दयानंद लिपारे, कोल्हापूर

लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होण्यास २४ तास उरले असताना कोल्हापूर जिल्ह्यातील उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये निकालाविषयी कुतूहल, हुरहुर आणि धास्ती अशा संमिश्र भावनांचा कल्लोळ दाटला आहे. निवडणूक निकालाचा कल काही संस्था आणि माध्यमांनी दोन दिवसांपूर्वी उघड केला असून त्याच्या सत्यतेवरून चलबिचलता निर्माण झाली आहे. कोल्हापूर जिल्ह्यात दोन्ही ठिकाणी विद्यमान खासदारांना धक्का बसणार असा काहींनी कल व्यक्त केला आहे, तर काहींनी त्यांची दिल्लीवारी निश्चित असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे यापैकी नेमके काय घडणार यावरून उमेदवारांसह समर्थकांत अस्वस्थता पसरली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कोल्हापूर आणि हातकणंगले या दोन्ही लोकसभा निवडणूक मतदार संघात अतिशय चुरशीने निवडणूक झाली आहे. दोन्ही मतदार संघात महाआघाडीचे खासदार आहेत. त्यांना शिवसेनेच्या दोन्ही उमेदवारांनी जोरदार लढत दिली आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार धनंजय महाडिक आणि सेनेचे गतवेळचे संजय मंडलिक यांच्यात सामना रंगला आहे. तर, हातकणंगलेमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांच्यासमोर सेनेचा युवा चेहरा धैर्यशील माने यांनी कडवे आव्हान दिले आहे. या संघर्षांत कोल्हापुरात महाआघाडी आपले स्थान टिकवणार की शिवसेनेचा भगवा फडकणार याचा तर्क लावण्यात राजकीय धुरिणांपासून सामान्य कार्यकर्ते आणि नागरिकही गर्क झाले आहेत. आपलाच उमेदवार येणार असा आत्मविश्वास व्यक्त करण्याबरोबरच लाखांच्या पैजाही लागल्या आहेत.

मतदान होऊ न आता निकाल घोषित होण्यास आता अवघ्या एका दिवसाचे अंतर उरले आहे. प्रत्यक्ष निकालाकडे डोळे लागले असताना दोन दिवसांपूर्वी निवडणूक निकालाचा कल काही संस्था आणि माध्यमांनी जाहीर केला. त्यातील माहितीने उमेदवारांची झोप उडाली आहे.

चक्रावणारे संमिश्र कल

काहींच्या कलानुसार कोल्हापूर जिल्ह्यात दोन्हीकडे शिवसेना बाजी मारणार आहे, तर काहींनी विद्यमानांना पसंती दिली आहे. धनंजय महाडिक, राजू शेट्टी यांच्या विजयाच्या आणि पराजयाचा कल वर्तवला गेला आहे. तसाच तो संजय मंडलिक, धैर्यशील माने यांना यश आणि अपयश व्यक्त करणारा आहे. याचवेळी काहींनी संमिश्र कल दाखवले आहेत. शेट्टी जिंकतील महाडिक हरतील, मंडलिक बाजी मारतील माने पराभूत होतील, महाडिक यशाची पुनरावृत्ती करतील पण शेट्टींसमोर प्रश्नचिन्ह लावले आहे. माने यांना पसंती देताना मंडलिक यश मिळवू शकणार नाहीत, असे पुढे आले आहेत.

आजची रात्र भविष्य घडवणारी

त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन्ही जागी ठामपणे कोण गुलाल लावणार याचे भाष्य करणे कठीण बनले आहे. त्यातच निकालाच्या कल देणाऱ्या माहितीने गोंधळात भर घातली आहे. निकाल आपल्या बाजूने असा धावा करीतच उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांना आजची रात्र घालवावी लागणार आहे. हे २४ तास त्यांच्या संयमाची कसोटी घेणारे असतील याविषयी संदेह असण्याचे कारण नाही.