संदीप आचार्य/ वीरेंद्र तळेगावकर

लोकसभा निवडणुकीच्या वेगवान प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाजपने देशातील बहुसंख्य हेलिकॉप्टर व विमाने भाडय़ाने घेऊन ठेवल्यामुळे काँग्रेसला प्रचारासाठी पुरेशी हेलिकॉप्टर मिळणे अवघड झाले आहे. प्रचारासाठी उपलब्ध होणारी हेलिकॉप्टर्स सामान्यपणे ४५ दिवस आधी भाडय़ाने घेतली जातात मात्र भाजपने ही विमाने ९० दिवस आगाऊ भाडय़ाने घेऊन काँग्रेसची कोंडी केली आहे.

लोकसभेच्या २०१४ च्या निवडणुकीतही भाजपने नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या स्टार प्रचारकांसाठी मोठय़ा प्रमाणात हेलिकॉक्टर व विमाने भाडय़ाने घेतली होती. तथापि यावेळेच्या निवडणुकीत काँग्रेसला वेगवान प्रचारासाठी हेलिकॉप्टर व विमाने मिळूच नयेत, अशी रणनीती भाजपने आखल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात येत आहे. काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्याच्या म्हणण्यानुसार जवळपास ९० टक्के हेलिकॉप्टर भाजपने आरक्षित केल्यामुळे काँग्रेसकडे आज प्रचारासाठी पुरेशी हेलिकॉप्टर उपलब्ध नाहीत. याचा फटका स्टार प्रचारकांच्या जाहीर सभांना बसतो. सामान्यपणे स्टार प्रचारक दिवसाला तीन ते पाच सभा घेत असतात. एका राज्यातून दुसऱ्या राज्यातील सभेसाठी वेळेत पोहोचायचे असेल तर हेलिकॉप्टर पक्षाच्या तैनातीत असणे आवश्यक असते. भाजप अध्यक्ष अमित शहा व काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या प्रचारासाठीची विमाने मात्र यावेळी सहा महिने आधीच आरक्षित करण्यात आल्याचे विमानसेवा क्षेत्रातील सूत्रांनी नाव जाहीर न क रण्याच्या अटीवर सांगितले.

आजघडीला देशात जवळपास २१० हेलिकॉक्टर असून ५५ छोटी विमाने आहेत. हेलिकॉप्टर व विमाने भाडय़ाने देण्याच्या व्यवसायात असलेले ‘मॅब एव्हिएशन’चे मंदार भारदे म्हणाले, आजघडीला देशात उपलब्ध असलेल्या हेलिकॉप्टर्सपैकी सुमारे सव्वाशे निवडणुकीच्या प्रचारासाठी उपलब्ध होतात. २०१४ च्या निवडणुकीत हेलिकॉप्टर व विमानाचे जे भाडे होते त्यात वाढ झाली असून भाजपकडे सध्या प्रचारासाठी विमानांचा मोठा ताफा आहे. हेलिकॉप्टरचे भाडे त्याच्या दर्जानुसार असून साधारणपणे तासाला एक लाख रुपये ते साडेचार लाख रुपये भाडे आकारले जाते. छोटय़ा विमानांबाबतही ९० हजार रुपये ते चार लाख ८० हजार रुपये तासाला भाडे आकारण्यात येते, असे भारदे म्हणाले.

यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीतील प्रचारफेऱ्यांकरिता जवळपास सर्वच राजकीय पक्षांकडून हेलिकॉप्टर, छोटय़ा विमानांसाठीची मागणी नोंदली गेली आहे. मात्र त्यातही मोठे राष्ट्रीय पक्ष हे ग्राहक म्हणून हवाई कंपन्यांकडे आहेत. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत जशी हवाई फेऱ्यांसाठी मागणी वाढली आहे, तसेच त्यामुळे यंदा भाडय़ातही वाढ झाली आहे, असे एक्सिरेशन एव्हिएशनचे राहुल मुछ्छल यांनी लोकसत्ताला सांगितले.

भाजपकडे राफेल, व्यापमघोटाळा तसेच वेगवेगळ्या माध्यमातून अमाप पैसा आल्यामुळे त्यांनी बहुतेक हेलिकॉप्टर व विमाने जवळपास तीन महिन्यांपूर्वीच आरक्षित करून ठेवली. त्यांच्यामुळे विमानाच्या भाडय़ाचे दरही यंदा खूप वाढले आहेत. सामान्यपणे निवडणुकीच्या ४५ दिवस आधी सभा, दौरे व नेत्यांचा विचार करून विमानांचे आरक्षण केले जाते. परंतु भाजपकडे आता अमाप पैसा असल्यामुळे त्यांनी ९० दिवस आधी आरक्षण करून बहुतेक हेलिकॉक्टर व विमाने आपल्या ताब्यात घेतली.

पृथ्वीराज चव्हाण, माजी मुख्यमंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते

सोळा राज्यात भाजपची सत्ता आहे. आमच्याकडे अनेक चांगले नेते व मुख्यमंत्री प्रचारात उतरल्याने आम्हाला जास्त हेलिकॉप्टर व विमाने लागणारच. वेळेचे योग्य नियोजन करूनच आम्ही विमाने भाडय़ाने घेतली असून प्रचाराच्या खर्चाचा सर्व हिशोब निवडणूक आयोगाला दिला जातो. काँग्रेसला काही प्रश्न असल्यास त्या पक्षाते नेते संबंधित यंत्रणांकडे दाद मागू शकतात.

– विनय सहस्त्रबुद्धे, खासदार, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष