पनवेल : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आणि चिल्ले पिल्ले उभे केले. बारामतीचे पार्सल बारामतीला पाठवायची हीच वेळ आहे, अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी कामोठे येथे केली. मावळ लोकसभा मतदारसंघातील युतीचे उमेदवार श्रीरंग (आप्पा) बारणे यांची ‘विजय संकल्प सभे’त ते बोलत होते.

२००८ साली झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यापलीकडे आघाडी सरकारने काहीही केले नाही. भाजप सरकारने उरी येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेतला. अतिरेक्यांचे तळ सैन्याने उद्ध्वस्त केल्याचे जगाने मान्य केले, मात्र काँग्रेस राष्ट्रवादीच्या महाखिचडीला हे मान्य नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले. स्वत:च्या जाहीरनाम्यात काँग्रेस राष्ट्रवादी म्हणतेय आम्ही १२४ कलम काढून टाकू, देशविरोधी कारवाई करणाऱ्यांच्या विरोधात ठोस भूमिका घेणारे कलम काढून टाकण्यात यावे ही विरोधी पक्षाची मागणी आहे. अशा पक्षाला मतदान करणे योग्य आहे का, असा सवाल त्यांनी केला.

पूर्वी केवळ ४५ टक्के स्वच्छतागृहे उपलब्ध होती. भाजप सरकारच्या काळात स्वच्छ भारत अभियानांतर्गत पूर्वी हे प्रमाण ९८ टक्क्यांवर गेले. ‘उज्ज्वला योजने’द्वारे १३ कोटी घरांत गॅस सेवा मोफत देण्यात आली. आवस योजनेंतर्गत कोटय़वधी घरांची निर्मिती करण्यात आली, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी भाजप सरकारच्या विविध योजनांचा लेखाजोखा मांडला.  जे आपल्या मावळ मतदारसंघात दाखल झाले आहेत, त्यांना धडा शिकवण्याची हीच वेळ आहे, असे आवाहन आघाडीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांनी केले.