कल्याण मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे विजयी झाल्यानंतर शिवसेना-भाजप युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. ढोलताशांच्या गजरात गुलाल उधळून आणि नरेंद्र मोदींचे ‘मास्क’ चेहऱ्याला लावून अनेक कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला.

तिन्ही मतदारसंघांतील मताधिक्यामुळे शिवसेना, भाजपचे जिल्ह्यातील वर्चस्व अबाधित

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील कल्याण, भिवंडी आणि ठाणे या तिन्ही लोकसभा मतदारसंघांतून शिवसेना आणि भाजपच्या उमेदवारांनी मिळवलेल्या मतांच्या आघाडीमुळे गुरुवारी दुपारनंतर युतीच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. खोपट येथील भाजपच्या कार्यालयामध्ये कार्यकर्त्यांनी पेढे वाढून तर टेंभी नाक्यावर शिवसैनिकांनी मोठा विजयाचा जल्लोष साजरा केला. ठाणे लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार राजन विचारे यांनी तर निकालाच्या पूर्वसंध्येलाच घराच्या परिसरात विद्युत रोषणाईचे काम सुरू केले होते.

देशात कुणाची सत्ता येणार याचे संकेत देणाऱ्या मतदानोत्तर चाचण्या दोन दिवसांपूर्वी जाहीर झाल्या. त्यामध्ये देशात पुन्हा भाजपची सत्ता येण्याचे संकेत देण्यात आले होते. मात्र मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज निकालाच्या दिवशी खोटे ठरतील असे दावे काँग्रेस नेत्यांकडून केले जात होते. त्यामुळे गुरुवार सकाळपासूनच निकाल पाहण्यासाठी अनेक जण टीव्हीसमोर बसले होते. ठाण्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी खोपट येथील कार्यालयात प्रोजेक्टर लावला होता. त्यावर निकाल पाहण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. विजयी उमेदवारांचे आकडे जसे वाढत होते, तसे कार्यकर्ते जल्लोष करीत होते. दुपारनंतर देशात भाजपची पुन्हा एकहाती सत्ता येणार असल्याचे चित्र निकालातून स्पष्ट होताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी पेढे वाटले. भाजपचे शहराध्यक्ष संदीप लेले आणि नगरसेवकांनी स्वत: ढोल-ताशे वाजवून जल्लोष केला. तसेच फटाक्यांची आतषबाजीही या वेळी करण्यात आली.

ठाणे स्थानकातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोठी एलईडी स्क्रीन लावली होती. स्थानकातून प्रवास करणारे नागरिक स्क्रीनजवळ थांबून निकाल पाहत होते. त्यामुळे या स्क्रीनजवळही मोठी गर्दी झाली होती. या ठिकाणी कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत जल्लोष केला. या कार्यकर्त्यांनी तुतारी वाद्य वाजविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यास परवानगी नसल्यामुळे पोलिसांनी हे वाद्य वाजविण्यास मनाई केली. त्यामुळे कार्यकर्त्यांचा काहीसा हिरमोड झाला. असे असले तरी निकालातील विजयी उमेदवारांचे आकडे पाहून कार्यकर्त्यांचा आनंद काही कमी होत नव्हता. राजन विचारे यांनी निकालाच्या पूर्वसंध्येलाच घराच्या परिसरात विद्युत रोषणाईचे काम सुरू केले होते. घरासमोरील परिसरात कंदील लावले होते. तसेच दरवाजात ‘विजय भव’ असे तोरण लावले होते.

