लक्ष्मण राऊत, जालना

मतदान १०-११ दिवसांवर येऊन ठेपले असताना जालना लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या कार्यालयात फारशी वर्दळ नाही, काँग्रेसच्या कार्यालयात तर शुकशुकाटच आहे. कार्यकर्ते संभ्रमात आहेत. या निवडणुकीत आपले नेमके काम काय, असा प्रश्न त्यांना पडला आहे.

दोन प्रबळ प्रतिस्पर्धी असतील तर निवडणुकीत कार्यकर्त्यांना महत्त्व येते. मात्र, सलग चार वेळा जिंकणारे रावसाहेब दानवे आणि काँग्रेसचे उमेदवार विलास औताडे यांच्यातील निवडणूक ‘सोपस्कार’चा भाग राहिला असल्याचे मानले जात आहे. याचे कारण काँग्रेसने घातलेला उमेदवारीचा घोळ.

निवडणुकीच्या रिंगणात सारे काही थंड असले तरी दररोज उन्हाची तीव्रता वाढते आहे. दुष्काळ तीव्र होतो आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यात मनोमीलन झाल्याने राजकीय पटलावर चर्चेत असलेल्या जालना मतदारसंघाविषयी आता मीडियासह कुणालाही फारशी उत्सुकता उरलेली नाही.

खोतकर निवडणूक लढवणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दानवे यांना पराभूत करू असे आव्हान देणारे बच्चू कडू यांनी माघार घेतली. काँग्रेसमधील उमेदवारीचा घोळ लवकर मिटल नाही. दानवेंच्या विरोधात कल्याण काळे, अब्दुल सत्तार, भीमराव डोंगरे या नावांची शिफारस जिल्हा काँग्रेसने केली होती. सत्तार आणि काळे यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला. दानवेंना पराभूत केल्याशिवाय डोक्यावर केस वाढू देणार नाही, अशी शपथ घेतलेले सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेस पक्ष तर सोडलाच, शिवाय दानवे यांच्याबरोबरच विमानात बसून ते मुंबईला गेले. काँग्रेसने विलास औताडे यांना उमेदवारी दिली. औताडे यांचा २०१४च्या निवडणुकीत दोन लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभव झाला होता. दानवे यांनी मात्र मतदारांची बांधणी केली आहे.

खोतकर- दानवे यांच्या मनोमीलनानंतर प्रचाराचे स्वरूप बदलले. येत्या काळात अमित शहा, योगी आदित्यनाथ यांच्या सभा जालना येथे होणार आहेत. निवडणुकीचा निकाल लागायचा तो लागेल, मात्र जालना मतदारसंघात राजकीय चर्चाही होत नाही. ऐन निवडणुकीतील ही राजकीय मरगळ भाजपच्या पथ्यावर पडेल, असे राजकीय विश्लेषक बी. वाय. कुलकर्णी यांनी म्हटले आहे.