19 January 2020

News Flash

Lok Sabha Election Results 2019: Modi 2.0 Reloaded

Lok Sabha Election 2019: रालोआ ३४७, यूपीए ८६ आणि अन्य पक्ष १०९ जागांवर आघाडीवर असून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार हे स्पष्ट झाले

(संग्रहित छायाचित्र)

Lok Sabha Election 2019 updates: ५४२ मतदारसंघापैकी भाजपा तब्बल ३०३ मतदारसंघांमध्ये आघाडीवर असून काँग्रेस ४९ जागांवर आघाडीवर आहे. डीएमके २३, तृणमूल काँग्रेस २२, वायएसआर काँग्रेस २२ आणि शिवसेना १८ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष ११ आणि बिजू जनता दल १२ जागांवर आघाडीवर आहे. सद्यपरिस्थितीनुसार रालोआ ३४७, यूपीए ८६ आणि अन्य पक्ष १०९ जागांवर आघाडीवर असून केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार सत्तेत येणार हे स्पष्ट झाले आहे.

१७ व्या लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया ११ एप्रिल रोजी सुरू झाली आणि सात टप्प्यांमध्ये मतदान होऊन १९ मे रोजी संपली. यावेळी अपक्षांसह विविध पक्षांचे आठ हजार उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. गुरुवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात झाली. भाजपाने सुरुवातीपासून आघाडी घेतली होती. विशेष म्हणजे यंदा भाजपाने २०१४ पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवला आहे. २०१४ मध्ये ‘एनडीए’ने तब्बल ३३६ चा आकडा गाठला. तर यूपीएला फक्त ६० जागांवरच समाधान मानावे लागले होते.

महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून यात भाजपा २३, शिवसेना १८, राष्ट्रवादी काँग्रेस ४ जागेवर आघाडीवर आहेत. काँग्रेस, अपक्ष प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. उत्तर प्रदेशमधील अमेठी येथे राहुल गांधी यांचा पराभव झाला असून हा पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागणारा आहे. या मतदारसंघात भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी या विजयी झाल्या आहेत.

Live Blog

लोकसभा निवडणूक २०१९ चे सर्व लाइव्ह अपडेट्स इथे वाचा

18:06 (IST)23 May 2019
अमेठीतील जनतेचा निर्णय मान्य: राहुल गांधी

अमेठी या काँग्रेसच्या पारंपारिक मतदारसंघात भाजपाच्या स्मृती इराणींनी बाजी मारली आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार या मतदारसंघात स्मृती इराणी या ३५ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या निकालाच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले. ते म्हणाले, अमेठीतील जनतेचा निर्णय मान्य आहे. मी स्मृती इराणींना विजयासाठी शुभेच्छा देतो. स्मृती इराणींवर जनतेने विश्वास दाखवला आहे, आता त्यांनी प्रेमाने अमेठीकडे लक्ष द्यावे, असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.  मी प्रचारातही म्हटले होते की 'जनता मालिक है'. आज जनतेने त्यांचा निर्णय दिला आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे अभिनंदन करतो, असेही त्यांनी सांगितले.

17:54 (IST)23 May 2019
मध्य प्रदेशमध्ये पुन्हा भाजपाच आघाडीवर

मध्य प्रदेशमध्ये गुना या लोकसभा मतदारसंघातून काँग्रेस उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया हे तब्बल १ लाख २६ हजार मतांनी पिछाडीवर आहे. त्यांच्यासमोर भाजपाचे कृष्णपाल सिंह उर्फ डॉ. के पी यादव हे उभे ठाकले असून त्यांना तब्बल ६ लाख मते मिळाली आहेत. मध्य प्रदेशमध्ये लोकसभेच्या २९ जागा असून यातील २८ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेसला फक्त एका जागेवर आघाडीवर आहे.  या राज्यातील भोपाळमधील लढतीकडे सर्वांचे लक्ष होते. भोपाळमध्ये साध्वी सिंह विरुद्ध दिग्विजय सिंह अशी लढत होती. यात साध्वी सिंह यांनी तब्बल ७ लाख ६७ हजार मते मिळवली असून दिग्विजय सिंह यांना ४ लाख ५५ हजार मते मिळाली आहेत. विशेष म्हणजे याच वर्षी मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बाजी मारली होती. 

