शाजू फिलीप, एक्स्प्रेस वृत्तसेवा, तिरुअनंतपूरम

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरल्याने हा मतदारसंघाचा चर्चेत आला असला तरी हाच मतदारसंघ एका वेगळ्या कारणास्तवही चर्चेत येण्याची शक्यता आहे.

काँग्रेसचे अध्यक्ष यांच्याविरुद्ध राहुल गांधी के. ई. (३३) आणि रघुल गांधी के. असे अन्य दोन उमेदवारही रिंगणात आहेत. राहुल गांधी के. ई. यांच्या धाकटय़ा भावाचे नाव राजीव गांधी के. ई. असे आहे.

काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यासह अन्य दोन गांधी रिंगणात आहेत ते केवळ प्रतिस्पर्धीच नाहीत तर काँग्रेसशी एकनिष्ठ असलेल्या घराण्यातील आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षांनी उमेदवारी अर्ज सादर केल्यानंतर राहुल गांधी के. ई. यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. ते कोट्टायमच्या इरुमेली गावातील आहेत. ते लोकसंगीतामध्ये संशोधन करीत आहेत. त्यांचे दिवंगत वडील हे काँग्रेसच्या एका नेत्याकडे चालक म्हणून काम करीत होते आणि ते गांधी घराण्याचे चाहते होते.रघुल गांधी के. हे तमिळनाडूतील कोइम्बतूरचे आहेत. ते अगिला इंडिया मक्कल कळहमचे उमेदवार आहेत. आपले वडील काँग्रेसचे स्थानिक नेते होते आणि त्यानंतर ते अभाअद्रमुकमध्ये गेले, असे रघुल गांधी यांनी सांगितले. आपले नाव रघुल असे ठेवण्यात आले, तर बहिणीचे नाव इंदिरा प्रियदर्शिनी असे ठेवण्यात आले. आपल्या नावामुळे काँग्रेस अध्यक्षांविरुद्ध लढण्यास मदत होत असल्याचे रघुल म्हणाले.