राज्यातील १४ मतदारसंघांमध्ये आज मतदान; पश्चिम महाराष्ट्रात चुरस

तिसऱ्या टप्प्यात राज्यातील १४ मतदारसंघामध्ये उद्या मतदान होणार आहे. मतदान होत असलेल्या मतदारसंघांपैकी सध्या १० जागा युतीकडे तर चार जागा राष्ट्रवादीकडे असल्याने युतीचा वरचष्मा कायम राहणार की काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी बाजी मारणार याची उत्सुकता आहे. या टप्प्यात नेत्यांच्या मुलांचे मतदारसंघ असल्याने या नेतेमंडळींची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सुप्रिया सुळे, सुजय विखे-पाटील, नीलेश राणे, रक्षा खडसे, विशाल पाटील या नेतेमंडळींच्या मुलासुनांचे भवितव्य उद्याच ठरणार आहे.

राज्यातील १७ मतदारसंघांमध्ये आतापर्यंत मतदान पार पडले. तिसऱ्या टप्प्यात जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, रायगड, पुणे, बारामती, अहमदनगर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये उद्या मतदान होत आहे. गत निवडणुकीत या मतदारसंघांमध्ये भाजपचे सहा, शिवसेना तीन आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एक असे युतीचे १० खासदार निवडून आले होते. राष्ट्रवादीला तेव्हा चार जागा मिळाल्या होत्या. गतवेळप्रमाणेच मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रात चांगले यश मिळविण्याचा युतीचा प्रयत्न आहे.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आणि महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे निलेश राणे यांच्यात चुरशीची लढत होत आहे. शिवसेना आणि राणे या दोघांनीही ही लढत प्रतिष्ठेची केली आहे. गेल्या वेळी पराभव झाला असला तरी यंदा कोणत्याही परिस्थितीत हा मतदारसंघ जिंकायचाच हा निर्धार माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला आहे.

बारामती

राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेला हा मतदारसंघ जिंकायचाच या निर्धाराने भाजप रिंगणात उतरला आहे. बारामतीची जागा जिंका, असा आदेशच भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील हे या दृष्टीने कामाला लागले होते.खासदार सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कूल यांच्यात लढत होत आहे. यंदा विजय भाजपचा असेल, असा दावा भाजपच्या गोटातून केला जात असला तरी सुप्रियाताई विजयाबद्दल निर्धास्त आहेत.

अहमदनगर

राष्ट्रवादीने मतदारसंघ सोडण्यास नकार दिल्याने भाजपमध्ये प्रवेश केलेले सुजय विखे आणि राष्ट्रवादीचे संग्राम जगताप या दोन युवकांमध्ये चुरशीची लढत होत आहे. विरोधी पक्षनेते असले तरी राधाकृष्ण विखे-पाटील यांनी भाजपचा उमेदवार असलेल्या पुत्राच्या मागे सारी ताकद उभी केली आहे. विखे-पाटील यांचा त्यांच्या बालेकिल्ल्यात पराभव करण्याची राष्ट्रवादीची योजना आहे.

रावेर 

भाजप नेते एकनाथ खडसे यांची स्नुषा व खासदार रक्षा खडसे आणि काँग्रेसचे उल्हास पाटील यांच्यात लढत होत आहे. आघाडीत हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे होता, पण राष्ट्रवादीने यशाची फार काही खात्री नसल्याने काँग्रेसला सोडला. सुनेसाठी खडसे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

पुणे

भाजपचे गिरीश बापट आणि काँग्रेसचे मोहन जोशी यांच्यात लढत होत आहे. पुणे हा पारंपरिकदृष्टय़ा काँग्रेसचा बालेकिल्ला होता, पण मोदी लाटेत काँग्रेसचा पार धुव्वा उडाला.

रायगड

शिवसेनेचे अनंत गीते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे यांच्यात पुन्हा  लढत होत आहे. कुणबी मतांच्या ध्रुवीकरणावर बरीच गणिते अवलंबून आहेत.

औरंगाबाद

‘खान हवा की बाण’ किंवा ‘शिवशाही की रझाकारी’ या मुद्दय़ांभोवताली औरंगाबादची लढत होते. यंदाही उद्धव ठाकरे यांनी शिवशाही, रझाकारी हे मुद्दे प्रचारात मांडले. शिवसेनेचे चंद्रकांत खैरे, काँग्रेसचे सुभाष झांबड आणि एमआयएमचे इम्तियाझ जलिल यांच्यात लढत होत आहे.सेनेचे बंडखोर आमदार हर्षवर्धन जाधव हेसुद्धा रिंगणात आहेत.