17:41 (IST)23 May 2019
इम्रान खान यांनी केले मोदींचे अभिनंदन

लोकसभा निवडणुकीतील विजयासाठी जगभरातून पंतप्रधान नरेंद्र मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी देखील मोदींचे अभिनंदन केले आहे. भाजपा आणि त्यांच्या सहकारी पक्षांनी मिळवलेल्या विजयाबद्दल नरेंद्र मोदीचं अभिनंदन असं ट्विट त्यांनी केलं आहे

यापूर्वी अफगाणिस्तान, बांगलादेश, इस्रायल या देशांच्या राष्ट्रप्रमुखांनीही मोदींना विजयासाठी शुभेच्छा दिल्या होत्या.

17:36 (IST)23 May 2019
झारखंडमध्येही भाजपाची लाट

झारखंडमधील लोकसभेच्या १४ मतदारसंघांपैकी ११ मतदारसंघांमध्ये भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेस, झारखंड मुक्ती मोर्चा आणि एजेएसयू प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. या राज्यामधील लक्षवेधी लढत हजारीबाग मतदारसंघात होती. हजारीबाग मतदारसंघात भाजपाकडून नागरी हवाई वाहतूक मंत्री जयंत सिन्हा आणि काँग्रेसचे गोपाळ साहू हे एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. २०१४मध्ये या मतदारसंघातून जयंत सिन्हा हे तब्बल दीड लाखांहून अधिक मतांनी निवडून आले होते. २०१४ मध्ये त्यांचे वडील यशवंत सिन्हा यांनी त्यांच्यासाठी प्रचार केला होता. पण यंदा यशवंत सिन्हा यांनी भाजपापासून फारकत घेतली होती. त्यामुळे या मतदारसंघाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. या मतदारसंघात जयंत सिन्हा यंदा तब्बल सहा लाखांहून अधिक मते मिळवली आहेत. तर गोपाल साहू यांन सव्वा दोन लाख मते मिळाली आहेत.

17:21 (IST)23 May 2019
'लोकसत्ता'च्या पत्रकाराला शेकाप आमदार जयंत पाटील यांची मारहाण

रायगड लोकसभा मतदारसंघात शेतकरी कामगार पक्षाने (शेकाप) पाठिंबा देऊनही राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराचा निसटता विजय झाला. तर मावळमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव झाला. यामुळे संतप्त झालेले शेकाप नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी 'लोकसत्ता'चे अलिबागमधील प्रतिनिधी हर्षद कशाळकर यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. या घटनेचा पत्रकार हल्ला विरोधी कृती समितीने निषेध केला आहे. वाचा सविस्तर>>

17:12 (IST)23 May 2019
राहुल गांधींनी अमेठी गमावलं ?, वायनाड कमावलं

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे उत्तर प्रदेशमधील अमेठी आणि केरळमधील वायनाड या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. यातील अमेठीत राहुल गांधी हे पिछाडीवर असले तरी वायनाड या मतदारसंघात ते विक्रमी आघाडीवर आहेत. वायनाडमध्ये राहुल गांधी हे चार लाखांहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. मतदारसंघांच्या पुनर्रचनेनंतर २००९च्या सार्वत्रिक निवडणुकीत वायनाड लोकसभा मतदारसंघ अस्तित्वात आला. २००९ आणि २०१४च्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस उमेदवार एम. आय. शहनवास हे निवडून आले होते. गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये त्यांचे निधन झाले. २००९ मध्ये काँग्रेसचा उमेदवार दीड लाखांनी विजयी झाला होता. २०१४ मध्ये शहनवास यांचे मताधिक्य २० हजारांपर्यंत घटले होते. वायनाड जिल्ह्यात हिंदू लोकसंख्या ही ४९ टक्क्यांच्या आसपास आहे. राहुल गांधी यांनी केरळ, तमिळनाडू आणि कर्नाटक या तीन राज्यांशी जोडणारा दुवा म्हणूनच वायनाड मतदारसंघाची निवड केली होती.

