28 September 2020

News Flash

मावळात पार्थच्या प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय नात्यागोत्यासह प्रचारात

पार्थ यांच्या प्रचाराची सारी सूत्रे अजित पवारांनी स्वत:च्या हातात घेतली आहेत

पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यंदा लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश करत आहेत. मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून रिंगणात असलेल्या पार्थ पवारांना भाजप-शिवसेना युतीचे तगडे आव्हान असल्याने त्यांच्या प्रचारासाठी संपूर्ण पवार कुटुंबच नात्यागोत्यासह प्रचारासाठी उतरले आहे.

निवडणूक चुरशीची असल्याने पवार कुटुंबीयांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पार्थ यांच्या प्रचाराची सारी सूत्रे अजित पवारांनी स्वत:च्या हातात घेतली आहेत. दररोज वेगवेगळ्या बैठका, मेळाव्यांचा त्यांनी सपाटा लावला आहे. दूरध्वनीद्वारे त्यांचा नागरिकांशी संपर्क सुरू आहे. पार्थ यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांनी स्वतंत्रपणे गाठीभेठींवर भर दिला आहे. मावळ, पिंपरी-चिंचवडला त्यांचे दौरे वाढले आहेत. पवारकन्या सुप्रिया सुळे यांनी पार्थला मदत करण्याची विनंती त्यांच्या संपर्कातील अनेकांना केली आहे. पार्थ यांचे चुलत बंधू रोहित पवार मतदारसंघात नियोजनबद्ध बैठका घेत आहेत. पार्थ यांचा सख्खा भाऊ जय यानेही समाजमाध्यमातील प्रचाराची जबाबदारी स्वीकारली आहे. याशिवाय पार्थ यांची आत्या नीता पाटील यांच्यासह इतरही नातेवाईक प्रचारात उतरले आहेत.

वास्तविक, पार्थ पवार यांनी गेल्या वर्षी दिवाळीपासूनच मतदारसंघात प्रचाराच्या दृष्टिकोनातून गाठीभेठी घेण्यास सुरुवात केली होती. शरद पवारांनी माढय़ातून उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा करताना पार्थच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा केली होती. चिंचवडला मोठा मेळावा घेत शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील अशा प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पार्थला कार्यकर्त्यांसमोर आणण्यात आले. प्रचंड जनमसुदायापुढे केलेल्या पहिल्याच भाषणावरून त्यांना समाजमाध्यमांवर लक्ष्य करण्यात आले. त्यानंतरही, वेगवेगळ्या पद्धतीने पार्थ यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न सुरूच आहे.

पार्थची उमेदवारी लादलेली नाही – सुनेत्रा पवार

पार्थची उमेदवारी लादलेली नसून कार्यकर्त्यांच्या मागणीनुसारच देण्यात आलेली आहे, असा दावा सुनेत्रा अजित पवार यांनी दापोडीत केला. शरद पवार, अजित पवार यांच्या संस्कारात वाढलेल्या पार्थला घरातूनच राजकीय बाळकडू मिळाले आहे. कुटुंबीयांना कमीपणा येईल, असे पार्थ कधीही वागणार नाही, खासदार म्हणून तो चांगलेच काम करेल, अशी ग्वाही सुनेत्रा यांनी दिली. पाच वर्षांतील भाजप सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे सामान्यांना बऱ्याच त्रासाला सामोरे जावे लागले. मोदी सरकार सर्वच क्षेत्रांत सरकार अपयशी ठरले, अशी टीका त्यांनी केली.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 3, 2019 1:47 am

Web Title: lok sabha elections 2019 whole pawar family members campaign of parth in maval
Next Stories
1  ‘बविआ’ची ‘शिट्टी’ गेली
2 आधी कलानींवर टीका, मग मैत्रीचे साकडे
3 काँग्रेसची ‘विकास पंचसूत्र’
Just Now!
X