आमदारांचा वैयक्तिक भेटीगाठी, कोपरा सभांवर भर

पुणे : शहरातील सहाही विधानसभा मतदार संघातून मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे उमेदवार गिरीश बापट यांनी व्यक्त केल्यामुळे आमदारांची परीक्षा सुरू झाली आहे. त्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार, वैयक्तिक भेटी-गाठी, मोठय़ा गृहप्रकल्पांमध्ये बैठका, कोपरा सभा या पारंपारिक प्रचाराबरोबरच शक्ती केंद्र, हजारी यंत्रणा आणि बूथ स्तरावरून मतदारांशी संपर्क साधण्याची धावाधाव आमदारांकडून सुरू आहे.

गिरीश बापट यांच्या नावाची घोषणा झाल्यानंतर पुणे लोकसभेअंतर्गत येत असलेल्या सहा मतदार संघातील आमदारांची जबाबदारी वाढली. बापट यांनी कसब्यासह पर्वती, शिवाजीनगर, कोथरूड, पुणे कॅन्टोन्मेंट तसेच वडगावशेरी या सहाही विधानसभा मतदार संघातून मोठे मताधिक्य मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीतही बापट यांना मोठे मताधिक्य मिळवून देण्याची जबाबदारी आमदारांवर आली आहे.

या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’ने पाच आमदार आणि कसबा विधानसभा प्रमुखांशी संवाद साधला. त्यावेळी सर्व आमदारांनी आपापल्या मतदारसंघात प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे याची माहिती दिली.

कसबा विधानसभा मतदार संघात २७९ बूथ तर भाजप नगरसेवकांची संख्या १६ आहे. हजारी प्रमुख आणि शक्ती केंद्राद्वारे मतदार संघातील ८० हजार मतदारांपर्यंत बापट यांचे परिचय पत्र पोहोचविण्यात आले आहे. केंद्र आणि राज्याच्या योजनांची माहिती कोपरा सभा, मेळावे, बैठकांद्वारे देण्यात आली आहे. हजारी यंत्रणेच्या माध्यमातून घरोघरी जाऊन प्रचार पूर्ण करण्यात आला आहे.

राजेश येनपुरे, कसबा विधानसभा मंडल अध्यक्ष

वडगावशेरी मतदार संघात भाजपचे १२, शिवसेनेचे तीन आणि रिपाईंचे दोन नगरसेवक अशी ताकद आहे. त्यामुळे या मतदार संघातून बापट यांना निश्चितच चांगले मतदान होईल. प्रचाराचे नियोजन करताना घरोघरी जाऊन प्रचार करण्यासाठी यंत्रणा राबविण्यात आली आहे. समाजमाध्यमाच्या विविध साधनांचा वापरही केला जात आहे. पदयात्रा, कोपरा सभांवर भर दिला आहे.

जगदीश मुळीक, वडगावशेरी विधानसभा, आमदार

पुणे कॅन्टोन्मेटमध्ये २०१४ पूर्वी भाजपचा एकही नगरसेवक नव्हता. ही संख्या आता पाच झाली आहे. तर पुणे कॅन्टोन्मेंट मधील भाजप नगरसेवकांची १३ अशी आहे. प्रचाराच्या दृष्टीकोनातून ३८ शक्ती केंद्राद्वारे प्रचार सुरू आहे. वानवडी, ताडीवाला रस्ता भागात पदयात्रा आयोजित करण्यात आल्या. याशिवाय स्वतंत्रपणे दुचाकी फेरींचे नियोजन आहे. घरोघरी प्रचारावरच भर असून वैयक्तिक भेटी घेतल्या जात आहेत.

दिलीप कांबळे, पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा, आमदार

शिवाजीनगर विधानसभामतदार संघातून बापट यांना सर्वाधिक मतदान होईल. घरोघरी प्रचार करण्याचे टप्पे पूर्ण झाले आहेत. बूथ यंत्रणेच्या माध्यमातून प्रचार होत आहे. भाजपचे व्यासपीठ सोडून संस्था, संघटना प्रतिष्ठित व्यक्तींशी संपर्क झालेला आहे. त्याला कोपरा सभा, सोसायटय़ांमधील बैठकांची जोड मिळत आहे. मतदार संघातील भाजपच्या १२ नगरसेवकांकडूनही पक्षाबरोबरच वैयक्तिक प्रचार होत आहे. केंद्र सरकार आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचविली जात आहे.

– विजय काळे, शिवाजीनगर विधानसभा, आमदार

पर्वती विधानसभा मतदार संघातील नगरसेवकांची संख्या २७ असून त्यात भाजपचे २३ नगरसेवक आहेत. या भागात भाजपची संघटनात्मक बांधणी भक्कम आहे. पालिका निवडणुकीत त्याचे प्रत्यंतर आले. विधानसभा निवडणुकीतही भाजपला सातत्याने यश मिळाले आहे. भक्कम संघटन पाठीशी असले तरी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर देण्यात आला आहे. 

माधुरी मिसाळ, पर्वती विधानसभा, आमदार

गेल्या लोकसभा निवडणुकीत कोथरूड विधानसभा मतदार संघातून खासदार अनिल शिरोळे यांना मोठे मतदान झाले होते. कोथरूडमध्ये २२ नगरसेवक भाजपचे असून एक शिवसेनेचा आहे. त्यामुळे मताधिक्यात यावेळी वाढ होईल. मतदार संघात पन्नास हजार नवमतदार आहेत. त्यांच्याशी संपर्क करण्यात आला आहे. घरोघरी जाऊन प्रचार करण्यालाही प्राधान्य देण्यात येत आहे.

– प्रा. मेधा कुलकर्णी, कोथरूड विधानसभा, आमदार