16:16 (IST)23 May 2019
नरेंद्र मोदींची विक्रमी मताधिक्याच्या दिशेने वाटचाल

वाराणसी या मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विक्रमी मताधिक्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. वाराणसीत मोदींविरोधात काँग्रेसतर्फे अजय राय हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. तर समाजवादी पक्षातर्फे शालिनी यादव यांना संधी देण्यात आली होती. या मतदारसंघात ब्राह्मण, ठाकूर आदी उच्चवर्णीय, ओबीसींमध्ये कुर्मी तसेच, वैश्य, खत्री हे समाज मोदींच्या मागे उभे राहिल्याचे दिसते. २०१४ मधील निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना ५ लाख ८१ हजार, अरविंद केजरीवाल यांना २ लाख ०९ हजार, काँग्रेसचे अजय राय यांना ७५,६१४ मते मिळाली होती. यंदाच्या निवडणुकीत  तब्बल ४ लाख ३६ हजार मतांनी आघाडीवर आहेत. तर शालिनी यादव दुसऱ्या स्थानी आहे.

15:50 (IST)23 May 2019
अशोक चव्हाण पराभवाच्या छायेत

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि नांदेडमधील उमेदवार अशोक चव्हाण यांचा पराभव होण्याची शक्यता आहे. २०१४ मध्ये ते मोदी लाटेतही निवडून आले होते. पण यंदा वंचित आघाडीने जवळपास एक लाखांपेक्षा अधिक मत  घेतल्याने फटका त्यांना बसल्याचे दिसते. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  ५० हजार मतांनी पिछाडीवर आहेत. 

15:41 (IST)23 May 2019
रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांच्या मोदींना शुभेच्छा

लोकसभा निवडणूकीत मिळालेल्या घवघवीत यशाबद्दल पंतप्रधान माेदींचे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर  पुतिन यांनी अभिनंदन केले आहे.

14:58 (IST)23 May 2019
भाजपाच्या विजयावर मोदींची प्रतिक्रिया, म्हणाले...

लोकसभा निवडणुकीत ५४२ पैकी ५४२ मतदारसंघाचे कौल समोर आले असून भाजपाप्रणित एनडीए ३४३ जागांवर आघाडीवर आहे. देशातील जनतेने मोदी सरकारच्या बाजूने कौल दिल्याचे दिसत असून या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सबका साथ + सबका विकास + सबका विश्वास = विजयी भारत, असे ट्विट मोदींनी केले आहे. पुन्हा एकदा भारताचा विजय, असे मोदींनी सांगितले.

14:53 (IST)23 May 2019
ईव्हीएमबाबत लोकांच्या मनात संशयाचं भूत: शरद पवार

लोकांच्या मनात ईव्हीएमबाबत संशयाच भूत असून यापूर्वी नरसिंहराव, राजीव गांधी यांचा देखील भरघोस मताधिक्याने विजय झाला होता, पण त्यावेळी ईव्हीएमवर शंका उपस्थित झाल्या नव्हत्या.  पण यंदा प्रथमच ईव्हीएमबाबत शंका उपस्थित होत आहेत: शरद पवार

14:46 (IST)23 May 2019
बाबुल सुप्रियो आघाडीवर, मुनमुन सेन पिछाडीवर

पश्चिम बंगालमधील आसनसोल या मतदारसंघात भाजपाचे बाबुल सुप्रियो विरुद्ध तृणमूल काँग्रेसच्या मुनमुन सेन अशी लढत आहे. बाबुल सुप्रियो या मतदारसंघातून गेल्या वेळी खासदार म्हणून निवडून आले आणि ते केंद्रात मंत्रीही झाले. मुनमुन सेन या गेल्या वेळी बांकुरा मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या. या मतदारसंघात १५ टक्के मतदार असून ३० टक्के हिंदी मतदार आहेत. या मतदारसंघात माकपकडून गौरांग चटर्जी रिंगणात आहेत. या मतदारसंघात मुनमुन सेन या तब्बल ६५ हजार मतांनी पिछाडीवर आहेत. निकाल पाहून मी दु:खी असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

