माजी आमदाराला मारहाण, गिरीश महाजन यांना धक्काबुक्की

जळगाव : लोकसभा निवडणुकीत तिकीट कापाकापीमुळे भाजपमध्ये धुमसणाऱ्या अंतर्गत असंतोषाचे रुपांतर बुधवारी मोठय़ा राडय़ात झाले. ऐन वेळी जळगाव मतदारासंघातून लोकसभेची उमेदवारी रद्द केल्यामुळे संतप्त झालेल्या आमदार स्मिता वाघ यांच्या समर्थकांनी जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांना धक्काबुक्की करीत माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण केली.

अमळनेर शहरात लोकसभेचे उमेदवार उन्मेष पाटील यांच्या प्रचारार्थ आयोजित भाजप-सेना युतीच्या मेळाव्यात ही घटना घडली.

खासदार ए. टी. पाटील यांना उमेदवारी नाकारून स्मिता वाघ यांना भाजपने उमेदवारी दिल्यानंतर खासदार पाटील यांनी पारोळा येथे समर्थक कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला होता. त्यात माजी आमदार डॉ. बी. एस. पाटील यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्यावर आरोप केले होते.

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन यांच्यात वाघ यांनीच भांडण लावले. खासदार पाटील यांना डावलून स्वत:च्या पत्नीला लोकसभेची उमेदवारी मिळविण्यातही उदय वाघ यशस्वी झाल्याचा आरोप डॉ. पाटील यांनी भाषणात केला होता. त्यामुळे वाघ समर्थकांमध्ये आधीच  असंतोष होता. त्याचे पडसाद बुधवरी अमळनेर येथील मेळाव्यात उमटले.

युतीच्या मेळाव्यात उदय वाघ आणि माजी आमदार पाटील यांच्यात शाब्दीक चकमक  झाली. ती संधी साधून वाघ समर्थक कार्यकर्त्यांनी व्यासपीठावर आक्रमण करीत डॉ. पाटील यांना मारहाण करण्यास सुरूवात केली.

मध्यस्थीसाठी पुढे आलेल्या गिरीश महाजन यांनाही कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केली. अकस्मात घडलेल्या या प्रकाराने एकच गोंधळ उडाला. हाणामारी करणाऱ्यांनी स्मिता वाघ यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी केली. मेळाव्याचे रूपांतर हाणामारीत झाल्यामुळे नेत्यांनी काढता पाय घेतला.

भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे. झालेला प्रकार गंभीर असून ज्यांनी कोणी तो घडवून आणला त्यांच्यावर कारवाई निश्चितपणे होईल.  डॉ. बी. एस. पाटील यांना मारहाण होत असताना मी कार्यकर्त्यांना बाजूला करीत होतो. मला धक्काबुक्की किंवा मारहाण झालेली नाही

– गिरीश महाजन, जलसंपदामंत्री