मीरा-भाईदर, नवी मुंबईमध्येही आघाडी

ठाणे लोकसभा मतदार संघाच्या मतमोजणी अर्धा तास उशीराने म्हणजेच सकाळी साडे आठ वाजता सुरू झाली. मतमोजणीला जशी सुरूवात झाली, तशी शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची उत्सुकता शिगेला पोहचली. सकाळी ९.१५ वाजता मतमोजणीच्या पहिल्या फेरीची आकडेवारी निवडणुक अधिकाऱ्यांनी जाहीर केली. या फेरीत शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे यांनी १२ हजार ४८० मतांनी आघाडी घेतल्याने शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले होते. या फेरीत राष्ट्रवादीचे उमेदवार आंनद परांजपे यांना केवळ मीरा-रोड विधानसभा मतदार संघात ७६० मतांची आघाडी घेता आली. उर्वरित ठाणे, कोपरी, ओवळा-माजिवाडा, ऐरोली आणि बेलापूर या पाच मतदारसंघात मात्र त्यांची पिछेहाट झाली. असे असले तरी मीरा रोडमध्ये आघाडी मिळाल्याने राष्ट्रवादीच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. त्यामुळे पुढच्या फेरीत परांजपे यांना आघाडी मिळेल, या आशेवर कार्यकर्ते होते. मात्र, दुसऱ्या फेरीत सेनेचे विचारे यांनी सहा विधानसभा मतदारसंघातून १६ हजार ४२४ मतांची आघाडी घेतली. त्यापैकी एकाही मतदारसंघात परांजपे यांना आघाडी घेता आली नाही. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची धाकधुक वाढली तर शिवसैनिकांमध्ये आनंदाचे वातावरण होते. तिसऱ्या फेरीतही विचारे १८ हजार ९८० मतांची आघाडी घेतली. तर या फेरीतही परांजपे यांची पिछेहाट झाली. तीन फेऱ्यांअखेर विचारे यांना एकूण ८० हजार  हजार ७३० इतकी तर परांजपे यांना ३२ हजार २९२ इतकी मते मिळाली होती. त्यामुळे विचारे हे ४७ हजार मतांनी आघाडीवर होते. चौथ्या फेरीत विचारे यांना १ लाख ३ हजार ४१७ इतकी मते मिळाली तर परांजपे यांना ४० हजार ८४२ इतकी मते मिळाली. या फेरीअखेर विचारे यांचे मताधिक्य ६२ हजार ५७५ झाले. त्यामुळे परांजपे यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते मतमोजणीच्या ठिकाणाहून निघून गेले.

‘आंबे वाटणार’

काही दिवसांपूर्वी नौपाडा येथील एका आंबा स्टॉलवरून मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला होता. निकालात पक्षाला मिळणारी आघाडी लक्षात घेऊन भाजपच्या कार्यकर्त्यांनी आंबा उंचावत जल्लोष केला. यासंबंधी एका कार्यकर्त्यांला विचारले असता, सगळीकडे पेढे वाटले जातील, आम्ही मात्र आंबे वाटणार असल्याचे त्याने सांगितले.

भिवंडीत अटीतटीची लढत नाहीच!

भिवंडी लोकसभा मतदार संघाची मतमोजणी एलकुंडे येथील प्रेसिडेन्सी शाळेत झाली. या मतदार संघात भाजपचे उमेदवार कपील पाटील आणि काँग्रेसचे उमेदवार सुरेश टावरे यांच्यात अटीतटीची लढत होणार असल्याचे बोलले जात होते. या मतदार संघात काँग्रेसचे टावरे हे भाजपचे पाटील यांना धक्का देतील, असे अंदाज वर्तविले जात होते. त्यामुळे या मतदार संघाकडे सर्वाचे लक्ष लागले होते. या मतदार संघाची मतमोजणी तांत्रिक अडचणींमुळे तब्बल दिड तास उशीराने सुरु झाली. पहिल्या फेरीत पाटील यांना दहा हजारांचे मताधिक्य मिळाले तर दुसऱ्या फेरीत टावरे यांनी ५ हजार मतांनी आघाडी घेतली. त्यामुळे या निकालाची उत्सुकता वाढली. पुढच्या आठ फेऱ्यांमध्ये पाटील यांनी एक ते दोन हजार मतांनी आघाडी घेतली. ११ व्या फेरीत सुरेश टावरे यांनी १२ हजारांचे मताधिक्य घेतले. असे असले तरी त्यांना पाटील यांना मिळालेले मताधिक्य कमी करता आले नाही. त्यानंतर प्रत्येक फेऱ्यांमध्ये पाटील यांचे मताधिक्य वाढतच होते. दुपापर्यंत झालेल्या २० फेऱ्यांमध्ये त्यांचे मताधिक्य एक लाखांच्या पुढे गेले होते. दरम्यान, तिसऱ्या फेरीनंतर काँग्रेसचे टावरे हे मतमोजणी केंद्रातून निघून गेले. तर कपील पाटील हे सकाळपासूनच मतदान केंद्रावर उपस्थित होते. मतमोजणीतील फेऱ्यांमध्ये पाटील यांना मिळालेल्या मताधिक्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये खुशीचे वातावरण होते तर काँग्रेस कार्यकर्ते हिरमुसले होते.