14:30 (IST)23 May 2019
शत्रुघ्न सिन्हा पिछाडीवर

बिहारमधील पाटणा साहिब या मतदारसंघाकडे देशभराचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात दोनदा भाजपाच्या तिकीटावर निवडून आलेले पण यंदा काँग्रेसमध्य प्रवेश केलेले शत्रुघ्न सिन्हा यांच्यासमोर भाजपातर्फे केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना उमेदवारी देण्यात आली आहे. २००९ पासून शत्रुघ्न सिन्हा या मतदारसंघातील खासदार आहेत. मात्र, गेली पाच वर्षे ते भाजपा नेतृत्वावर नाराज होते आणि त्यांनी सातत्याने मोदींवर टीका देखील केली होती. यंदा शत्रुघ्न सिन्हा यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. मात्र, शत्रुघ्न सिन्हा हे या निवडणुकीत पिछाडीवर असल्याचे दिसते. रविशंकर प्रसाद हे १ लाख ४० हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत.

14:21 (IST)23 May 2019
मोदींनी शुक्रवारी बोलवली कॅबिनेटची बैठक

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी कॅबिनेटची बैठक बोलवली आहे.  निवडणूक निकालानंतर ही पहिलीच बैठक असणार आहे.

13:44 (IST)23 May 2019
जगभरातून मोदींवर शुभेच्छांचा वर्षाव

इस्रायलचे पंतप्रधान नेत्यानाहू यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.  भारत आणि इस्रायलमधील मैत्रीपूर्ण संबंध यापुढे आणखी बळकट करु, असे त्यांनी म्हटले आहे. यापूर्वी श्रीलंकेचे पंतप्रधान रनिल विक्रमसिंघे यांनी देखील मोदींना शुभेच्छा दिल्या आहेत.

13:39 (IST)23 May 2019
गोव्यातील दोन लोकसभा मतदारसंघांमध्ये परिस्थिती काय?

गोव्यात दक्षिण व उत्तर असे लोकसभेचे दोन मतदारसंघ येतात. गेल्या वेळी दोन्ही ठिकाणी भाजपने विजय मिळवला होता. यंदाची परिस्थिती वेगळी आहे. गोव्यात भाजपा उभारणीत महत्त्वाचे योगदान देणाऱ्या मनोहर पर्रिकर यांच्या पश्चात पक्ष निवडणुकीला सामोरा जात आहे. यातील उत्तर गोव्यात केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्यासमोर काँग्रेसने प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे आव्हान आहे.  श्रीपाद नाईक १९९९ पासून या मतदारसंघात विजयी होत आहेत.  यंदाच्या निवडणुकीतही श्रीपाद नाईक यांना एक लाखांहून अधिक मते मिळाली आहेत. तर काँग्रेस उमेदवाराला ८३, ३३५ मते मिळाली आहेत. दक्षिण गोवा मतदारसंघात भाजपाचे नरेंद्र सवाईकार आणि काँग्रेसचे फ्रांसिस्को कॅटानो सरडिन्हा यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात अटीतटीची लढत सुरु आहे.

13:19 (IST)23 May 2019
तामिळनाडूत द्रमुक जोमात

तामिळनाडूत ३९ पैकी ३८ मतदारसंघाचे कल समोर आले असून यात द्रमुकने तब्बल २२ जागांवर आघाडी घेतली आहे. तर अण्णाद्रमुक २ जागांवर आघाडीवर आहे. डावे पक्ष चार, काँग्रेस आठ, इंडियन यूनियन मुस्लीम लीग एकाजागेवर आघाडीवर आहे. डीएमकेने चमकदार कामगिरी केल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. डीएमकेच्या कार्यकर्त्यांनी कार्यालयाबाहेर फटाके फोडून विजय साजरा केला. तर अण्णाद्रमुकला अंतर्गत गटबाजीचा फटका बसला आहे. जयललिता आणि करुणानिधी यांच्या निधनानंतर होणारी ही निवडणूक महत्त्वाची मानली जात होती.

