15 October 2019

News Flash

मागासवर्गास चोर म्हटल्यास सहन करणार नाही

पश्चिम महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वात मोठी अशी अकलूजची जाहीर सभा ठरली.

माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार अनुक्रमे रणजितसिंह निंबाळकर आणि कांचन कुल यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अकलूज येथे बुधवारी सभा झाली.

अकलूज येथील सभेत नरेंद्र मोदींचा काँग्रेसला इशारा

सोलापूर : देशाच्या सुरक्षेची जबाबदारी घेणाऱ्या माझ्यासारख्या चौकीदाराला काँग्रेसवाल्यांनी शिव्या देणे हे मी समजू शकतो, परंतु आता चौकीदार बनलेल्या सर्व समाजालाच काँग्रेसवाले शिव्या देत आहेत. आपण मागास असल्यामुळे आतापर्यंत अशी किती तरी संकटे आणि अडचणी आपणांस सहन कराव्या लागल्या. परंतु आता सर्व मागासवर्गाना चोर म्हटले जात आहे, ते आपण कदापिही सहन करणार नाही, असा इशारा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागासवर्गीय-इतर मागासवर्गीय जातींच्या मुद्दय़ांना आज येथे हात घातला.

माढा आणि बारामती लोकसभा मतदारसंघासाठी भाजपच्या प्रचारासाठी बुधवारी अकलूज येथे आयोजित विराट सभेत मोदी यांनी काँग्रेससह विरोधकांवर जातीयवादाचा आरोप करून त्या दिशेने देशाचे लक्ष वेधले. पश्चिम महाराष्ट्रात यंदाच्या लोकसभा निवडणुकांसाठी सर्वात मोठी अशी अकलूजची जाहीर सभा ठरली. आजही काँग्रेसवाले समजतात की आपणच सत्ता चालवितो  आणि सत्ता चालविताना दलित व आदिवासींची ते पर्वा करीत नाहीत. काँग्रेसवाल्यांनी मला शिव्या दिल्या तर एकवेळ समजू शकतो. ते आपण सहनही करू, परंतु समाजातील मागासलेले दलित, आदिवासी, पीडित, शोषितांसह अन्य कोणाला ‘चोर’ म्हणून अपमानित केले तर हा मोदी कदापि सहन करणार नाही, असा इशारा मोदी यांनी दिला.

एकविसाव्या शतकात वाटचाल करीत असताना ‘मजबूत हिंदुस्थान’ हवे, की ‘मजबूर हिंदुस्थान’ पाहिजे, याचा निर्णय घेण्याची वेळ आली आहे. मजबूत देशासाठी मजबूत सरकार हवे आहे. देशाला मजबूत आम्हीच करू शकतो. काँग्रेसवाल्यांची मिलावटी आघाडी मजबूत देश निर्माण करू शकणार नाही. दहशतवाद्यांना पाताळात शोधून त्यांना कठोर शिक्षा देणारा देश निर्माण करायचा आहे. गेल्या पाच वर्षांत आपण नव्या भारताची नीती आणि रीती बदलली आहे. हा देश आणखी पुढे नेण्यासाठी छत्रपती शिवराय आणि भवानीमातेच्या धरतीवरून आशीर्वाद द्या, अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली.

ते म्हणाले, की यंदाची लोकसभा निवडणूक आपण पहिल्यांदाच अनुभवत आहोत, की ज्यात सरकार आणि सामान्य जनता एकत्रित आली आहे. सरकारच्या बाजूने जनता स्वत: घरोघरी  प्रचार करीत आहे. जनतेचा विश्वास हेच आपले भांडवल आहे. यापूर्वी देशात लांछनास्पद असे किती तरी घोटाळे झाले होते. परंतु गेल्या पाच वर्षांत मोदी सरकारने स्वत:वर भ्रष्टाचाराचा एकही डाग लागू दिला नाही. सरकारने काळा पैसा आणि भ्रष्टाचारावर थेट प्रहार केला. साडेतीन लाखांपेक्षा अधिक बनावट कंपन्या बंद केल्या. महागाई नियंत्रणात आणली. दुसऱ्या बाजूला काँग्रेस, राष्ट्रवादीसह अन्य महामिलावटी आघाडीतील पक्षांच्या विषयीचा अविश्वास वाढत चालला आहे. कारण  हे सर्व पक्ष केवळ एकटय़ा मोदींविरूध्द लढत आहेत. ही मंडळी मागील ५०-५५ वर्षांत सत्तेत असताना काय केले हे सांगत नाहीत आणि पुढे पाच वर्षांत काय करणार आहेत, हेदेखील  सांगत नाहीत. त्यांना केवळ ‘मोदी हटाव’ हा एकच मुद्दा बनवायचा आहे.

मोदी यांनी शरद पवारांवर देखील सडकून टीका केली. तुम्ही यशवंतराव चव्हाण यांच्याकडून प्रेरणा घ्यायला पाहिजे होती. मात्र दिल्लीचा एक परिवार तुमचा ‘मॉडेल’ आहे. तुम्ही माझ्या परिवाराची चिंता करू नका असे आवाहन केले.

First Published on April 18, 2019 3:59 am

Web Title: lok sabha elections 2019 pm narendra modi rally in akluj