नवी मुंबई शिवसेना, भाजपाचा स्वतंत्र जल्लोष

शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या पारडय़ात सलग दुसऱ्यांदा भरभरून मतदान पडल्याने त्यांच्या विजयाचा जल्लोष नवी मुंबईतही ठिकठिकाणी करण्यात आला. वाशी शिवाजी चौकात शिवसेना व भाजपाने स्वतंत्र विजयोत्सव साजरा केला. संध्याकाळी छत्रपती शिवाजी महाराज चौकात ढोल ताशांच्या दणदणाटात मिठाई वाटण्यात आली. यावेळी शिवसेनेचे उपनेते विजय नाहाटा, बेलापूर मतदारसंघाचे अध्यक्ष विठ्ठल मोरे, नगरसेवक रामदास पवळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. शिवसेनेचा जयघोष आणि मोदी, मोदींच्या घोषणांना आसमंत दणाणून गेला होता. यावेळी भाजपचे अनेक पदाधिकारीही उपस्थित होते. बेलापूर आणि ऐरोली मतदार संघात मिळून ८० हजारांपेक्षा जास्त मताधिक्य मिळाल्याचा दावा शिवसेनेकडून करण्यात आला आहे.

शिवसेनेचा जल्लोष संपल्यानंतर भाजपाच्या आमदार मंदा म्हात्रे, भाजप अध्यक्ष रामचंद्र घरत, महामंत्री विजय घाटे  यांच्यासह कार्यकर्त्यांनी वाशी चौकात जल्लोष केला.  शिवसेना आणि भाजपने वेगवेगळा केलेल्या जल्लोषाची चर्चा मात्र झाली.  सानपाडा, एपीएमसीमध्ये एकत्रित बसून टीव्हीवरील निकाल पाहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. विचारेंचा विजय दृष्टिक्षेपात येताच एपीएमसी मार्केटमध्ये जल्लोष साजरा करण्यात आला.

मतमोजणी केंद्रावर नियोजनाचा अभाव

वीज खंडित होणे,  इंटरनेट बंद होणे यासारखा विविध तांत्रिक घोळ भिवंडीतील एलकुंडे येथील प्रेसिडेन्सी शाळेतील मतमोजणी केंद्रावर सुरु होते. आठ वाजता मतमोजणी सुरु होणार होती. मात्र, तांत्रिक अडचणीमुळे मतमोजणी दीड तास उशिराने सुरु झाली. मतमोजणी धिम्या गतीने का सुरु होती, याबाबत निवडणुक विभागाकडून काहीच माहिती देण्यात येत नव्हती. मतमोजणी केंद्रावर तीन वेळा वीस मिनिटांसाठी वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे या केंद्रावरील वीज पुरवठय़ासाठी जनरेटरचा आधार घ्यावा लागला. माध्यम कक्षात मात्र सुविधेच्या नावाने बोंब असल्याचे दिसून आले. तसेच माध्यम कक्षातील संगणक आणि आसन व्यवस्थेच्या अपुऱ्या सुविधेचा फटका प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधींना बसला.

केंद्राबाहेर सेनेचा जल्लोष..

शिवसेनेचे उमेदवार राजन विचारे हे सकाळी मतमोजणी केंद्रावर आले नव्हते. दुपारी मतांची आघाडी ६० हजारांच्या वर गेल्यानंतर विचारे हे मतमोजणी केंद्रावर पोहचले. त्यांच्यासोबतच जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, आमदार प्रताप सरनाईक, शिवसेना जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के यांच्यासह शिवसैनिक मतमोजणी केंद्रावर आले. या सर्वानी मतदान केंद्राबाहेर जल्लोष केला. कार्यकर्त्यांनी विचारे, शिंदे आणि सरनाईक यांना खांद्यावर उचलून विजयाच्या घोषणा दिल्या.

First Published on May 24, 2019 3:12 am

Web Title: lok sabha election result 2019 shiv sena bjp alliance celebration in thane district
Next Stories
1 पहिल्या फेरीपासून शिंदेंची आगेकूच
2 कळव्यात पोलिसांना मारहाण
3 ‘बविआ’च्या बालेकिल्ल्यात शुकशुकाट
Just Now!
X