12:59 (IST)23 May 2019
पोटनिवडणुकीत भाजपाला हादरा, दिवंगत पर्रिकर यांच्या मतदारसंघात काँग्रेसची बाजी

गोव्यातील पणजी या मतदारसंघात काँग्रेसची बाजी, हा मतदारसंघ मनोहर पर्रिकर यांचा मतदारसंघ होता. पर्रिकर यांच्या पश्चात भाजपाची ही पहिलीच निवडणूक होती.  या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे  अटानेसियो मॉनसरेट यांनी बाजी मारली.  वाचा सविस्तर>>

12:45 (IST)23 May 2019
सुषमा स्वराज यांनी केले मोदींचे अभिनंदन

लोकसभा निवडणुकीत भाजपाने बहुमताचा आकडा ओलांडताच भाजपाच्या गोटात उत्साहाचे वातावरण आहे. सुषमा स्वराज यांनी देखील ट्विटरच्या माध्यमातून या विजयासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन केले आहे.

12:30 (IST)23 May 2019
'एनडीए' ३३९ जागांवर आघाडीवर

लोकसभा निवडणुकीतील ५४२ पैकी ५४२ मतदारसंघांचे कल हाती असून यातील भाजपाप्रणित 'एनडीए' ३३९ जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेसप्रणित यूपीए ८५ जागा आघाडीवर आहेत. तर अन्य पक्षांना ११८ जागा मिळाल्या आहेत. यात भाजपा २९२ जागा आघाडीवर आहेत. तर काँग्रेस ५१, तृणमूल काँग्रेस २५, शिवसेना २०, बहुजन समाज पक्ष ११, बिजू जनता दल १४, डीएमके २२, राष्ट्रवादी काँग्रेस ४, एआयएडीएमके २ जागांवर आघाडीवर आहेत. जनता दल संयुक्त १६, जनता दल धर्मनिरपेक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.

11:55 (IST)23 May 2019
माझ्या विजयात धर्माचा विजय - साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर

निश्चितच माझा विजय होणार आहे, असा विश्वास भाजपाच्या भोपाळ मतदार संघातील उमेदवार साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांनी व्यक्त केला आहे. 'माझा विजयात धर्माचा विजय होईल, अधर्माचा नाश होणार आहे. भोपाळमधील जनतेचे याबद्दल धन्यवाद, असेही त्या म्हणाल्या.'  भोपाळमध्ये साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या ५० हजारहून अधिक मतांनी आघाडीवर आहेत. साध्वी प्रज्ञा यांना २, २५, १८३ मते आणि काँग्रेस उमेदवार दिग्विजय सिंह यांना १ लाख ६८ हजार ५८९ मते मिळाली आहेत.

11:32 (IST)23 May 2019
मोदींच्या मातोश्री प्रसारमाध्यमांसमोर

लोकसभा निवडणुकीचे कल समोर येऊ लागल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या मातोश्रींनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन त्यांचे आभार मानले

11:19 (IST)23 May 2019
बेगुसरायमध्ये कन्हैयाकुमार पराभवाच्या वाटेवर, गिरीराज सिंह आघाडीवर

बिहारमधील बेगुसरायमधील लढत ही लक्षवेधी आहे. या मतदारसंघात जेएनयूतील विद्यार्थी संघटनेचा माजी अध्यक्ष आणि भाकपाचा उमेदवार कन्हैयाकुमार, भाजपाचे उमेदवार आणि केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आणि काँग्रेस- राजद महाआघाडीचे उमेदवार तन्वीर हसन यांच्यात लढत आहे. या मतदारसंघात भाजपाचे गिरीराज सिंह हे ८९ हजार मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात भूमीहार, मुस्लीम, यादव आणि कुर्मी मतदार आहेत. गिरीराज सिंह आणि कन्हैयाकुमार हे भूमीहार समाजाचे आहेत. तन्वीर हसन आणि कन्हैयाकुमार यांच्यात मुस्लीम मतांचे विभाजन झाल्याने याचा फायदा भाजपाला झाल्याचे दिसते.

