News Flash

सोनिया गांधी यांचेही होमहवन

राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठीतूत अर्ज भरण्याआधी स्मृती इराणी यांच्याकडूनही पूजा

उत्तर प्रदेशातील रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी होमहवन केले, तर अमेठीमध्ये भाजपच्या उमेदवार स्मृती इराणी यांनीही अर्ज भरण्याआधी होमहवन केले.

राहुल गांधी यांच्याविरोधात अमेठीतूत अर्ज भरण्याआधी स्मृती इराणी यांच्याकडूनही पूजा

एक्स्प्रेस वृत्तसेवा, नवी दिल्ली

भाजपचे हिंदुत्व आणि कर्मकांडावर काँग्रेस टीका करीत असला तरी रायबलेरीतून उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काँग्रेसच्या माजी अध्यक्ष सोनिया गांधी यांनी होमहवन केले. राहुल गांधी आणि प्रियंकाही  या वेळी त्यांच्यासोबत होते. दुसरीकडे, राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठीतून अर्ज दाखल करण्यापूर्वी भाजपच्या स्मृती इराणी यांनीही पूजा केली.

रायबलेरीतून सोनिया गांधी यांनी गुरुवारी अर्ज दाखल केला. या मतदारसंघात ६ मे रोजी मतदान होणार आहे.  अर्ज दाखल करण्यापूर्वी त्यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. तत्पूर्वी, सोनिया गांधी यांनी पुत्र राहुल आणि कन्या प्रियंका यांच्यासह होमहवन केले. २००४ पासून सोनिया या रायबलेरीचे प्रतिनिधित्व करतात. त्यांनी तीन वेळा निवडणूक लढवली परंतु अर्ज दखल करताना त्यांनी कधीही होमहवन केले नव्हते.

गुजरात, कर्नाटक, मध्य प्रदेश, राजस्थान येथील विधानसभा निवडणुकांच्या प्रचारकाळात राहुल  यांनी मंदिरांना भेटी दिल्या होत्या. काँग्रेसवर अल्पसंख्यांक तुष्टीकरणाचा आरोप केला जात असे. त्याला शह देण्यासाठीच राहुल यांनी मंदिरांना भेटी दिल्याची चर्चा होती. तर भाजपने काँग्रेसवर सौम्य हिंदुत्वाचा (सॉफ्ट हिंदुत्व) आरोप केला होता.

सोनिया यांनी  अर्ज दाखल करण्यापूर्वी होमहवनात सहभागी होणे आणि त्याची छायाचित्रे काढण्यास प्रसार माध्यमांना संधी देणे यामागे हिंदुत्वाचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न होता. सोनिया यांची लढत भाजपच्या दिनेश प्रताप सिंग यांच्याशी होणार आहे.

स्मृती यांचेही होमहवन

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात अमेठी मतदारसंघातून निवडणूक लढविणाऱ्या भाजपच्या स्मृती इराणी यांनीही गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी पूजा आणि होमहवनात सहभागी झाल्या होत्या. त्यांच्या समावेत त्यांचे पती झुबीन इराणी हे सुद्धा उपस्थित होते. अमेठी मतदारसंघात राहुल गांधी आणि स्मृती इराणी यांच्यात २०१४ प्रमाणेच लढत होणार आहे. गत वेळी मोदी लाटेत राहुल गांधी यांचे मताधिक्य कमी झाले आहे. स्ृमती इराणी यांनी अर्ज दाखल केला तेव्हा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे उपस्थित होते. राहुल गांधी यांनी अमेठीबरोबरच केरळातील वायनाडमधूनही अर्ज दाखल केल्याने राहुल यांनी घाबरून केरळात पळ काढल्याचा आरोप भाजपने केला आहे.

वाजपेयी सरकारही हरले होते, लक्षात असू द्या- सोनिया

नवी दिल्ली: मोदींना अजिंक्य आहोत असे वाटत असले तरी, त्यांनी २००४ मध्ये काय झाले हे लक्षात ठेवावे. अटल बिहारी वाजपेयी यांच्या  सरकारचा पराभव होऊच शकत नाही असे मानले जात होते, पण २००४ मध्ये केंद्रात काँग्रेसचे सरकार आले होते, अशा शब्दांत यूपीएच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना इशारा दिला. सोनियांनी रायबरेली या पारंपरिक लोकसभा मतदारसंघातून गुरुवारी उमेदवारी अर्ज भरला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 12, 2019 2:18 am

Web Title: lok sabha elections 2019 sonia gandhi smriti irani file nomination after prayers
Next Stories
1 भाजपच्या प्रचाराची विमाने जोरात!
2 भाजपमधील असंतोषाचा ‘राडा’ ; महाजनांच्या एकाधिकारशाहीला आव्हान
3 भाजपमधील हाणामारीप्रकरणी उदय वाघ यांच्यासह सात जणांविरूद्ध गुन्हा
Just Now!
X