10:58 (IST)23 May 2019
जम्मू- काश्मीरमध्ये भाजपा आघाडीवर, पीडीपीला मोठा हादरा

जम्मू- काश्मीरमधील अनंतनाग या मतदारसंघात पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती तिसऱ्या स्थानी, या मतदारसंघात नॅशनल कॉन्फरन्स आघाडीवर आहे. जम्मू- काश्मीरमध्ये लोकसभेच्या सहा जागा असून यातील दोन जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर नॅशनल कॉन्फरन्स २, काँग्रेस आणि अपक्ष उमेदवार प्रत्येकी एका जागेवर आघाडीवर आहे. उधमपूर येथून केंद्रीय मंत्री डॉ. जितेंद्र सिंह हे रिंगणात असून जम्मू येथे भाजपाचे जुगल किशोर निवडणूक लढवत आहे. या दोन्ही मतदारसंघात भाजपा आघाडीवर आहे. लडाख येथे सज्जाद हुसैन हे अपक्ष उमेदवार आघाडीवर आहे. 

10:40 (IST)23 May 2019
एच डी कुमारस्वामी यांना हादरा?, सुमनलता आघाडीवर

कर्नाटकमधील मंड्या या मतदारसंघात सुमनलता अंबरीश या १२०० मतांनी आघाडीवर आहेत. या मतदारसंघात त्यांच्यासमोर एच डी कुमारस्वामी यांचे पूत्र निखील हे रिंगणात आहेत. सुमनलता या कर्नाटकमधील प्रसिद्ध दिवंगत अभिनेते अंबरीश यांच्या पत्नी असून अंबरीश हे १९९८ ते २००९ या कालावधीत तीन वेळा या मतदारसंघाचे खासदार होते. या जिल्ह्यात देवेगौडा कुटुंबाची ताकद असून भाजपाने या भागात सुमनलता यांना पाठिंबा दिला आहे.  कर्नाटकमध्ये लोकसभेच्या २८ जागा असून यातील २३ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर काँग्रेस तीन जागांवर आणि जनता दल धर्मनिरपेक्ष एका जागेवर आघाडीवर आहे.

10:28 (IST)23 May 2019
उत्तर प्रदेशात ५६ जागांवर भाजपा आघाडीवर

उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. यातील ७९ जागांचे कल हाती आले असून यातील तब्बल ५६ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर बहुजन समाज पक्ष ११, काँग्रेस एक आणि समाजवादी पक्ष सहा तर अपना दल एका जागेवर आघाडीवर आहेत. उत्तर प्रदेशमध्ये यंदा सप- बसप या पक्षांनी महाआघाडी केली असून या महाआघाडीचा भाजपाच्या मतांवर फारसा परिणाम झालेला नाही, असे दिसते. २०१४ मधील लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या विजयात उत्तर प्रदेशचे मोलाचे योगदान होते. एनडीएला तब्बल ७३ जागा मिळाल्या होत्या. तर बहुजन समाज पक्षाला भोपळाही फोडता आला नव्हता. यंदा बसपने तब्बल ११ जागांवर आघाडी घेत दमदार पुनरागमन केले आहे. 

10:12 (IST)23 May 2019
दिल्लीत भाजपा सात जागांवर आघाडीवर

दिल्लीत सात लोकसभा मतदारसंघ असून या सातही मतदारसंघात भाजपा आघाडीवर आहेत

10:09 (IST)23 May 2019
मोदी, शाह आघाडीवर

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणसी मतदारसंघातून २० हजार मतांनी तर अमित शाह हे गांधीनगर मतदारसंघातून ५० हजार मतांनी आघाडीवर

09:54 (IST)23 May 2019
उत्तर प्रदेशात भाजपा ५३ जागांवर आघाडीवर

उत्तर प्रदेशमधील ८० पैकी ७२ जागांचे कल हाती आली आहेत.  यात बहुजन समाज पक्ष - ११, भाजपा- ५३, काँग्रेस - १ आणि समाजवादी पक्ष ७ जागांवर आघाडीवर आहेत.

09:44 (IST)23 May 2019
मनेका गांधी पिछाडीवर

भाजपा उमेदवार आणि केंद्रीय मंत्री मनेका गांधी या सुलतानपूर मतदारसंघातून पिछाडीवर तर वरुण गांधी पीलीभीत येथून भाजपा आघाडीवर, सोनिया गांधी रायबरेलीतून आघाडीवर

09:39 (IST)23 May 2019
दिल्ली पूर्व या मतदारसंघात गौतम गंभीर आघाडीवर

दिल्ली पूर्व या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार गौतम गंभीर आघाडीवर, या मतदारसंघात काँग्रेसकडून अरविंदर सिंग लव्हली आणि आम आदमी पक्षातर्फे आतिशी मार्लेना या रिंगणात आहेत. 

09:34 (IST)23 May 2019
पश्चिम बंगालमध्ये भाजपा ९ जागांवर आघाडीवर

पश्चिम बंगालमधील ४२ पैकी १५ जागांचे कल हाती आले असून यातील सहा जागांवर तृणमूल काँग्रेस तर ९ जागांवर भाजपा आघाडीवर

09:30 (IST)23 May 2019
भाजपा २०६ जागांवर आघाडीवर

निवडणूक आयोगाच्या वेबसाईटवरील माहितीनुसार ५४२ पैकी ३७१ जागांवरील कल हाती आली असून यात भाजपा २०६ जागांवर आघाडीवर, काँग्रेस ५५ जागांवर आघाडीवर आहे. बहुजन समाज पक्ष १० जागांवर आघाडीवर. डीएमके १४ जागांवर आघाडीवर

09:24 (IST)23 May 2019
गिरीराज सिंह हे आघाडीवर

बिहारमधील बेगुसराय या मतदारसंघात गिरीराज सिंह हे आघाडीवर असून या मतदारसंघात डाव्या पक्षांकडून कन्हैया कुमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

09:17 (IST)23 May 2019
काँग्रेससाठी धोक्याची घंटा?, स्मृती इराणी आघाडीवर

अमेठीमधून स्मृती इराणी या ५६०० मतांनी आघाडीवर आहेत. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीतून पिछाडीवर तर वायनाडमधून दहा हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

09:13 (IST)23 May 2019
अशोक चव्हाण पिछाडीवर

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण सुरूवातीच्या कलांमध्ये पिछाडीवर आहेत. एनडीएचे उमेदवार चिखलीकर यांच्याकडून त्यांना तगडे आव्हान मिळत आहे

09:11 (IST)23 May 2019
राजनाथ सिंह आघाडीवर

तिसऱ्या फेरीअखेर लखनऊमधून भाजपाचे राजनाथ सिंह आघाडीवर आहेत

09:08 (IST)23 May 2019
नितिन गडकरी आघाडीवर

भाजपाचे केंद्रीय मंत्री नितिन गडकरी नागपूरमधून तीन हजार मतांनी आघाडीवर आहेत. 

09:02 (IST)23 May 2019
स्मृती इराणी आघाडीवर

अमेठीमधून स्मृती इराणी दोन हजार मतांनी आघाडीवर आहेत.  काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी अमेठीमधून पिछाडीवर आहेत तर वायनड मतदार संघातून ५५०० मतांनी आघाडीवर

09:02 (IST)23 May 2019
अमित शाह आघाडीवर

सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपा अध्यक्ष अमित शाह २५ हजार मतांनी आघाडीवर

08:59 (IST)23 May 2019
नरेंद्र मोदी आघाडीवर

वाराणसीमधून पंतप्रधान नरेंद्र मोदी आघाडीवर

08:56 (IST)23 May 2019
साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर आघाडीवर

भोपाळ मतदार संघातून भाजपाच्या साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूर तीन हजार मतांनी आघाडीवर 

08:50 (IST)23 May 2019
३८ जागांवर एनडीए आघाडीवर

५४२ पैकी ६४ जागांचे कल हाती आले असून यातील ३८ जागांवर एनडीए, यूपीए - १८ तर अन्य पक्ष ९ जागांवर आघाडीवर

08:45 (IST)23 May 2019
अमेठीत राहुल गांधी पिछाडीवर

उत्तर प्रदेशमधील अमेठीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे पिछाडीवर, भाजपाच्या उमेदवार स्मृती इराणी आघाडीवर 

08:43 (IST)23 May 2019
पार्थ पवार, उर्मिला मातोंडकर पिछाडीवर

मावळमध्ये पार्थ पवार आणि मुंबई उत्तर या मतदारसंघात  उर्मिला मातोंडकर पिछाडीवर. 

08:41 (IST)23 May 2019
#ModiAaRahaHai विरुद्ध #आ_रही_है_कांग्रेस; सोशल नेटवर्किंगवर हॅशटॅग युद्ध

आज सकाळपासून सोशल नेटवर्किंग साईट्सवर या निकालांचीच चर्चा पहायला मिळत आहेत. फेसबुक, ट्विटरबरोबरच इन्स्ताग्राम आणि व्हॉट्सअप ग्रुप्सवरही निवडणुकांच्या निकालाचीच चर्चा आहे. वाचा सविस्तर>>

08:33 (IST)23 May 2019
मल्लिकार्जून खरगे पिछाडीवर

कर्नाटकमधील कलबुर्गी या मतदारसंघात सुरुवातीच्या कलानुसार काँग्रेसचे उमेदवार मल्लिकार्जून खरगे हे पिछाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपाने उमेश जाधव यांना उमेदवारी दिली आहे. जाधव हे पूर्वी काँग्रेसमध्येच होते. 

08:30 (IST)23 May 2019
गांधीनगर मतदारसंघात अमित शाह हे आघाडीवर

गांधीनगर या मतदारसंघात भाजपाचे उमेदवार अमित शाह हे आघाडीवर, गांधीनगर हा लालकृष्ण अडवाणी यांचा मतदारसंघ होता. पण या निवडणुकीत भाजपाने  अडवाणीऐंवजी अमित शाह यांना उमेदवारी दिली आहे. 

08:27 (IST)23 May 2019
सुरुवातीच्या कलानुसार 'एनडीए'आघाडीवर

सुरुवातीच्या कलानुसार 'एनडीए' आघाडीवर

08:18 (IST)23 May 2019
भाजपा ४४ जागांवर आघाडीवर

५४२ पैकी ७१ जागांवरील सुरुवातीचे कल हाती आले असून भाजपा ४४, काँग्रेस २३ आणि अन्य पक्ष ४ जागांवर आघाडीवर आहे. 

देशभरात ५४२ लोकसभा मतदारसंघांमधील १०.३ लाख मतदानकेंद्रांवर मतदान झाले असून मतपावती जोडलेल्या १६,२६० मतदान यंत्रांची पडताळणी केली जाणार आहे. या मतपडताळणी प्रक्रियेसाठी पाच ते सहा तासांचा कालावधी जास्त लागणार असल्याने अधिकृत निकालांना उशीर होणार आहे.

First Published on May 23, 2019 7:32 am

Web Title: lok sabha election results 2019 live updates narendra modi bjp rahul gandhi congress
Next Stories
1 यंदा निकालाला विलंब!
2 संभाव्य पराभवाच्या धास्तीने विरोधकांची आदळआपट!
3 Lok Sabha Election results 2019 : मतमोजणी कशी होते?
Just Now!
X